क्षा. म. समाज संस्थेच्या पदाधिकारी व विश्वस्तांचा पोलखोल! (भाग- १)



क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था, मुंबई ह्या संस्थेची ८८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी संपन्न झाली. त्या सभेमध्ये संस्था गेली तेरा वर्षे ज्यांच्या ताब्यात आहे, नियंत्रणात आहे; त्या पदाधिकाऱ्यांनी व विश्वस्तांनी संस्थेचे कसे आर्थिक नुकसान केले, संस्थेची बदनामी कशी केली, संस्थेत संस्थाविरोधी व्यक्तींना पदावर कसे घेतले, संस्थेचे अस्तित्व शाबूत राहू नये म्हणून कसे गैरव्यवहार केले? हे सगळं उघड झाले! शेवटी सदर सभा बरखास्त करा; अशी मागणी सभागृहातील उपस्थित सभासदांनी केली असता लोकशाही पायदळी तुडवत सभा पूर्ण करण्याचा जो प्रयत्न सत्ताधिशांकडून झाला तो संतापजनक होता. संस्थेचे आद्यसंस्थापक डॉ. रा. का. शिरोडकर व शिक्षणतज्ञ एच. डी. गावकर साहेबांच्या आदर्शला काळीमा फासणारा होता. ह्या सर्व कलंकित प्रकाराबद्दल संस्थेचे ना-लायक विश्वस्त, पदाधिकारी व पदांच्या स्वार्थासाठी त्यांना साथ देणारे कार्यकारणी सदस्य ह्यांचा आम्ही क्षा. म. समाज परिवर्तन समितीतर्फे जाहीर निषेध करतो! त्या सभेत नेमकं काय घडलं-बिघडलं? हे आम्ही सर्व समाज बांधव भगिनींना सांगणार आहोत! 

३० ऑगस्ट २०२६ रोजी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असल्याची सूचना दैनिक नवशक्ती म्हणून प्रकाशित झाली. अहवाल, जमाखर्च व संस्थेच्या कारभाराबाबत लेखी प्रश्न परिवर्तन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुदतीत म्हणजे २४ ऑगस्ट २०२६ रोजी दिले आणि त्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी संस्थेचे सरचिटणीस श्री. भाऊ डगरे यांनी २७ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यालयात बोलविले. आम्ही तिथे गेलो असता त्यांना आमच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. यावेळी आम्हाला व्हिडिओ शूटिंग करण्याची परवानगी नाकारली गेली. विश्वस्त अंकुश डगरे यांचा सल्ला घेण्यासाठी अध्यक्ष व सरचिटणीस बैठकीतून सतत उठून जात होते. शेवटी आम्ही दोन तासांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे वार्षिक सर्वसाधारण सभेत द्यावीत अशी मागणी करीत तिथून निघून आलो. 

३० ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील सभेचे इतिवृत्तांत वाचून दाखविण्यात आले; जे अपूर्ण आणि चुकीचे होते. त्यावर आम्ही आक्षेप घेतला व विरोध दर्शविला. त्यानंतर जमाखर्चात गंभीर त्रुटी व भ्रष्ट आर्थिक व्यवहार झाल्याचे आम्ही निदर्शनास आणून दिले. त्यावर व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त उत्तरे देण्यास असमर्थ ठरले. सुमारे तीन तास झालेल्या सभेत गेल्या १३ वर्षाचा बोगस, भ्रष्ट, गैर, अहंकारी व मूर्खपणाचा कारभार सभागृहात उघड झाला. २०१७ पासून आजतागायत आम्ही प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेत विचारलेले प्रश्न अनुत्तरित राहिले!

वार्षिक सर्वसाधारण सभेत आम्ही लेखी प्रश्न दिले होते; त्यावर योग्य उत्तरे देण्यास पदाधिकाऱ्यांकडे खूप दिवसांचा वेळ होता; परंतु सत्तेचा माज व अहंकार त्यांना एवढा झाला होता की सभेपूर्वी अनेकांनी स्पष्ट कल्पना देऊनही खजिनदार महाशय सर्वांना सांगत होते की, मी प्रश्न विचारणाऱ्यांना अर्ध्या तासात गप्प करीन. ह्या महाशयांनी क्षा. म. समाज संस्थेचे आद्यसंस्थापक व दैवत डॉ. रामचंद्र का. शिरोडकर साहेबांचे नावच चुकीचे घेतले. ह्यावर समाज संस्थेचे सभासद असलेल्या एका आदर्श शिक्षकाने संताप व्यक्त केला. खरंतर ह्या कायदेतज्ञ (?) खजिनदार महाशयांना शिकवणीची गरज असल्याचे समाज बांधव भगिनींच्या लक्षात आले.

तर एका पदाधिकाऱ्यांनी सुचवले की, वार्षिक सर्वसाधारण सभेत बॉक्सर आणू; जेणेकरून प्रश्न विचारणारे घाबरतील! पण शेवटी कोणाची पुंगी वाजली? ते सगळे सभागृहाने पाहिले. चुकीचा व आक्षेपार्ह जमाखर्च मंजूर करून घेण्यासाठी सर्व पदाधिकारी, विश्वस्त व कार्यकारणी सदस्यांना हात वर करावे लागले. कारण त्यांना समर्थन करणारे सभागृहात फक्त तीनच सभासद होते; ज्यांनी हात वर केले ते तिघेही संस्थेचे लाभार्थी होते! हे खेदाने नमूद करावेसे वाटते.

समाजाच्या आजवरच्या इतिहासात समाजाचे वार्षिक अहवाल आणि जमाखर्च यावर सभासदांच्या लेखी प्रश्नावर वार्षिक सभेत उत्तर देताना खजिनदार, पदाधिकारी आणि विश्वस्त यांची बोलती बंद झाली आणि एकूणच संस्थेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार यांची जाहीर पोलखोल झाल्याने सगळ्या सत्ताधाऱ्यांची भर सभेत नाचक्की झाली.

वार्षिक सर्वसाधारण सभा हे सभासदांचे व्यासपीठ असते. त्या व्यासपीठावरून सभासद वर्षातून एकदा प्रश्न विचारत असतो, संस्था हिताचे विचार मांडत असतो, आपल्या भावना व्यक्त करत असतो! तरी त्या प्रश्नांबद्दल, त्या संस्था हिताच्या विचारांवर सकारात्मकता सत्ताधाऱ्यांकडून दाखविली गेली नाही. त्यामुळे त्यांच्या कारभारची पोलखोल झाली. ह्याचा अर्थ संस्थेचा कारभार किती भोंगळ आहे हे स्पष्ट होते!

वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष, सरचिटणीस व खजिनदार यांनी संचलित करायची असते; परंतु दरवर्षीप्रमाणे विश्वस्तांची लुडबुड सभागृहाने पाहिली. दिवंगत आर. डी. फाटक हे विश्वस्त होते. विश्वस्त असताना जेव्हा ते वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलायचे तेव्हा यंत्रणेचे वाभाडे निघायचे. तेव्हा त्यांना गप्प करण्यासाठी इतर विश्वस्तांची कसरत सभागृहाने पाहिलेली आहे. त्यावर सभागृहात चर्चाही झाली होती. ह्यावेळीही विश्वस्त, अध्यक्ष आणि २०१३ पूर्वी समाजविरोधी कार्य करणारे व त्या कर्माचे फळ म्हणून आज विश्वस्त झालेले आणि माजी सरचिटणीस व पदाधिकारी, खजिनदार यांनी आमच्या प्रश्नांवर चुकीची उत्तरं देण्याचा, सभा रेटून नेण्याचा प्रयत्न केला; सभेचे कामकाज नियमबाह्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला! यातच खजिनदार यांच्या मुखातून सभा बरखास्त झाल्याची घोषणा झाली. आणि राष्ट्रगीत घेऊन सभा गुंडाळण्यात आली.

वार्षिक सर्वसाधारण सभेत सभागृहात संस्थेच्या कारभारावर सभासद रोखठोकपणे बोलत असताना सभागृहाबाहेर मात्र सभासदांना चुना लावण्याचा कार्यक्रम बिनधास्तपणे सुरू होता. सभेला उपस्थित राहणाऱ्या सभासदाला कुपन्स दिली जातात; जेणेकरून सर्व सभासदांना नियोजन पद्धतीने खाऊ मिळेल. परंतु पदाधिकाऱ्यांची चलाखी सभासदांनी ओळखली नव्हे त्यांची चोरीच पकडली. प्रत्येक सभासदाला साठ रुपये रुपये किमतीची कुपन्स दिले होते आणि प्रत्यक्षात ४० रुपये किंमतीचे बिस्कीट पुडे पिशवीतून दिले जात होते. अनेक सभासद ४० रुपये किंमतीचे बिस्कीट पुडे घेऊनही गेले. शेवटी काही सभासदांच्या चाणाक्षपणामुळे पदाधिकाऱ्यांची पोलखोल झाली. प्रत्येक सभासदांचे वीस रुपये कसे ढापले जातात? हे समजले. अशाप्रकारे प्रत्येक ठिकाणी कमिशन घेण्याचा हा धंदा गेली तेरा वर्षे सुरू आहे. त्यालाच आम्ही विरोध करीत असतो. पदाधिकारी, सुकाणू समिती व विश्वस्त ह्यांच्या चहापाणी व नास्तावरचा खर्च लाखोंच्या आकड्यात जात असतो आणि कामकाज मात्र शून्य! त्याला आमचा विरोध आहे. सभासदांनी याबाबत प्रश्न विचारले पाहिजेत; ही आमची अपेक्षा!

व्यासपीठावर अनेकदा पदाधिकाऱ्यांनी आवाहन करूनही एक माजी अध्यक्ष, एक माजी सरचिटणीस, एक उपाध्यक्ष, काही सुकाणू समिती सदस्य सभागृहात बसून राहिले आणि आपली नाराजी प्रकट केली. ही नाराजी पदाच्या अपेक्षातून होती की पदाधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराबाबत हे स्पष्ट झाले नाही. परंतु मागील इतिहासावरून पदाच्या अपेक्षातून ही नाराजी असावी; असे अनुभवी सभासदांनी जाणले. एका प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एका सुकाणू समिती सदस्याला व्यासपीठावर बोलविण्यात आले; परंतु त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि भोंगळ कारभाराला तुम्हीच उत्तरे द्या; असे सांगितले, एवढेच नाहीतर खजिनदार पदावर बढती मिळालेल्या पदाधिकाऱ्याला मराठीचे वाचन कसं करावं? हेही स्पष्टपणे सांगितले. तसेच दरवर्षी सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभारवर तासभर भाषण ठोकणारे नेते यावेळी मात्र बघ्याची भूमिका घेऊन गप्प बसून सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्षपणे बळ देत होते. त्यामुळे भूतकाळातील त्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

क्षा. म. समाज परिवर्तन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अर्थात आम्ही पदाधिकाऱ्यांना कोणते लेखी प्रश्न विचारले होते आणि आम्हाला सभेत कोणते प्रश्न विचारायचे होते? ते आम्ही पुढील लेखात प्रसिद्ध करणार आहोत. कारण क्षा. म. समाज बांधव भगिनींना समजून येईल आमची समाज हिताची भूमिका! क्षा. म. समाज संस्थेने चिरंतर दर्जेदार शैक्षणिक सेवेचे कार्य करण्यासाठी भरारी घेतली पाहिजे; ह्यासाठी आमची लढाई सुरु आहे! ती अशीच पुढेही सुरु राहील! आमच्या भूमिकेशी सहमत असलेल्या समाज बांधव भगिनींनी आमच्यासह किंवा स्वतंत्रपणे संस्थेच्या हितासाठी क्रियाशील राहिले पाहिजे! तरच क्षा. म. समाज संस्थेला सुवर्णयुग येईल!

🙏🙏🙏🙏🙏

अध्यक्ष- सुनिल जेठे

सरचिटणीस- सुरेश डामरे 

खजिनदार- राकेश कांबळी 

आणि सर्व पदाधिकारी, सल्लगार व सदस्य

क्षा. म. समाज परिवर्तन समिती

🙏🙏🙏🙏🙏