समाज माझा, मी समाजाचा! (लेखांक २४ वा)
क्षा. म. समाज संस्थेच्या भल्यासाठी लगेच सर्वांनी एकत्र येऊ या!
आहे तयारी...?
`विश्वस्तांनी समाज संस्थेच्या अस्तित्वास बाधा आणू नये!' या मथळ्याखाली `समाज माझा, मी समाजाचा!' मालिकेतील लेखांक तेविसावा २९ जानेवारी २०२२ रोजी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध झाला. ह्या संदर्भात विश्वस्तांनी चुकीच्या पद्धतीने बडतर्फ केलेले क्षा. म. समाजाचे अध्यक्ष अनिल खाजणवाडकर, उपाध्यक्ष प्रकाश वाळके, सरचिटणीस श्रीकृष्ण हंजनकर, खजिनदार अरुण रावले, कार्यकारणी सदस्य रमाकांत हंजनकर आणि बाळ नरे यांनी खुलासा केला. आपण तो वाचलाच असेल त्या संदर्भात माझे छोटेसे मनोगत..
प्रथम वरील सहा मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन! कारण कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी, सुकाणू समिती सदस्य आणि विश्वस्त यांच्यापैकी एकानेही मागील प्रसिद्ध झालेल्या बावीस लेखांवर थेट प्रतिक्रिया दिली नव्हती. समाजाच्या हितासाठी आम्ही मांडलेल्या मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित असताना काही समाज बांधव-भगिनींनी प्रतिक्रिया दिली; तर काहीजणांनी गप्प राहण्यात धन्यता मानली. असो. स्वभावानुसार स्वहित पाहून प्रत्येकजण निर्णय घेत असतो. परंतु समाज संस्थेतील सत्य-वास्तव प्रत्येकापर्यंत जावे; हीच माझी प्रामाणिक इच्छा होती आहे आणि यापुढेही असेल.
तेविसाव्या लेखावर दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मी सहा मान्यवरांचे स्वागत करतो आणि समाजसंस्थेत ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील त्याचे वास्तव सविस्तरपणे समोर आणण्याचे त्यांना आवाहन करतो, जाहीर विनंती करतो. हे आवाहन फक्त ह्याच सहा मान्यवरांसाठी नाही तर जे मान्यवर यंत्रणेत काम करीत आहेत त्यांच्याकडूनही सर्व समाज बांधवा-भगिनींची हीच अपेक्षा आहे. कारण जोपर्यंत खुल्या मनाने चर्चा होत नाही; तोपर्यंत समाज बांधवांना बंद दाराआड काय घडतं? हे समजणार नाही आणि त्यामुळे भविष्यात नेमकी भूमिका काय घ्यायला हवी? ह्याचा अंदाज बांधता येणार नाही. म्हणून आज समाजातील सर्वांनी माझ्या नम्र आवाहनची दखल घ्यावी; दोन पावलं पुढे या आणि समाज संस्थेला प्रगतीपथावर न्या! अशी माझी हात जोडून विनंती आहे.
`म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये!' असे आमचे स्पष्ट मत आहे. म्हणून `समाज माझा, मी समाजाचा!' ह्या चळवळीच्या माध्यमातून वरील सर्वांना हात जोडून पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती करतो की, आपण सर्वांनी एकाच व्यासपीठावर येऊया आणि क्षा. म. समाजाचे आद्यसंस्थापक डॉ. शिरोडकर आणि ऋषीतुल्य एच. डी. गावकर साहेबांचे स्वप्न पूर्ण करू या! संस्थेच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे. तरच क्षा. म. समाज संस्थेवर कब्जा मिळवण्याचा एका राजकीय नेत्याचा मनसुबा धुळीस मिळेल आणि `स्वप्नीक'सारख्या किडीचा आपोआप कायमचा बंदोबस्त होईल. म्हणूनच आमच्या विनंतीचा सर्वांनी विचार करावा!
आपण एकत्रित होताना निःस्वार्थ वृत्त्ती मात्र आवश्यक आहे. फक्त आणि फक्त समाज संस्थेच्या हितास प्राधान्य द्यावे लागेल. आम्ही आज एकत्र आलो नाही तर उद्या आम्हाला नियती माफ करणार नाही. एवढेच नाही तर जे समाज संस्थेसाठी सामंजस्याची भूमिका घेणार नाहीत; त्यांचा भविष्यात समाजद्रोही म्हणूनच उल्लेख होईल. म्हणून समाज मंदिरातील देवाला शरण जाऊन सर्वांनी एकाच व्यासपीठावर यायला हवे.
आम्ही नुसते लेख लिहून गप्प बसत नाही; तर तशी कृतीही करीत आहोत. संस्थेच्या यंत्रणेतील वरिष्ठ लोकांना प्रत्यक्ष भेटून मी हात जोडून विनंती केली आहे, समाजव्यवस्थेला वाचवा! हेवेदावे दूर ठेवा! तर दुसऱ्या बाजूला धर्मादाय आयुक्त, पोलीस स्टेशन यांच्याकडे अर्ज करून दाद मागत आहोत. हे सर्व कार्य `समाज माझा, मी समाजाचा!' ह्या चळवळीचे प्रामाणिक, निःस्वार्थी, समाजसंस्था प्रेमी नेते करीत आहेत.
२०१७ साली समाज संस्थेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले व पराभूत झालेले मान्यवर, सुकाणू समितीचे सदस्य आणि विश्वस्त किमान ह्या चाळीस-पन्नास मान्यवरांनी एकत्र यावं, खुली चर्चा करावी आणि अंतिम निर्णय घ्यावा. समाज संस्थेला प्रगतीपथावर न्यायचं असल्यास ह्या मान्यवरांनी एकाच व्यासपीठावर येणं गरजेचं आहे. तेसुद्धा खूप विलंबाने नाही. पुढील एक दोन दिवसात. अन्यथा प्रामाणिक, समाजावर खरेखुरे प्रेम करणारे समाज बांधव जे संघटित झाले आहेत, त्यांच्या समाजहिताच्या प्रवासाला सुसाट सुरुवात झालेली असेल; जे निःस्वार्थीपणे सोबतीला येतील त्यांना घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांना मागे सोडून!
नेहमीप्रमाणे आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत! (क्रमशः)
-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक-पाक्षिक `स्टार वृत्त'
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
( वरील लेखावर अनेक प्रतिक्रिया आल्या त्यापैकी ४ फेब्रुवारी २०२२ रोजी आलेली बोलकी महत्वाची प्रतिक्रिया!)
श्री नरेंद्र हडकर यांनी त्यांच्या लेखांक २४ द्वारा समाज संस्थेच्या हितासाठी मांडलेल्या विचारांशी आम्ही सर्व सहमत आहोत.
१६ मार्च २०२० रोजी मागाठाणे विषयावर सभा आयोजित करण्यात आली होती. परंतू covid-19 मुळे सभा रद्द करण्यात आली होती. मागील दि. ०६ मार्च २०२१ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधरण सभेमध्ये सभासदांच्या मागणीवरून सन्मा. अध्यक्ष श्री. अनिल खाजनवाडकर यांनी या विषयावर विशेष सभा घेण्याचं जाहिर केलं होते आणि पुढचे काय रामायण घडलं हे आपणा सर्वांना माहितच आहे.
असे असूनही मागाठाणे इमारत व जागा समजाच्या हातातून जावू नये, याकरिता समाज बांधवांसोबत आम्ही जो प्रयत्न केला आहे; त्याची माहिती लवकरच सर्वांच्या माहितीकरिता देणार आहेत व हे आम्हीच केलं होते असे खोटं सांगणाऱ्यांना उघडं पाडणार आहोत.
तरीही मागाठणेसह संस्थेच्या इतर ज्वलंत विषयावर श्री. नरेंद्र हडकर यांनी सुचवल्याप्रमाणे सर्वांची एकत्र येऊन सभा आयोजित करून सकारात्मक चर्चा करायला काहीच हरकत नाही.
धन्यवाद..!
आपले नम्र
श्री. अनिल शंकर खाजनवाडकर
श्री. प्रकाश राजाराम वाळके
श्री. श्रीकृष्ण दाजी हंजनकर
श्री. अरूण कृष्णा रावले
श्री. रमाकांत रावजी हंजनकर
श्री. अनंत गणपत नरे.
----------------------------------------------