लेखांक २७ वा- संस्थेच्या उज्वल भविष्यासाठी एक दिवस नातं विसरा, संस्थेबद्दल स्वाभिमान बाळगा आणि मतदान करा!

समाज माझा, मी समाजाचा! (लेखांक- २७ वा)

संस्थेच्या उज्वल भविष्यासाठी एक दिवस नातं विसरा, संस्थेबद्दल स्वाभिमान बाळगा आणि मतदान करा!

क्षा. म. समाज संस्था, मुंबई ह्या समाज संस्थेच्या हितासाठी, भल्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी मी २०१७ पासून ह्या सदरात २६ लेख लिहिले. ह्या लेखांमध्ये संस्थेत गैरकारभार करणाऱ्यांना (नातं न जपता) नागवं करावं लागलं. पण त्या सर्व लेखातील एकही वाक्य खोडून काढण्याची धमक पाच वर्षात खुर्चीवर बसलेल्या विश्वस्त, सुकाणू, कार्यकारणीमधील एकाकडेही नव्हती; हे सिद्ध झालं. एका बाजूने लेख लिहीत असताना दुसऱ्या बाजूला सत्ताधिशांना न घाबरता गैरकारभार करणाऱ्यांच्या विरोधात संबंधित यंत्रणेकडे तक्रारी केल्या. डॉ. शिरोडकर परिवर्तन पॅनेल समितीच्या संस्थेच्या हितासाठी सुरु असलेल्या लढाईस जाहीररित्या पाठिंबा दिला. 

ह्याचा राग सत्ताधाऱ्यांना आला आणि मी मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादक असलेल्या व गेली २२ वर्षे निष्ठेने - प्रामाणिकपणे सुरू ठेवलेल्या पाक्षिक `स्टार वृत्त'च्या, क्षा. म. समाज संघटनच्या वेबसाईटबाबत व व्हाट्स ऍप ग्रुपबाबत खोटा अपप्रचार करण्यात आला. काळजीवाहू अध्यक्ष धर्माजी गावकर आणि सरचिटणीस भक्ती जोगल यांनी समाज बांधवांना दिशाभूल करणारे आवाहन केले. त्याला मी समर्थपणे जाहीर आव्हान दिले. एवढेच नाही तर व्हाट्सऍप ग्रुपबाबत सेटिंग बदली म्हणून कोल्हेकोई करण्यात आली. (हे भ्रष्ट कारभार करणाऱ्यांनी निवडणुकीत प्रमुख मुद्दे बनविले. किती घाबरत आहेत बघा! असो!)

मी क्षात्रकुलोत्पन्न म्रराठा गावडे-गावडा समाजात जन्माला आलो आहे. शासनाचे अधिकृत जातप्रमाणपत्र व जातपडताळणी पत्र माझ्याकडे आहे. त्यामुळे मी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन नावाची वेबसाईट, व्हाट्सऍप ग्रुप तयार करू शकतो. हा माझा अधिकार आहे. ही गोष्ट मूर्खांनी ध्यानी घ्यावी! अगदी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन नावाची वेबसाईट उघडून बघा! समाज अहिताचे त्यात काही सापडणार नाही. कुटुंबऍपवरील ग्रुपमध्ये संपूर्ण भारतातून तीन महिन्यात १५०० पेक्षा जास्त समाज बांधवभगिनी सभासद झाले. उच्चविद्याविभूषित, आदर्श व्यक्ती सदस्य म्हणून एकत्र आले. चांगली चर्चा झाली, होत आहे. मात्र सत्ताधीशांच्या पोटात दुखू लागले. व्हाट्सऍप ग्रुपवरील एडमिनने कधी सेटिंग बदलावी, हा त्याचा अधिकार असतो. ग्रुपवर प्रचार करायला मिळाला नाही म्हणून जीव कासावीस झाला म्हणून आमच्या वृत्तपत्राच्या वेबसाईटवर, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन नावाच्या वेबसाईटवर आणि ग्रुपवर खोटे आरोप केले. भविष्यात त्याची उत्तरे सविस्तरपणे आम्ही देणार आहोतच! तेव्हा तुमचं अज्ञान लोकांसमोर येईलच!   

क्षा. म. समाज संस्थेचे सभासद होण्यासाठी समाज बांधवभगिनी गेल्या दहा वर्षात इच्छुक असताना आपल्या समर्थकांना सभासत्व देण्याचा हलकटपणा-नादानपणा सत्ताधाऱ्यांनी केला. इच्छुकांना सभासद करून घेतले नाही. याची उत्तर कोण देणार?

संस्थेत काम करणाऱ्या समाज बांधवभगिनींवर अन्याय अत्याचार केला, त्यांना विनाकारण कोर्टात खेचले, त्यांच्या बदल्या केल्या, नोकरीवरून काढून टाकले. त्याबाबत मात्र आम्ही बोललो तर राग येतो. अरे वा! 

उद्या निवडणूक आहे आणि निकाल आहे परवा! मी ह्या लेखांद्वारे तुमच्या गैरकारभाराची, भ्रष्टाचाराची, दहशतीची, अरेरावीची, संस्था विरोधी कामकाजाची, दुष्कृत्यांची पोलखोल करीतच राहणार आहे. हा माझा धर्म आहे. खूप लिहिण्यासारखे आहे. संस्थेच्या भल्यासाठी लिहिणार आहे. पण ह्या सत्ताधीशांचा काळा कारभार रोखण्यासाठी उद्या आम्हा सभासदांना सुवर्णसंधी मिळणार आहे. समाज संस्थेचं अस्तित्व अबाधित राखण्यासाठी बदल आवश्यक आहे. समाज बांधवभगिनींनी विचार करा! एका दिवसासाठी नातं विसरा व समाजाच्या भल्याचा विचार करा व डॉ. शिरोडकर परिवर्तन पॅनेलला शिट्टी निशाणीवर शिक्का मारून भरघोस मतांनी निवडून द्या! (क्रमशः)

-नरेंद्र राजाराम  हडकर