लेखांक ३३ वा- महामानवाला विनम्र अभिवादन!



समाज माझा, मी समाजाचा!

लेखांक ३३ वा- महामानवाला विनम्र अभिवादन!

आज १८ डिसेंबर. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे आद्यप्रवर्तक, संस्थापक, ज्ञानमहर्षी डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांची पुण्यतिथी! त्यांना विनम्र अभिवादन! त्या निमित्ताने आज क्षा. म. समाजातर्फे डॉ. शिरोडकर स्मारक परेल येथे पुण्यतिथी साजरी होणार आहे. 

समाजबांधवांनो, ह्या कार्यक्रमातून डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या विचारांचे, त्यांच्या कार्याचे मंथन होईल आणि त्यातून डॉ. शिरोडकरांना अभिप्रेत असणारे विचारअमृत, कार्यअमृत आम्हा समाजबांधवांना प्राप्त होईल; अशी आमची अपेक्षा आहे.

डॉ. शिरोडकरांसारखे व्यक्तिमत्व महामानव ठरते. डॉ. शिरोडकरांना समाजाचे आद्यप्रवर्तक, संस्थापक, ज्ञानमहर्षी, शिक्षणमहर्षी, स्वातंत्र्यसैनिक अशी उपाधी आम्ही लावतो. कारण त्यांनी समाजासाठी केलेले विचार आणि त्या विचारातून प्रकट झालेले कार्य सत्तर ऐंशी वर्षे भक्कम आहे. त्या भक्कम असलेल्या पायावर आजही क्षा. म. समाज वाटचाल करीत आहे. 

डॉ. शिरोडकरांचा जीवन प्रवास प्रत्येकाने बारकाईने सदैव अभ्यासाला पाहीजे. त्यावर चिंतन मनन केलं पाहीजे. मग आम्हाला डॉ. शिरोडकरांचे व्यक्तिमत्व समजून घेता येईल.

डॉ. शिरोडकरांच्या जीवन प्रवासातून नेमकं काय शिकता येईल? 

संघर्ष आणि त्याग.

शिक्षणातून विचारक्रांती व त्या विचारक्रांतीतून समाजासाठी कार्य.

समाजाबद्दल प्रेम आणि त्या प्रेमापोटी केलेले कार्य.

प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता! 

डॉ. शिरोडकरांना शिक्षणाची आवड होती. शिक्षण हे त्यांनी आपले ध्येय बनविले. त्या ध्येयाला अनुसरून त्यांनी परिस्थितीशी संघर्ष केला. परिस्थितीवर मात करूनच त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यातून त्यांच्या समाजाच्या सर्वांगीण भल्याच्या विचारांची बैठक मजबूत होत केली. उच्च शिक्षण घेऊन फक्त स्वत:चा स्वार्थ न बघता ऐषआरामी जीवन जगले नाहीत. समाजासाठी कष्ट सोसले, खूप मोठा त्याग केला. कारण त्यांना समाजातील कष्टकरी गरीब लोकांना शिक्षित करून शिक्षणक्रांती घडवायची होती. हीच खरी समाजक्रांती. त्यांचे समाजावर खरेखुरे प्रेम होते. त्या प्रेमापोठी त्यांनी कार्य केले. ते कार्य करताना प्रामाणिकपणा जपला आणि ते कार्य कार्यक्षमतेने पूर्णत्वास नेले. समाजाचे हित झाले. डॉ. शिरोडकरांबद्दल खूप काही लिहिण्यासारखे-जाणून घेण्यासारखे आहे.

डॉ. शिरोडकरांचे विचार हे जगासमोर गेले पाहिजे होते. पण आम्ही हे जगासमोर ठेवण्यास कमी पडलो. हीच आमची खंत आहे. किमान समाजबांधवांपर्यंत डॉ. शिरोडकरांचे विचार-कार्य, जीवन संघर्ष पोहचविणे आम्हाला जमले नाही. एवढेच नव्हेतर त्यांच्या विचारांशी बांधिल आहोत का? हा प्रश्न आज आम्हाला पडला पाहीजे. डॉ. शिरोडकरांनी आपल्या हयातीत एच. डी. गावकर साहेबांचे नेतृत्व उभं केलं. नंतर असं तन मन धन अर्पण करून समाजासाठी कार्य करणारे नेतृत्व समर्थपणे का उभे राहिले नाही? हे सगळ्यांना माहित आहे. डॉ. शिरोडकरांच्या विचारांचा प्रभाव कुठेतरी कमी होताना दिसतोय. खूप वाईट वाटतंय. जोपर्यंत त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून आम्ही प्रवास करणार नाही तोपर्यंत क्षा. म. समाजाचा सुवर्णकाळ येणार नाही. आज संस्थेमध्ये लाभार्थ्यांचा असलेला वरचष्मा क्लेशकारक आहे. त्यामुळे अनेक विद्वान, अनुभवी, प्रामाणिक व कार्यक्षम व्यक्ती समाज संस्थेपासून चार हात नव्हे तर कित्येक किलोमीटर दूर राहणं पसंत करतात! ह्याचा विचार समाज बांधव भगिनींना करावाच लागेल. अन्यथा भविष्य कठीण आहे. आमचे रोखठोक विचार कदाचित काहींना रुचणार नाहीत- पचणार नाहीत. पण आजच्या दिवशी मंथन झालेच पाहिजे! आजच्या डॉ. शिरोडकरांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही आत्मपरिक्षण, आत्मचिंतन करायलाच पाहीजे व डॉ. शिरोडकरांच्या विचारांचा आत्मप्रकाश जागता ठेवण्यासाठी डॉ. शिरोडकरांना साष्टांग दंडवत घालता पाहीजे!                                                                  

-नरेंद्र हडकर (पत्रकार)