समाज माझा, मी समाजाचा! (लेखांक ३० वा)
क्षा. म. संस्थेला वाचविण्यासाठी साथ द्या!
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेचे आद्यसंस्थापक शिक्षण महर्षी डॉ. रामचंद्र शिरोडकर, यांचे महान कार्य पुढे नेणारे त्यांचेच शिष्य शिक्षणतज्ञ एच. डी. गावकरसाहेब यांची २४ वी पुण्यतिथी ७ एप्रिल २०२३ रोजी होती. त्यानिमित्ताने संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमास क्षा. म. समाजाचे रोखठोक नेतृत्व करणारे राकेश कांबळी गेले होते. त्यावेळी डॉ. शिरोडकर साहेबांच्या पुतळ्याशेजारी सहा महिन्यापूर्वी निवडून आलेले कार्यकारणी सदस्य सन्मानिय श्री. संदिप धोपटे पदाधिकाऱयांच्या गैरकारभाराचा निषेध करण्यासाठी बसले होते. श्री. राकेश कांबळी यांनी श्री. धोपटे यांच्या भावना जाणून घेतल्या आणि आपल्या भाषणात श्री. धोपटे यांनी गांधीगिरी मार्गाने केलेल्या आंदोलनाचा उल्लेख केला व पदाधिकाऱ्यांना मोलाचा सल्ला दिला. श्री. राकेश कांबळी यांचा सदर व्हिडिओ दुसऱ्या सन्मानिय कार्यकारणी सदस्याने व्हायरल केला म्हणून समाज बांधव भगिनींपर्यंत संस्थेमध्ये काहीतरी चुकीचे घडत आहे; याची पुन्हा प्रचिती आली.
त्यानंतर दर दिवशी सायंकाळी सन्मानिय कार्यकारणी सदस्य श्री. संदिप धोपटे, श्री. केशव गावडे आणि श्री. अनंत बांदिवडेकर डॉ. शिरोडकर साहेबांच्या पुतळ्याशेजारी शांतपणे बसतात आणि क्षा. म. समाज संस्थेचा जो कारभार चुकीच्या पद्धतीने सुरू आहे; त्या विरोधात निषेध नोंदवितात. सन्मानिय तीन कार्यकारणी सदस्यांचे नेमके म्हणणे समजून घेण्यासाठी, त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी क्षा. म. समाज संस्थेच्या हितासाठी सदैव प्रामाणिकपणे रोखठोक भूमिका मांडणारे श्री. विजय मुंबरकर, श्री. सुरेश डामरे, श्री. सुनील जेठे, श्री. राकेश कांबळी, श्री. विलास ढोलम, श्री. समीर हडकर आणि मी स्वतः दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी त्यांना जाऊन भेटलो; त्यांच्यासोबत बसलो; त्यांच्या भावना जाणून घेतल्या; त्यांच्याशी चर्चा केली!
वरील तीनही कार्यकारणी सदस्य यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांनी मांडलेली मतं खरोखरच क्षा. म. समाज संस्थेच्या हितासाठीच होती व आहेत; असं माझं स्पष्टपणे म्हणणं आहे. त्यांनी आजचे पदाधिकारी गैर व चुकीचा कारभार करत आहेत त्याबद्दल स्पष्टपणे मुद्दे मांडले. त्यांच्या भावना समस्त समाज बांधव- भगिनींपर्यंत पोहोचण्यासाठी आजचा हा लेखन प्रपंच!
१) २०२२ अखेरीस झालेल्या कार्यकारणी सदस्यांच्या निवडणुकीत श्री. संदिप धोपटे, श्री. केशव गावडे व श्री. अनंत बांदिवडेकर निवडून आले. कार्यकारिणीच्या पहिल्या सभेत पदाधिकारी बहुमताने मताने निवडायचे असतात; परंतु कार्यकारणी सदस्यांना न विचारता एका कागदावर नाव लिहून आणली गेली व ती फक्त वाचून दाखविण्यात आली आणि पदाधिकारी जाहीर करण्यात आले. ह्याचा विरोध कार्यकारणी सभेत झाला; पण तो विश्वस्तांच्या नावावर खपविण्यात आला. (असे संस्थेला अडचणीत आणणारे अनेक प्रताप आजच्या विश्वस्थांनी ह्यापूर्वीही केलेले आहेत.) म्हणजे पहिल्याच कार्यकारणी सभेला लोकशाहीचा मुडदा पाडण्यात आला. हे सत्य आपण जाणून घेतले पाहिजे.
२) सहा महिन्यापूर्वी झालेल्या कार्यकारणी सदस्यांच्या निवडणुकीत सत्ताधारी लोकांनी २५ ते ३० लाख रुपये (संस्थेत मुद्दामहून तयार केलेला काळा पैसा) खर्च करून गैरमार्गाने निवडणूक जिंकून दाखविली. हा आमचा आरोप आहे. सदर निवडणुकीत किती खर्च झाला? तो खर्च कोणी केला? ती रक्कम आली कुठून? याबाबत कार्यकारणी सदस्यांनी गेल्या सहा महिन्यात अनेकदा प्रश्न उपस्थित केले. मात्र त्याचे उत्तर देण्याचे सामर्थ्य एकाही पदाधिकाऱ्यांमध्ये आणि विश्वस्तांमध्ये नाही.
३) गेल्या सहा महिन्यात अनेक वेळा कार्यकारणी सदस्यांनी जमाखर्च, व्हाऊचर प्रत्यक्ष तपासणीसाठी मागितली तर तो तुमचा अधिकार नाही. असं प्रत्येकवेळी पदाधिकाऱ्यांनी व विश्वस्तांनी सांगितले. पदाधिकाऱ्यांना आणि विश्वस्तांना पारदर्शकता का नको? किमान कार्यकारणी सदस्यांना तरी व्हाऊचर दाखवायला काय हरकत आहे? (पदासाठी ह्या गटातून त्या गटात प्रवास करणारे आताचे खजिनदार अनिल कोठारकर ह्याचे उत्तर देतील काय? ज्या अर्थी व्हाऊचर लपविली जातात त्याअर्थी त्यात भ्रष्टाचार होतो; असं समजायला हरकत नाही. कारण अशी अनेक बोगस व्हाउचर्स आताचे अध्यक्ष रवी गावकर यांनी २०१७ साली जाहीर सभेत दाखविली होती. त्या बोगस व्हाऊचरची चौकशी मात्र गेल्या सहा महिन्यात का झाली नाही?)
४) डॉ. शिरोडकर स्मारक मंदिर म्हणजेच संस्थेची इमारत पूर्णतः नादुरुस्त झाली. त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जात नाही आणि याबाबत कार्यकारणी सदस्यांना अजिबात विचारतच घेतले जात नाही. का?
५) समाज संस्थेला पदाधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे न्यायालयीन प्रक्रियेत अपयश येते. उलट संस्थेचे वकिलांवरती करोड रुपये खर्च होत आहेत. त्याबाबत कार्यकारणी सदस्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही.
६) मागाठाणे- बोरीवली येथे संस्थेच्या भूखंडावरती संस्थेने करोडो रुपये खर्च करून इमारत उभारली. पण त्या इमारतीमधून मिळणारे उत्पन्न संस्थेकडे जमा होत नाही. त्याबाबत कार्यकारणी सदस्यांना कोणतीच माहिती दिली जात नाही.
७) दरवर्षी समाज संस्थेला मा. धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयात जमाखर्चासह ऑडिट रिपोर्ट सादर करावा लागतो. त्याची प्रत मागणी करूनही कार्यकारणी सदस्यांना दिली जात नाही.
८) समाज संस्थेच्या सभासदांची नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, असलेली यादी कार्यकारणी सदस्यांना दिली जात नाही.
९) संस्थेच्या हितासाठी कारभार होणे अपेक्षित असताना आर्थिक व कायदेशीर प्रक्रियेत अडचणी निर्माण होतील असे निर्णय कार्यकारणी सदस्यांशी चर्चा न करता घेतले जात आहेत.
१०) समाज बांधव- भगिनींना खुले सभासदत्व देण्याचे ठरले असताना `श्री. सुरेश डामरे यांनी सुचविलेले सदस्य करू नका!' असे तथाकथित विश्वस्त भीमसेन आचरेकर सांगतो व कार्यकारणी सदस्यांची मागणी फेटाळून लावली जाते. आपल्या नात्यागोत्यातील पाहुण्यांना सभासद करून घेतले जाते. समाज बांधव भगिनींना डावलून आताचे विश्वस्त-पदाधिकारी काय साध्य करीत आहेत? असा आमचा सवाल आहे.
असे अनेक मुद्दे आहेत की आताचे पदाधिकारी व विश्वस्त बेबंदशाहीने वागतात. त्यामुळे समाज संस्थेचे अस्तित्व धोक्यात येत आहे. म्हणूनच कार्यकारणी सदस्यांना महात्मा गांधी यांच्या मार्गाने पदाधिकारी व विश्वस्त यांच्या विरोधात आंदोलन करायला भाग पाडलं गेलंय.
आजपर्यंत आम्ही `समाज माझा, मी समाजाचा! ह्या ब्लॉगवरती समाज संस्थेच्या हितासाठी २९ लेख लिहिले. संपूर्ण समाज बांधव- भगिनी जागृत झाले. पण पदांवर बसलेले पदाधिकारी मात्र हुकूमशाही पद्धतीत वावरत आहेत; म्हणूनच सन्मानिय कार्यकारणी सदस्य श्री. संदिप धोपटे, श्री. केशव गावडे आणि श्री. अनंत बांदिवडेकर यांनी गेले सहा महिने सामंजस्याची भूमिका घेतली, समाजाच्या भल्यासाठी पदाधिकाऱ्यांना-विश्वस्तांना समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला; पण पालथ्या घड्यावर पाणी...! शेवटी त्यांना डॉ. शिरोडकर साहेबांच्या पुतळ्याशेजारी आंदोलनाला बसावं लागलं. हा आजच्या पदाधिकाऱ्यांचा आणि विश्वस्तांचा पराभव आहे. हे लक्षात घ्यायला हवे!
शक्यतो विश्वस्त पदावरून कोणाला बाजूला केलं जात नाही. अशा प्रथा-परंपरेला छेद देऊन सन्मानिय विश्वस्त श्री. विश्वनाथ बांदिवडेकर यांना मुद्दामून इतर विश्वस्तांनी कपट कारस्थान करून काढून टाकले. याचा खुलासा समाजासमोर आजपर्यंत अन्य विश्वस्तांनी का केला नाही? निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा प्रचार करणारे व पदाधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे धृतराष्ट्राप्रमाणे पाहणारे इतर विश्वस्त मरेपर्यंत विश्वस्त पदावर चिकटून का बसणार आहेत? असा आमचा सवाल आहे. यापूर्वीही आम्ही विश्वस्तांचा समाचार घेतला आहे. पण मरेपर्यंत पदावर बसण्याच्या लालसेपोटी पदाधिकाऱ्यांशी संधान बांधून संस्थेला अडचणीत आणणारे निर्णय घेतले जातात; हे आम्ही पुराव्यासह सिद्ध केले. तरीही काहीच बदल घडत नाही.
खऱ्या अर्थाने सन्मानिय कार्यकारणी सदस्य श्री. संदिप धोपटे, श्री. केशव गावडे आणि श्री. अनंत बांदिवडेकर ह्या तिघांनी समाजाच्या भल्यासाठी जी भूमिका घेतली आहे, त्यास आमचा जाहीर पाठिंबा आहे. जो कोणी संस्थेच्या भल्यासाठी रोखठोक भूमिका घेईल, जो सभासदांसमोर गैरव्यवहाराचा लेखाजोगा मांडेल त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत. कारण `समाज माझा, मी समाजाचा!' ही चळवळ त्यासाठी उभी राहिली आहे.
क्षा. म. समाज बांधव भगिनींनी नातंगोतं व वैयक्तिक संबंध बाजूला ठेवून समाज हितासाठी जे कोणी समर्थपणे उभे राहतील त्यांना उघडपणे जाहीर पाठिंबा दिला पाहिजे. तरच डॉ. शिरोडकरांनी स्थापन केलेली आपली मातृतुल्य समाज संस्था वाचेल.
सन्मानिय सौ. मंगेशी मसुरकर यांनी आपल्या परीने गैरकारभार विरोधात गेल्या सहा महिन्यात आवाज उठविला आहे. त्यांनाही पदाधिकारी मुद्दामून डावलत आहेत. याचाही आम्ही निषेध करतोय. आता या तीन शिलेदारांनी सत्याचा मार्ग स्वीकारला. मग इतर सदस्य काय करतात? हा प्रश्न पडतोय. भविष्यात आपल्याला पदं मिळतील म्हणून आताच्या पदाधिकाऱ्यांच्या गैर कारभाराविरोधात इतर सदस्य ठोस भूमिका घेत नसतील तर, ते सुद्धा स्वार्थी ठरणार आहेत.
डॉ. शिरोडकर साहेबांना, एच. डी. गावकरसाहेबांना, विजयाताईंना स्मरून व श्रीगावेश्वर देवस्थानला घाबरून तरी सर्व कार्यकारणी सदस्यांनी गैरकारभार विरोधी भूमिका घ्यायलाच हवी! अशी आमची इतर कार्यकारणी सदस्यांकडून अपेक्षा आहे; नाहीतर ते पदांच्या लालसेपोटी गप्प बसले; असा इतिहास लिहिला जाईल.
समाज संस्था कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही म्हणून २०१२ ला स्वप्निलची पाटीलशाही लयाला गेली. पण त्यातून बोध न घेता त्याच पद्धतीने पदाधिकारी- विश्वस्त वागत आहेत. त्यांना माझी पुन्हा विनंती आहे; गैरकारभार थांबवा आणि समाज संस्था वाचवा! आहे तयारी...?
(क्रमशः)
-नरेंद्र राजाराम हडकर