लेखांक ३५ वा - क्षा. म. समाज संस्था चालकांनो ह्या प्रश्नांची उत्तरे द्या! अन्यथा भ्रष्ट कारभार सुरु आहे हे सिद्ध होईल!!


समाज माझा, मी समाजाचा! 

लेखांक ३५ वा - क्षा. म. समाज संस्था चालकांनो ह्या प्रश्नांची उत्तरे द्या! 

अन्यथा भ्रष्ट कारभार सुरु आहे हे सिद्ध होईल!! 

क्षा. म. समाज संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ०३ ऑगस्ट २०२५ रोजी झाली. नियमानुसार मी सभेच्यापूर्वी काही गंभीर प्रश्न लेखी स्वरूपात सेक्रेटरी भाऊ डगरे यांना दिले व त्याची उत्तरं वार्षिक सर्वसाधारण सभेत देण्यात यावीत असे कळविले; परंतु त्याची उत्तरं देण्याचे धाडस सेक्रेटरी भाऊ डगरे आणि तात्कालीन अध्यक्ष श्रीपाद फाटक यांनी दाखविले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार जाहीररीत्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार नाही; कारण आमची ही `परंपरा' आहे. अशा फालतू आणि भ्रष्ट कारभार लपविण्याच्या परंपरेने संस्था हित जपले जात नाही. हे समाजबांधव -भगिनींनी समजून घेतले पाहिजे. गेले पाच महिने माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत. म्हणून मी आणि सन्मा. संदिप धोपटे यांनी लेखी विचारलेले प्रश्न ह्या माध्यमातून सर्वांसमोर आणत आहे. संस्थेच्या हितासाठी आतातरी आम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं मिळतील; ही खोटी आशा आहे; ती आताच्या पदाधिकाऱ्यांनी खरी करावी; अन्यथा भ्रष्ट कारभार सुरु आहे हे सिद्ध होईल! 

मी विचारलेले प्रश्न-

१) डॉ. शिरोडकर स्मारक मंदिराच्या संपूर्ण इमारतीच्या सीसीटीव्हीवर ह्यावर्षी, गेल्यावर्षी संस्थेचा किती खर्च झाला? लाखो रुपयांचा खर्च होऊनही ते नादुरुस्त झालेत, त्याला जबाबदार कोण? त्यामुळे एका कर्मचाऱ्याला अटक झाली; त्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना का मिळाले नाही?

२) सीसीटीव्ही कामासाठी, हॉलच्या दुरुस्तीसाठी, अन्य कामांसाठी करोडो रुपयांची कामे ठेकेदारांकडून होतात. त्यांच्याकडून अनामत रक्कम / सुरक्षा ठेव म्हणून किती रक्कम संस्थेकडे ठेवली जाते? 

३) नाटे येथे दर्जेदार इमारत बांधणारे समाजबांधव मंगेश धोपटे यांना कामाची दहा टक्के रक्कम अद्याप का देण्यात आली नाही? अधिकचे काम करूनही त्यांनी संस्थेकडे रीतसर ताबा दिला. तरीही ही अडवणूक का? ( ता. क.- वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर मंगेश धोपटे यांना केलेल्या कामाची दहा टक्के रक्कम दिली गेली.)  

४) कार्यकारणी सदस्य सन्मानिय संदीप धोपटे यांना निलंबित का केले? त्याचा सविस्तर अहवाल, चौकशी अहवालासह संदीप धोपटे यांना का देण्यात आला नाही? 

५) २०१२ पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी विविध न्यायालयांमध्ये बोगस कागदपत्रे सादर केली आहेत. त्यासंदर्भात मी लेखी निवेदन दिले होते. त्याबाबत संस्थेने आजपर्यंत कोणती कारवाई केली? त्याचे सविस्तर विवरण द्यावे! 

६) २०१२ पूर्वी ज्यांनी ज्यांनी संस्थेमध्ये गैरव्यवहार करण्यात साथ दिली, त्याचे लेखी पुरावे आहेत. त्यांची कार्यकारणीवर, सुकाणू समितीवर आणि विश्वस्त समितीवर नेमणूक कशी होते?  

७) संस्थेच्या कार्यकारणी निवडणुकीत २०२२ साली संस्थेचे बेहिशोबी रक्कम सुमारे २५ लाख रुपये खर्च केले. ह्या बेहिशोबी रक्कमेच्या आधारे सभासदांनी संस्थेच्या हितासाठी घेतलेल्या भूमिकेला दाबण्यात येते. ह्या बेहिशोबी म्हणजेच `ब्लॅक मनी'चा लेखाजोगा सभासदांना का दाखविला जात नाही? 

८) २०२२ साली झालेल्या संस्थेच्या कार्यकारणी निवडणुकीत झालेल्या गैरकारभाराबाबत चौकशी समिती नेमण्यात यावी; अशी मागणी सभासदांनी केली होती. त्यावर अद्याप कार्यवाही का झाली नाही? 

९) मागाठाणे येथील भूखंड संस्थेला माध्यमिक शाळेसाठी मुंबई महानगर पालिकेने दिला. तिथे संस्थेने ह. ध. गावकर विद्या संकुल सुमारे १०-१२ कोटी रुपये खर्च करून उभारले. त्या वास्तूत  संस्थेची माध्यमिक शाळा सुरु कधी करणार? त्या इमारतीचा संपूर्ण ताबा संस्थेकडे कधी येणार? तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक असणारा मुंबई महानगर पालिकेचा कर कधी भरणार? दोषींवर कारवाई कधी करणार? 

१०) संस्थेच्या माध्यमातून जे कामकाज केले जाते त्यातून मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार, धर्मादाय आयुक्त, सीबीएससी बोर्ड, जीएसटी विभाग आणि शासनाच्या प्रशासनाशी तसेच सभासदांची दिशाभूल केली जाते. ती कधी थांबणार?

११) अपना बँकेच्या माध्यमातून ६० लाख रुपयांचा अपहार झाला. ती रक्कम मिळविण्यासाठी आजतागायत काय कार्यवाही केली?

१२) संस्थेच्या एका विद्वान माजी विश्वस्ताने मागाठाणे येथील ठेकेदार घोसाळकर याला १३ कोटी रुपयांपेक्षा जास्तही रक्कम देण्याबाबत सविस्तर पत्र लिहिले होते. सदर १३ कोटी रुपये मिळविण्याबाबत काय कार्यवाही झाली?   

सन्मा. संदिप धोपटे यांनी विचारलेले प्रश्न-

१) संस्थेच्या शैक्षणिक संस्थांमधून पुस्तके, शालेयपयोगी वस्तू खरेदी- विक्रीतून व इतर निधीतून जे उत्पन्न मिळते त्याचा हिशोब जमाखर्चात दाखविला जात नाही. मग ती रक्कम कोणाकडे असते? आजतागायत ती रक्कम किती आहे? त्या रक्कमेचा वापर कुठे केला जातो? त्या रक्कमेचा धनी कोण? 

२) संस्थेने नेमणूक केलेल्या कॅटरिंग ठेकेदारांची मुदत जून २०२५ च्या सुमारास संपली. नवीन कॅटरिंग ठेकेदारांची नेमणूक केली का? त्यांच्याशी करारनामा केला का? मुदत संपलेल्या कॅटरिंग ठेकेदारांची अनामत ठेव ८५ लाख रुपये परत केली का? नसल्यास ती रक्कम कुठे आहे? 

३) मागाठाणे येथील ह. ध. गावकर विद्या संकुलासाठी आपल्या शिक्षक वृंद पतपेढीकडून सुमारे २२ लाख रुपये घेण्यात आले होते. ते २२ लाख रुपये १२ वर्षे झाली तरी आजपर्यंत देण्यात का आले नाहीत आणि ती रक्कम कधी देण्यात येईल? 

४) मागाठाणे येथील भूखंड संस्थेला माध्यमिक शाळेसाठी मुंबई महानगर पालिकेने दिला. तिथे संस्थेने ह. ध. गावकर विद्या संकुल सुमारे १०-१२ कोटी रुपये खर्च करून उभारले. त्या वास्तूत  संस्थेची माध्यमिक शाळा सुरु कधी करणार? त्या इमारतीचा संपूर्ण ताबा संस्थेकडे कधी येणार? तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक असणारा मुंबई महानगर पालिकेचा कर कधी भरणार? 

५) डॉ. शिरोडकर समाज मंदिर सभागृहाची- हॉलची दुरुस्ती करण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. कारण त्यातून संस्थेला उत्पन्न मिळू शकेल. गेल्या दोन वर्षात सदर हॉलचे किती उत्पन्न मिळाले? 

६) मिठबांव येथील शैक्षणिक वास्तू पूर्णतः जीर्ण झाल्या आहेत. त्या नव्याने बांधणे आवश्यक आहेत. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. मिठबांव येथील कलम बागेतून मिळालेले उत्पन्न सुमारे ५० लाख रुपये त्यासाठी वापरले जाणार का? जर सदर रक्कम अन्य कामकाजासाठी वापरल्यास मिठबांव येथील सभासदांकडून व्यक्त होणाऱ्या रोषास जबाबदार कोण असेल? 

७) डॉ. शिरोडकर हायस्कुल जुनी व नवीन इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा अद्ययावत आहे का?  

८) दिनांक ०१/०४/२०२५ रोजी मा. सरचिटणीस, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था, मुंबई यांना `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था, मुंबई' ह्या संस्थेच्या कार्यकारिणीच्या मंडळातून केलेले बेकायदेशीर निलंबन त्वरित मागे घेण्याबाबत आणि त्यासंदर्भात पाठविलेल्या पत्रात जे संदर्भ नमूद केले आहेत त्याच्या प्रमाणित प्रती मिळण्याबाबत पत्र दिले होते; त्याचे अद्यापही उत्तर का देण्यात आले नाही? मागणी केलेल्या प्रमाणित प्रती कधी मिळणार?

संस्थेच्या आजपर्यंतच्या बेजबाबदार कारभारावरून वरील २० प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळतील असं वाटत नाही. समाजबांधव- भगिनींना विनंती आहे की, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना, विश्वस्तांना, सुकाणू समिती सदस्यांना हे प्रश्न तुम्ही विचारा! अगदी खाजगीत विचारलात तरी चालेल! जर तुमचे समाधान झाले तर आम्हाला अवश्य कळवा! अन्यथा  क्षा. म. समाज संस्था चालकांचा भ्रष्ट कारभार कसा सुरु आहे; हे तुम्हालाही समजून येईल! लवकरच भेटू पुढील लेखाच्या माध्यमातून! 

-नरेंद्र हडकर (पत्रकार)