समाज माझा, मी समाजाचा!
लेखांक ३४ वा - त्याग व समर्पणाचे प्रतीक आणि समाजमातेचे `स्त्रीधन' विकण्याचा `सडका' विचार!
क्षा. म. समाज बांधव भगिनींना खूप दिवसांनी ह्या सदराच्या माध्यमातून नमस्कार!
१८ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध झालेला ३३ वा लेख हा तसा प्रासंगिक आणि डॉ. शिरोडकर साहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी होता! तर लेखांक ३२ वा ६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिद्ध झाला. त्या लेखाचे शीर्षक होते, `आता तरी संस्थेच्या हितासाठी शहाणपणा दाखवा!' असं अनेकदा नम्र आवाहन करूनही शहाणपणा आलाच नाही. २० जुलै २०१७ रोजी प्रसिद्ध झालेला पहिला लेख ते एक वर्ष पाच महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेला ३२ वा लेख; हा काळ काही कमी नाही; पण क्षा. म. समाज संस्था चालविणाऱ्या यंत्रणेने आपले तेच खरं करून स्वस्वार्थापोटी समाज संस्थाच लयास नेली! (जे लाभार्थी आहेत, ते हे मान्य करणार नाहीत!)
बुडते हे जन न देखवे डोळा। येतो कळवळा म्हणोनिया।।
क्षा. म. समाज संस्था यंत्रणेमध्ये असणारे सर्वच आमचे जवळचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांना क्षा. म. समाज संस्थेत बेजबाबदारपणे, स्वार्थीपणे काम करण्याची मुभा नाही. त्यांच्याशी संबंध बिघडतील म्हणून त्यांच्या चुकीच्या कामांना आणि संस्थेच्या हितासाठी योग्य काम न करण्याच्या कृतीला समर्थन मिळणार नाही. त्यामुळे आम्ही संस्थेला अडचणीत आणणाऱ्यांचा रोखठोकपणे जाहीररीत्या समाचार घेतला, प्रश्न विचारले, समाज हितासाठी विनंती केली; पण आजपर्यंत सगळं व्यर्थ गेलं! आपल्याच नातेवाईकांवर असं जाहीर लिखाण करणं योग्य नाही; असं कधी कधी वाटतं आणि आम्ही काही काळ थांबतो! पण क्षा. म. समाज संस्था लयास जात असताना मूग गिळून गप्प बसणे हे माझ्या `पत्रकारितेला' शोभणारे नाही; याची जाणीव होते आणि पुन्हा पुन्हा लेखणीला प्रकट व्हावं लागतं! असो!
आजचा विषय अतिशय संतापजनक असा आहे आणि तो मला कालच समजला म्हणून समाज बांधव भगिनींना तो सांगावा म्हणून हा लेखन प्रपंच! `स्त्रीधन' हा शब्द आपल्या सर्वांना माहीत असेलच! समाजमाता विजयाताई गावकर यांचे दागिन्यांच्या रूपामध्ये असलेले `स्त्रीधन' आजही संस्थेच्या ताब्यात आहे! विजयाताईंनी आपल्या पतीच्या म्हणजे एच. डी. गावकर साहेबांच्या आदर्शानुसार क्षा. म. समाज संस्थेसाठी आपलं आयुष्य आणि आपला संसार समर्पित केला! समाज संस्थेकडे दुर्लक्ष होऊ नये आणि समाज संस्थाच आपले `मुल' आहे; या पवित्र भावनेने ह्या उभयतांनी स्वतःला `मुल'ही होऊ दिले नाही! केवढा मोठा हा त्याग! ह्या त्यागाची तुलना कशानेही होऊ शकणार नाही! डॉ. रामचंद्र शिरोडकर साहेबांचे समर्पण आणि एच. डी. गावकर साहेबांचा त्याग ह्यावर क्षा. म. समाज संस्थेचा किल्ला समर्थपणे उभा होता; परंतु २००७ पासून २०१२ पर्यंत संस्थेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी आणि तेच पदाधिकारी २०१२ पासून आजतगायत विश्वस्त म्हणून मिरवतात; त्यांनी जे काही केलं ते समाज संस्थेला बरबादीकडे नेणारे होते आणि आहे! त्यांच्या समाज अहित करण्याच्या विरुद्ध जो कोणी कृती करेल त्याला समाजद्रोही ठरविण्याचे, त्याची बदनामी करण्याचे, त्याला यंत्रणेतून बाजूला करण्याचे `कुंभाड' रचण्याचे कर्तृत्व विश्वस्त मंडळी करीत आहेत. ह्याच विश्वस्तांनी आता समाजमाता विजयताईंचे `स्त्रीधन' विकण्याचे ठरविले आहे! कारण काय? तर म्हणे समाजमाता विजयताई यांचे स्त्रीधन (दागदागिने) सांभाळणे कठीण आहे! ह्याचा अर्थ ते स्वतः `लायक' नसल्याचे सिद्ध करताहेत. अगदी जहाल भाषेत आम्ही ह्याबाबत काही सवाल उपस्थित केले तर... ती वेळ आमच्यावर आणू नका!
विजयाताईंचे `स्त्रीधन' हे त्या त्यागाचे - समर्पणाचे प्रतीक आहे, तो ठेवा वर्षानुवर्षे जपून ठेवला पाहिजे! एवढेच नाही तर धर्मादाय आयुक्त कार्यालयात परिशिष्ट १ वर त्याची कायदेशीर नोंदही केली पाहिजे! असे माझे म्हणणे आहे! समर्पणाचा - त्यागाचा ठेवा जपून ठेवला तरच उद्याची पिढी त्याचा आदर्श घेतील! त्या विचारांना आपलंस मानतील! मात्र सडक्या मेंदूतून समर्पणाचा- त्यागाचा ठेवा विकण्याचा विचार आल्यामुळे आता समाज बांधव- भगिनींनी ह्याला ठामपणे विरोध करायला पाहिजे! डॉ. शिरोडकर साहेब, एच. डी. गावकर व विजयाताई ही समाज संस्थेची दैवतं आहेत! त्या दैवतांनी स्वकष्टाने उभारलेल्या यंत्रणेत काम करताना प्रामाणिकपणा- निस्वार्थीपणा असायलाच पाहिजे! त्या यंत्रणेत स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा कोणी पदांवर बसेल तेव्हा तो लाभार्थी होईल आणि अशा लाभार्थ्यांनीच समाज संस्थेवर बिकट अवस्था आणली आहे! आम्ही लाभार्थी नव्हतो आणि नसणार! कारण `क्षा. म. समाज माझा आणि मी समाजाचा' हा पवित्र भाव आमच्या मनात आहे!
स्त्रीधनावर फक्त आणि फक्त त्या स्त्रीचा अधिकार असतो! हे सर्वोच्च न्यायालयातही सिद्ध झाले आहे! त्यात समाजमाता विजयाताईंचे स्त्रीधन आमच्यासाठी पवित्र आहे, पूज्य आहे! ते स्त्रीधन विकण्याचे पाप कोणीही करू नये; असे मला वाटते! समाज बांधव भगिनींनी ह्यावर अवश्य विचार करावा! समाजमाता विजयाताईंचे पवित्र स्त्रीधन विकून क्षा. म. समाज नैतिकतेचा `पराभव' करण्याचा सडका विचार थांबलाच पाहिजे!
-नरेंद्र हडकर (पत्रकार)