समाज माझा, मी समाजाचा!' ह्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेल्या लेखांमधून तसेच क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या गेल्या १० वर्षातील पदाधिकाऱ्यांना अनेकवेळा जाहीर आवाहन करूनही समाज संस्थेने करोडो रुपये खर्च करून उभारलेल्या इमारतीबाबत वास्तव मांडण्याचे धाडस कोणी दाखविले नाही. शेवटी शनिवार १२ मार्च २०२२ क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज परिवर्तन समितीने एक श्वेतपत्रिका काढून समाज बंधाब भगिनींसमोर सत्य मांडलं होतं. ती श्वेतपत्रिका आम्ही आमच्या ह्या ब्लाँगवर जशास तशी प्रसिद्ध करीत आहोत. कारण समाज संस्थेच्या भल्यासाठी `समाज माझा, मी समाजाचा!' ह्या चळवळीशी निगडित असणारे वास्तव त्यात मांडले गेले आहे. (शनिवार १२ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता सेंट्रल रेल्वे अकादमी हॉल, सेंट्रल रेल्वे वर्कशॉप, परळ, मुंबई येथे सदर श्वेतपत्रिका जाहीर केली तेव्हा माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने श्वेतपत्रिकेतील सर्व कागदपत्रे व दस्तऐवज मी सादर केले होते.)
-नरेंद्र हडकर
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज सभासद बांधव-भगिनींनो,
क्षा. म. समाज, मुंबई संस्था वाचविण्यासाठी आणि संस्थेच्या भल्यासाठी
वाचा, विचार करा आणि निर्णय घ्या!
क्षात्रकुलोत्पन्न क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था संचलित के. एम. एस. एज्यूकेशन इन्स्टिट्यूशन परेल, मुंबई ह्या संस्थेने करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीतून मिळालेले कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न कोणाच्या घशात गेले? त्याला जबाबदार कोण? मागाठाणे प्रकल्पात गैरव्यवहार करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल का करण्यात येऊ नयेत? म्हणून हे पत्रक संपूर्णपणे वाचा, त्यावर विचार करा आणि क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था वाचवा!
मराठा समाजाचे आद्यसंस्थापक डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांनी शैक्षणिक संस्थांचे इवलेसे रोपटे लावले, वाढविले. पुढे शिक्षणमहर्षी एच. डी. गावकर यांनी त्याचे रूपांतर वटवृक्षात केले. प्रामाणिक, निस्वार्थी वृत्तीने कार्य करीत असताना ह्या दोन महान युगपुरुषांनी समाजबांधवांना आपल्या कार्यात सामावून घेतले. त्यानंतर आलेले नेतृत्व मात्र २००४ पासून पुत्र प्रेमाने अंध झाले आणि क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेला अडचणीत आणण्यात आले. २००७ पासून स्वप्नीकची `पाटीलशाही’ उदयास आली. मात्र तात्कालीन पदाधिकाऱ्यांनी संस्था विरोधी कारवायांना न रोखता मूक समर्थन केले. हे वास्तव आता दस्तऐवज (कागदपत्रे) समाजबांधवांना ओरडून ओरडून सांगत आहेत. समाजबांधव-भगिनींनो आता तरी समजून घेऊ या आणि समाजसंस्थेला वाचवू या. आम्हा जातीची ओळख असणारी संस्था वाचली तर आमचा स्वाभिमान चिरंतर जिवंत राहील अन्यथा आमच्या पुढच्या पिढीला जातीची ओळखही सांगत येणार नाही. आता तरी समाज संस्थेला वाचविण्यासाठी पुढाकार घेऊ या; नाहीतर आम्हाला इतिहास माफ करणार नाही. आमची पुढील पिढी आम्हाला आरोपीच्या कोठडीत उभी केल्याशिवाय राहणार नाही.
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे आद्यसंस्थापक डॉ. रामचंद्र शिरोडकर आणि शिक्षण महर्षी एच. डी. गावकर यांनी संस्थेचे रूपांतर वटवृक्षात केले; पण त्याच वटवृक्षाच्या फांद्या, पारंब्या, पाळेमुळे तोडण्याचे काम ठराविक पदाधिकाऱ्यांनी केले. ते वास्तव आता आपण जाणून घेऊया!
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था संचलित के. एम. एस. एज्यूकेशन इन्स्टिट्यूशन परेल, मुंबई या शैक्षणिक संस्थेला बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी सन २००४ मध्ये भूखंड मिळाला. त्यानुसार सीटीएस नंबर ८९ (भाग), मागाठणे, बोरिवली पूर्व, मुंबई येथील भूखंडावर समाजसंस्थेने इमारत उभी केली. समाजाचे कोट्यावधी रुपये त्यासाठी खर्च झाले. असे असूनही त्या प्रकल्पातून समाजाच्या तिजोरीत आजतगायत कोणतीही रक्कम जमा नाही.
अगदी भूखंड ताब्यात घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर आजमितीस झालेले सर्व व्यवहार / आर्थिक व्यवहार / करार हे समाज संस्थेस नुकसानकारक आहेत. उदाहरणार्थ …
१) निविदा काढणे, मंजूर करणे, चुकीचे ठराव करणे,
२) इमारत बांधणे, विकासकाला कराराचे उल्लंघन करून करोडो रुपये देणे,
३) महानगर पालिकेसोबत झालेल्या कराराचा भंग करीत इमारत दुसऱ्या व्यावसायिक संस्थेला व व्यावसायिक वापरासाठी चुकीच्या पद्धतीने देणे,
४) त्यासाठी चुकीच्या पद्धतीने करारपत्र करणे,
५) करारपत्रातील तरतुदींचा भंग करणे आणि आजमितीस ही उभारलेली इमारत समाज संस्थेच्या ताब्यात नसणे…
अशा अनेक चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यास तात्कालीन कार्यकारिणी मंडळाचे पदाधिकारी जबाबदार होते आणि हेच पदाधिकारी आज विश्वस्त म्हणून कार्यरत असल्याने मागाठणे प्रकल्पातून कोट्यवधी रुपयांचा लाभ समाजसंस्थेला होणार होता, तो अद्याप झालेला नाही. उलट सध्या त्या इमारतीसह भुखंडही समाज संस्थेच्या हातून निसटून जाण्याची गंभीर, दुर्दैवी आणि संतापजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे.
या सर्व समाजसंस्था विरोधी घटनांना जबाबदार कोण? हे आपण समाज बांधवांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही ह्या पत्रकातून मागाठणे प्रकल्पाचे सत्य आपल्यासमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. हे पत्रक म्हणजे हवेतील आरोप नसून उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे तयार केलेली त्रोटक श्वेतपत्रिका आहे. जर कोणाला या संदर्भातील कागदपत्रे-दस्तऐवज प्रत्यक्ष पाहायची असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि खात्री करून घ्यावी. मात्र मुळापासून या गंभीर प्रकरणाची चिकित्सा समाजबांधव- भगिनींनी करण्यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
आता घटना पाहूया आणि मागाठणे शैक्षणिक प्रकल्पामध्ये गैरकारभार करणाऱ्या व्यक्तींचे प्रताप समजून घेऊया;! ठराविक जणांच्या बेजबाबदारपणा, नाकर्तेपणामुळे आज समाज संस्था पूर्णतः आर्थिक अडचणीत आली आहे आणि समाज संस्थेचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे.
१८ मे २००४:- महानगरपालिका माध्यमिक शाळेसाठी (मुन्सिपल सेकंडरी स्कूल) आरक्षित असलेला भूखंड सीटीएस नंबर ८९, मागाठणे बोरिवली पूर्व मुंबई, ताब्यात देण्याबाबतचे महानगरपालिकेचे पत्र संचालक के. एम. एस. शिक्षण संस्थेला पाठविण्यात आले. (निष्कर्ष- हा भूखंड क्षा. म. समाज संस्थेच्या शिक्षण संस्थेलाच मिळाला.)
२५ मे २००५:- १८ मे २००४ च्या पत्रानुसार समाज संस्थेने वरील ठिकाणी १४६८ स्क्वेअर मीटर भूखंड ताब्यात घेतल्याचे ताबा पावती (पझेशन रिसीट) मध्ये के. एम. एस. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचे तत्कालीन संचालक-विश्वस्त क्षा. म. शिक्षण संस्था, १४२/४९ डॉ. अ. बोर्जेस रोड, परेल, मुंबई १२ यांची सही आहे.
८ सप्टेंबर २००६:- बिफोर प्लिंथ सीसी के. एम. एस. एज्युकेशन इन्स्टिट्यूट संस्थेला प्राप्त झाली.
३० जानेवारी २००८:- ५० लाख रुपयांच्या बिनव्याजी ठेवी स्वीकारण्याची सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडून परवानगी मिळाली. त्याची मुदत फक्त सहा महिने होती. परंतु साडेतीन करोड रुपयांच्या ठेवी नियमांच्या भंग करून स्वीकारण्यात आल्या. तसेच मुदतीनंतरही ठेवी स्वीकारण्यात आल्या. धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या नियमांना-अटींना न जुमानता ठेवी जमविल्या व त्याचा हिशोब धर्मादाय आयुक्तांना तसेच समाज संस्थेला देण्यात आला नाही. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी त्यावेळी संस्थेस कारवाईची नोटीस पाठविली आहे. हे सत्य आजच्या विश्वस्तांनी लपवून का ठेवले?
६ जून २००८:- कमेन्समेंट सर्टिफिकेट
२८ एप्रिल २००९:- संपूर्ण इमारत बांधण्याची सीसी मिळाली. तळमजल्यासह साडेचार मजले बांधण्याची परवानगी मिळाली; परंतु आजमितीस साडेतीन मजले बांधलेले आहेत. याचाच अर्थ इमारतीचे काम अपूर्णावस्थेत आहे.
१९/०७/२००९ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घटना दुरुस्ती करून सीईओ पद निर्माण करण्यात आले. ज्यामुळे समाज संस्थेला आजही गंभीर दुष्परिणामांना सामोरं जावं लागत आहे. सीईओ पद निर्माण करण्याकरिता समाजातील तात्कालीन पदाधिकारी, विश्वस्त, सुकाणू समिती सदस्य यांनी खास स्वप्नीकची मर्जी आणि स्वतःची पदे सांभाळण्यासाठी अतिशय विकृत पद्धतीने काम केले.
१५/०७/२००९ रोजी झालेल्या कार्यकारणी सभेच्या ठरावानुसार तात्कालीन सेक्रेटरी विश्वनाथ बांदिवडेकर यांनी ठेकेदार प्रकाश घोसाळकर यांना १६/०७/२००९ रोजी पत्र पाठविले व त्यात ते म्हणतात, ``सभागृहाचे काम लवकरात लवकर सुरु करावे.'' ह्याचा अर्थ ह्या इमारतीमधील सभागृह तयार करण्याचे काम ठेकेदार घोसाळकर यांनी केले. तशी बिलं ठेकेदार घोसाळकर यांनी सन २०१२ मध्ये विश्राम मुंबरकर यांच्याकडे सादर केली आहेत. मग इमारतीच्या बांधकामाचा (ठेकेदाराशी झालेल्या करारात नमूद केलेला) खर्च कमी का झाला नाही?
२१ नोव्हेंबर २००९:- स्वप्निक फाटक याच्याशी झालेला क्षा. म. समाज मुंबई यांचा सामंजस्य करार (मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग) समाज संस्थेच्या मुळावर येणारा ठरला. सदर करार करताना त्यावेळी खालील पदाधिकारी कार्यरत होते व त्यांच्या सह्या त्या करारावर आहे.
१) प्रदीप लुडबे- उपाध्यक्ष, २) विश्राम मुंबरकर- सरचिटणीस, ३) भिमसेन आचरेकर- खजिनदार आणि इतर…
हा करार करताना कशाचा आधार घेतला गेला?
सुधारित वरील घटनेतील घटना कलम २३/५ अनुसार करार करण्यात आला. या कलमाची तरतूद २३/०७/२००६ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेने नियुक्त केलेल्या घटना दुरुस्ती समितीने केली. या समितीत कोण होते?
१) चंद्रकांत गणेश जोगल- अध्यक्ष, २) विश्वनाथ बाबू बांदिवडेकर- सरचिटणीस, ३) रामचंद्र दाजी फाटक- सभासद, ४) सावळाराम नेवाळकर- सभासद, ५) अंकुश विष्णू डगरे – सभासद, ६) विश्राम हरी मुंबरकर- सभासद, ७) स्वप्निल सुभाष फाटक- सभासद, ८) सुभाष शंकर फाटक आणि इतर १२ जण
सुभाष फाटक यांनी आपल्या मृत्युपत्रात असे नमूद केले आहेत की, समाज संस्थेचा संपूर्ण कारभार करण्याकरिता माझ्यानंतर माझा मुलगा स्वप्नीक फाटक याला समाज संस्थेने सर्व अधिकार द्यावेत. त्या मृत्यूपत्रावर १) सावळाराम नेवाळकर, २) विश्राम मुंबरकर, ३) अंकुश डगरे, ४) विश्वनाथ बांदिवडेकर इत्यादींच्या सह्या आहेत. असे करून ह्या पदाधिकाऱ्यांनी समाज संस्था सुभाष फाटक यांच्या वैयक्तिक मालकीची असल्याचे मान्य केले व स्वप्नीक फाटक याची सीईओ म्हणून नेमणूक करण्यात आली.
स्वप्निक फाटक बरोबर झालेला सामंजस्य करारात कोणते मुद्दे आहेत?
स्वप्नील फाटकची सीईओ म्हणून १९/०७/२००९ पासून सहा वर्षासाठी नेमणूक करण्यात येऊन शिक्षण संस्थांशी निगडित सर्वाधिकार प्रदान करण्यात आले. त्याचा दुरुपयोग करून स्वप्निक फाटकने स्वतः मालक असल्याप्रमाणे समाजसंस्थेची व शिक्षणसंस्थांची मालमत्ता संबंधी करार केले. म्हणूनच आज समाज संस्था अडचणीत आली आहे. याला सर्वस्वी जबाबदार संबंधीत पदाधिकारी आहेत.
सामंजस्य करारात कोणते मुद्दे ?
१) कराराप्रमाणे सीईओ स्वप्निक फाटकने दर महिन्याला केलेल्या कामकाजाचा सर्व अहवाल समाजसंस्थेचे कार्यकारी मंडळ, अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना देणे बंधनकारक असताना तसा अहवाल त्याने एकदाही दिला नाही. मग तत्कालीन अध्यक्ष, सरचिटणीस व कार्यकारी मंडळ गप्प का बसले? करारात नमूद असतानाही स्वप्निक फाटकशी झालेला करार रद्द का करण्यात आला नाही? याचे उत्तर आजच्या विश्वस्तांकडून सभासदांना हवे आहे.
२) स्वप्नीकने केलेल्या करारानुसार ठेकेदार प्रकाश घोसाळकर वार्षिक ३० लाख रुपये समाज संस्थेकडे जमा करणार होते. आजपर्यंत किती रक्कम समाजाकडे आली? ठेकेदार घोसाळकर याच्याशी करार करण्याच्या ठरावावर अनुमोदक भाऊ डगरे आहेत.
(स्वप्निक फाटक बरोबर झालेल्या सामंजस्य करारातील मुद्दे विद्यमान सरचिटणीस वकील भक्ती जोगल यांनी दिंडोशीच्या न्यायालयात सुमन एज्युकेशनच्या केससंदर्भात समाजाच्या जबाबामध्ये मांडून तात्कालीन पदाधिकारी यांचा गलथानपणा समोर आणला आहे.)
तेव्हा... १) सावळाराम नेवाळकर- अध्यक्ष, २) प्रदीप लुडबे- उपाध्यक्ष, ३) विश्राम मुंबरकर- सरचिटणीस ४) भिमसेन आचरेकर- खजिनदार होते.
कार्यकारी मंडळाने करारातील तरतुदीनुसार सीईओकडून काम करून घ्यायला पाहिजे होते; पण कार्यकारी मंडळ, पदाधिकारी आणि विश्वस्त स्वप्नीक फाटकच्या गैरकृत्यात - गैरकारभारात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहभागी होते. म्हणूनच त्यांनी मूग गिळून गप्प राहण्याची भूमिका घेतली.
इमारत बांधकामासाठी खर्च सुधारित निविदेप्रमाणे (तळघराचे बांधकाम रद्द झाल्याने) ३ कोटी ५४ लाख रुपये इतका असतानाही समाजाचे तात्कालीन अध्यक्ष सावळाराम नेवाळकर व सीईओ स्वप्नीक फाटक यांच्या संयुक्त सह्यांनी समाज संस्थेचे २५/०६/२००८ ते १९/०५/२०१२ दरम्यान ५ कोटी ६ लाख ६६ हजार ४७० रुपये ३३ चेकने (धनादेशाद्वारे) ठेकेदाराला देण्यात आले. तरीही बांधकाम अपूर्ण आहे. तेव्हा समाज संस्थेला अडचणीत आणणारे, ठराव करणारे, चेकवर सह्या करणारे हेच पदाधिकारी होते. त्यांनी कोणतीही खातरजमा न करता एवढी मोठी रक्कम दिली.
विशेष म्हणजे अतिरिक्त १ कोटी ६६ लाख रुपये ठेकेदाराला देण्यापूर्वी कोणत्याही सभेची मंजूरी घेण्यात आली नव्हती, तरीही तात्कालीन अध्यक्षांनी चेकवर सह्या केल्या. ह्या सर्व गैव्यवहाराला तात्कालीन अध्यक्ष सावळाराम नेवाळकर यांनी हातभार लावलेला आहे.
सरचिटणीस म्हणून विश्वनाथ बांदिवडेकर काम करीत असताना २३/०६/२००९ रोजी कार्यकारी मंडळाच्या सभेत एक ठराव मंजूर करण्यात आला. त्यात असे म्हटले आहे की, क्षा. म. स. शिक्षण संस्थांच्या सुव्यवस्थित संचालनासाठी तसेच मागाठाणे येथील इमारतीच्या उभारणीसंबंधी निधी उपलब्ध करण्याबाबत अधिकार सीईओ स्वप्नीक फाटक यांना देत आहे.
मागाठाणे इमारतीतील हॉलची ठेकेदारी देण्याचा करार स्वप्नीक फाटकने सीईओ म्हणून १८/०७/२००९ रोजी केला आणि स्वप्नीक फाटकची सीईओ म्हणून नेमणूक झाली १९/०७/२००९ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार! असा खोटा ठराव करणारे सूचक अनुमोदक आणि तत्कालीन सेक्रेटरी सर्व गैर कारभाराला जबाबदार नाहीत का?
स्वप्नीक फाटकची सीईओ म्हणून नेमणूक झाली १९/०७/२००९ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार मग २३/०६/२००९ रोजी कार्यकारी मंडळाच्या सभेत वरील प्रमाणे ठराव कसा काय घेण्यात आला?
ह्या ठरावानुसार ठेकेदाराकडून स्वप्नीक फाटकने मागाठाणे इमारतीसाठी करोडो रुपयांची रक्कम बिनव्याजी अनामत म्हणून घेतली. धर्मादाय आयुक्त्यांच्या आदेशानुसार जी ठेकेदाराकडून घ्यायची नव्हती.
ह्याचा अर्थ स्वप्नीक फाटक जर १०० टक्के दोषी असेल तर तात्कालीन पदाधिकारी व आताचे विश्वस्त १००० टक्के दोषी दिसतात. कारण त्यांच्या सहीने-सहमतीने स्वप्नीक फाटक सीईओ झाला व संस्थेचा निधी गिळंकृत करण्यात आला.
आता आपण मागाठणे इमारतीचा कसा खर्च करण्यात आला? ते पाहूया...
११ ऑक्टोबर २००७:- के. एम. एस. एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मागाठणे येथे इमारत बांधून देण्यासाठी बच्चू सामजी या ठेकेदाराबरोबर करार केला. तत्पूर्वी कार्यकारी मंडळात ठराव झाला, त्यावर सूचक म्हणून भिमसेन आचरेकर यांचे नाव आहे. तर तेव्हाचे सरचिटणीस म्हणून विश्वनाथ बांदिवडेकर यांची सही आहे. तर ठेकेदारसोबतच्या करारावर एस. एस. फाटक आणि विश्वनाथ बांदिवडेकर यांची सही आहे.
घटनाक्रम----
• ६ एप्रिल २००८ रोजी ठेकेदाराबरोबर इमारत बांधकाम करण्याकरिता करार झाला.
• ६ जून २००८ रोजी इमारतीच्या फाउंडेशनपर्यंत काम करण्याची सी सी (परवानगी) मिळाली.
• २५ जून २००८ रोजी १ कोटी रुपये ठेकेदाराला दिले. एकूण रकमेच्या फक्त १० टक्के रक्कम देणे करारात नमूद होते म्हणजेच ३५ लाख रुपये द्यायचे होते; मात्र दिले गेले १ कोटी रुपये.
२८ एप्रिल २००९ संपूर्ण इमारत बांधण्याची सीसी मिळाली. तोपर्यंत दीड कोटी रुपये ठेकेदाराला देण्यात आले होते. म्हणजेच प्रत्यक्षात झालेल्या कामापेक्षा कितीतरी पटीने जास्त रक्कम ठेकेदाराला आगाऊ देण्यात आली.
इमारतीच्या बांधकामासाठी समाजसंस्थेचे अंदाजे ५ कोटी ६६ लाख व मागाठाणे शैक्षणिक इमारतीसाठी जो भूखंड मिळाला त्याचे भुईभाडे दंडासहित सुमारे २५ लाख रुपये समाजसंस्थेने भरले आहेत म्हणजे तो भूखंड आणि इमारत समाजसंस्थेची असताना अजूनही स्वप्निक फाटक हस्तक्षेप करत स्वतः मालक असल्याप्रमाणे वावरत आहे. त्याला विश्वस्त मंडळाची मूक संमत्ती आहे का?
क्षा. म. समाजाचे संस्थापक, आराध्य दैवत डॉ. शिरोडकर यांच्यापासून आपल्या शिक्षण संस्थांचे काम एस. के. मलिक अँड को. आर्किटेक इंजिनिअर ही आपल्या संस्थेशी बांधिलकी असलेली कंपनी करीत होती. मागाठाणे येथील शैक्षणिक वास्तू उभारण्यासाठीही तीच कंपनी होती; परंतु बच्चू सामजी या ठेकेदाराबरोबर झालेल्या करारापूर्वीच तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी या आर्किटेक कंपनीला बाजूला केले आणि श्री. खेडेकर यांना आणले. कारण त्यांना वरीलप्रमाणे गैरकारभार करायचा होता.
मागाठणे इमारत बांधण्यासाठी प्रथम टेंडर किंमत होती ४ कोटी ३९ लाख २३ हजार १२१ रुपये आणि सुधारित किंमत होती ३ कोटी ५४ लाख रुपये! प्रत्यक्षात ५ कोटी ६६ लाख ६ हजार ६७० रुपये अदा करण्यात आले. तरीही आज ती इमारत अपूर्णावस्थेत आहे. एवढेच नाही तर प्रकाश घोसाळकर (कॅटरिंग ठेकेदार) व सुमन एज्युकेशन (इमारत भाड्याने घेणारी संस्था) यांनी स्वतंत्रपणे प्रत्येकी दीड कोटी रुपये म्हणजे तीन कोटी रुपये केल्याचे न्यायालयात सांगत आहेत.
धर्मादाय आयुक्तांनी ५० लाख रुपये बिनव्याजी ठेवी जमा करण्यासाठी परवानगी दिली असताना ३ कोटी २३ लाख ९५ हजार ६३४ रुपयांच्या ठेवी घेण्यात आल्या. मग समाजाच्या १ कोटी रुपयांच्या एफडी मुदतीपूर्व काढून मागाठाणेसाठी का वापरण्यात आल्या? त्याला तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आणि ही गोष्ट समाज बांधवांपर्यंत आणू दिली नाही. याचाच अर्थ त्यांचाही प्रत्यक्ष सहभाग होता का?
मागाठाणे इमारत बांधण्याची सीसी मिळताच तिसऱ्या महिन्यात इमारत उभी राहण्यापूर्वीच हॉल चालविण्यासाठी निविदा न मागविता घोसाळकर याची ठेकेदारी मंजूर करण्यात आली. वधू-वराचा साखरपुडा होण्यापूर्वी बारशाची तयारी तत्कालीन सरचिटणीस विश्वनाथ बांदिवडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. ते आज विश्वस्त म्हणून तोऱ्यात गमजा मारत आहेत.
मागाठाणे प्रकल्प कालावधीतील सरचिटणीस विश्वनाथ बांदिवडेकर यांनी मागाठाणे समिती अध्यक्ष म्हणून दिनांक २२/१२/२०१२ रोजी आपला अहवाल तत्कालीन सरचिटणीस यांना सादर केला होता. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेले आहे की, मागाठाणे वाढीव निविदा रुपये ५ कोटी ४५ लाख मंजुरी दिलेल्या ठरावावर त्यांची स्वतःची तसेच तत्कालीन संचालक श्री. सुभाष फाटक यांची सही बनावट आहे. तसेच मागाठाणे वास्तूस ओसी मिळाली नसतानाही सुमन एज्युकेशन ८०० मुलांचे वर्ग चालवीत आहेत. तर श्री. घोसाळकर हे कॅटरिंगसाठी गॅस सिलेंडर वापरात आहेत व अपघात झाल्यास ह्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेवर आहे. तसेच समाजाला दोनही ठेकेदाराकडून कोणतीही रक्कम मिळत नाही.
तात्कालीन सरचिटणीस आणि विद्यमान विश्वस्त विश्वनाथ बांदिवडेकर यांनी बनावट सह्या असल्याचे मत अहवालात नोंदविले; मग त्यांनी आजपर्यंत पोलिसांकडे तक्रार का नोंदविली नाही? त्यांनी स्वतः पदाधिकारी म्हणून अनेक ठिकाणी सह्या केल्यात आणि संस्था अडचणीत आली आहे. सुमन एज्युकेशन आणि घोसाळकर यांच्याकडून कोणतीही रक्कम मिळत नाही; असे एका बाजूने अहवालात विश्वस्त विश्वनाथ बांदिवडेकर म्हणतात; मग २०१२ पासून आजपर्यंत कोणतीही कारवाई का केली नाही? हा प्रश्न उपस्थित होतो.
सुमन एज्युकेशनबरोबर चुकीचा करार करण्यात आला. त्यानुसार मिळणारी रक्कमही संस्थेला आणि पतपेढीला आजतागायत मिळाली नाही. एवढेच नाहीतर मॉडेल एज्युकेशन बरोबर स्वप्नीक फाटकच्या ताब्यात असलेल्या डॉ. शिरोडकर एज्युकेशनने २०२१ ला करार करून भाड्यापोटी लाखो रुपये घेतले.
भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नसतानाही गेली १२ वर्षे मागाठाण्याच्या इमारतीतून जे करोड रुपयांचे उत्पन्न येत आहे ते कोणाच्या घशात जात आहे? ते ह्यावरून समजून येते.
२९ जानेवारी २००४:- नव्याने शिक्षण संस्थेची ब्रॅन्च/शाखा सुरू करताना सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून संस्थेला सेक्रेटरीच्या नावे ठराविक रक्कम एफ डी स्वरूपात पोस्टात (नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट) करावी लागते. ठराविक कालावधीनंतर ती रक्कम व्याजासहित संस्थेत जमा होते. इंग्लिश स्कूल परेल, इंग्लिश स्कूल मिठबांव आणि सीबीएसइ या शाळा सुरू करताना अशा एफडी सेक्रेटरीच्या नावे अनुक्रमे एक लाख रुपये- दोन लाख रुपये आणि वीस लाख रुपये केल्या गेल्या. मात्र मागाठणे शैक्षणिक संस्था उभी करताना ४ लाख ६० हजार रुपयाची एफडी (राष्ट्रीय बचत पत्र) सेक्रेटरी या पदाच्या नावे न करता सुभाष फाटक यांच्या वैयक्तिक नावाने करण्यात आली. सदर एफडीचे सुमारे व्याजासह २० ते २२ लाख रुपये आजपर्यंत समाज संस्थेकडे आलेले नाहीत. त्यास तात्कालीन पदाधिकारी व आताचे विश्वस्त जबाबदार नाहीत का? वैयक्तिक सुभाष फाटक यांच्या नावावर एवढी मोठी रक्कम ठेवण्याची परवानगी का देण्यात आली आणि आतापर्यंत ती रक्कम परत मिळविण्यासाठी विश्वस्तांनी काहीच का केले नाही? ज्यांनी हा ठराव केला, ते यास बांधील आहेत.
घोसाळकर यांची करारानुसार असलेली ठेकेदारी रद्द करून (जो करार कोर्टाने अधिकृत मान्य केला आहे) व अजूनही न्यायालयात खटला प्रलंबित असताना कार्यकारी सदस्य डिचोलकर यांचे जावई अतुल फणसेकर यांना ठेकेदारी देण्यात यावी म्हणून विश्वस्तांनी समाजाचे अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, उपाध्यक्ष यांच्यावर चुकीच्या पद्धतीने दबाव आणला. त्यास विरोध केल्याने त्यांना विश्वस्तांनी बडतर्फ केले. जे घटनेच्या विरोधात आहे. एवढे करूनही मागील ११ महिन्यात अतुल फणसेकर यांना मागाठणे येथील हॉलची ठेकेदारी का देण्यात आली नाही? याचा अर्थ विश्वस्त मंडळ पदाधिकाऱ्यांकडून चुकीचे काम करून घेण्याची सक्ती करीत होते, असा होतो.
२ कोटी ६ लाख ४० हजार २३५ रुपये मालमत्ता कर महानगरपालिकेकडे भरणा झाले नाही म्हणून संस्थेला नोटीस आली. त्यावेळी आताचे विश्वस्त विश्राम मुंबरकर यांनी महानगरपालिकेला पत्र देऊन ठेकेदार घोसाळकर याला जबाबदार धरले. त्यानुसार ठेकेदार घोसाळकर याने २८ जून २०२१ रोजी ४२ लाख स्वतः भरले. ह्याचा अर्थ तो आता कायदेशीर कब्जेदार झाला. मग त्या ठेकेदाराला बाहेरचा रस्ता कसा दाखविणार?
विश्वस्त विश्राम मुंबरकर ठेकेदार घोसाळकर याला करारानुसार सुमारे १३ कोटी रुपये समाजसंस्थेचे येणे असल्याबाबत पत्र पाठवितात. तर दुसरीकडे त्याला काढून टाकण्यासाठी अध्यक्ष खाजणवाडकर, सेक्रेटरी हंजनकर, उपाध्यक्ष प्रकाश वाळके, खजिनदार अरुण रावले यांच्यावर दबाव आणतात. मग ते १३ कोटी रुपये वसूल कसे झाले असते?
ज्या विश्वस्तांनी पदाधिकाऱयांना बडतर्फ केले, खरेतर तेच विश्वस्त मागाठणेच्या सर्व गैरप्रकाराला सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांनी त्यावेळी गैर कारभार व भ्रष्टाचार करणाऱ्या सीईओ स्वप्नीक फाटक याच्यावर करारात नमूद असतानाही बडतर्फ करण्याचे धाडस का दाखवले नाही?
असे आणखी कितीतरी पुरावे, कागदपत्रे, दस्तऐवज आमच्याकडे आहेत; ज्यामुळे समाजसंस्था द्रोही नागडे पडतील. ती कागदपत्रे आम्ही स्वतःच्या घरी कोचाखाली लपवून न ठेवता-ब्लॅकमेलिंगसाठी त्याचा वापर न करता समाजहितासाठी जाहीर करणार आहोत. लवकरच पुढील पत्रकात त्यांच्या समाचार नक्कीच घेऊ! तूर्तास जागेअभावी आम्ही थांबतो आहोत!
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेमध्ये तसेच क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था संचालित शिक्षण संस्थांमध्ये अनेक समस्या पदाधिकाऱ्यांनी निर्माण केल्या आहेत. त्या समस्या एवढ्या गंभीर आहेत की, त्यातून समाज संस्थेच्या अस्तित्वाला बाधा निर्माण झालेली आहे. त्यासंदर्भातही आम्ही वेळोवेळी आपल्यासमोर अनेक गोष्टी मांडणार आहोत.
२०१२ साली स्वप्नीक फाटकची 'पाटीलशाहीचा' अस्त सभासदांनी केला. पण आज २०२२ साल उजाडले; तरी निवडून आलेले कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी, सुकाणू समितीचे सदस्य आणि विश्वस्त यांनी नेमकं काय केलं? ह्या प्रश्नांची उत्तरे आता मिळायला पाहिजेत. अन्यथा समाज संस्थेचे झालेले आर्थिक नुकसान त्यांनी भरून द्यायला पाहिजे आणि राजीनामा देऊन तोंड काळं केलं पाहिजे. पदांसाठी यादवी माजवून समाज संस्थेला अडचणीत आणण्याचा कोणालाही अधिकार नाही; ह्याचे भान ठेवा! नाहीतर स्वप्नीक सारखा अंत व्हायला वेळ लागणार नाही! म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावता नये; म्हणून आमची ही प्रामाणिक धडपड आहे. त्यास आपल्या सारख्या जागृत, विद्वान, समाज संस्थेबद्दल आस्था असलेल्या सभासदांनी-आजी माजी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले पाहिजे! ही नम्र विनंती!
- क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज परिवर्तन समिती