आमची तळमळ गैरकारभार थांबविण्यासाठीच...!


  
क्षा. म. समाज संस्थेच्या भल्यासाठी असणारे लेख `समाज माझा, मी समाजाचा!' ब्लॉगवर...

`क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, परळ, मुंबई' ह्या संस्थेच्या भल्यासाठीच...`समाज माझा, मी समाजाचा!' हा ब्लॉग मी गेली पाच वर्षे लिहितोय! आजपर्यंत तीस लेख झाले. आता समाज बांधव-भगिनी खऱ्या अर्थाने जागृत व्हायला लागले, बिनधास्तपणे व्यक्त व्हायला लागले, लिहू लागले, प्रतिक्रिया देऊ लागले! त्यांनी समाज संस्थेच्या हितासाठी जे काही लिहिलं, ते ह्या ब्लॉगवरती प्रसिद्ध करणं महत्वाचं आहे; कारण `समाज माझा, मी समाजाचा!' ह्या चळवळीला अधिक समर्थ करणारे ते लेख-त्या प्रतिक्रिया आहेत; असं मी मानतो! म्हणूनच मागील काही दिवसात समाजमाध्यमांवरती समाज बांधबांचे प्रसिद्ध झालेले लेख व प्रतिक्रिया देत आहे. 

-नरेंद्र हडकर


आमची तळमळ गैरकारभार थांबविण्यासाठीच...! 

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज बांधव भगिनींना नमस्कार! 

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेतील गैरकारभार थांबलाच पाहिजे; असे आमचे म्हणणे असून त्यासाठी आम्ही स्वीकारलेल्या गांधी मार्गाला तुमचा भरघोस पाठींबा मिळाला; त्याबद्दल आभार! आणि आमची भूमिका आणखीन स्पष्ट व्हावी म्हणून आम्ही तुमच्यासमोर काही मुद्दे मांडत आहोत. 

‘क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था, मुंबई' ह्या संस्थेच्या कार्यकारणीचे आम्ही दोघेजण सदस्य आहोत. गेल्या नऊ महिन्यात आम्ही संस्थेचा कारभार संस्थेच्या हिताचा व्हावा, संस्थेतील गैरकारभार संपुष्टात यावा, संस्थेची सर्वांगिण प्रगती व्हावी; यासाठी वेळोवेळी अनेकदा पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, महत्वाचे मुद्दे मांडले, कार्यकारणी सभेमध्ये अनेक सूचना केल्या; तरीही त्यात कोणतीही सुधारणा झाली नाही म्हणून शेवटी गांधीगिरी मार्गाचा अवलंब करत डॉ. शिरोडकर साहेबांच्या पुतळ्यानजीक आंदोलनास सुरुवात करावी लागली. या आंदोलनाचा आज अठरावा दिवस. तरीही काही पदाधिकाऱ्यांची मनमानी तशीच सुरू आहे आणि सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे या पदाधिकाऱ्यांना सुकाणू समिती सदस्य आणि विश्वस्त पाठीशी घालत आहेत; असं चित्र आज समाजामध्ये उभं राहिलं आहे. 

`समाज संस्थेच्या हितासाठी तुम्ही काहीही करा, कितीही उचित मुद्दे मांडा; तरीही आम्ही आमच्याच पद्धतीने कारभार करणार. अगदी संस्था खड्ड्यात गेली तरी हरकत नाही.' ह्या भावनेतून काही पदाधिकाऱ्यांची मग्रुरी अद्यापही सुरूच आहे. हे आंदोलन आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी-वैयक्तिक हितासाठी नाही. तर समाज संस्थेतील कारभार पारदर्शक व्हावा; जेणेकरून भूतकाळातील चुकांमुळे संस्थेचे झालेले नुकसान भरून येईल आणि भविष्यात समाज संस्थेला सुवर्णदिन येतील. आम्ही गांधी मार्गाचा अवलंब का केला? ते समजून घेण्यासाठी खालील मुद्दे मांडत आहोत...

१) कार्यकारणी सदस्यांना पदाधिकारी विश्वासात न घेता आपल्याला सोयीचा असा (गैर) कारभार करतात. ज्यामुळे समाज संस्थेला नुकसान पोहोचत आहे.

२) नऊ महिन्यापूर्वी कार्यकारणी सदस्यांच्या निवडणुका झाल्या. सदर निवडणुकीत प्रचारासाठी लाखो रुपयांचा खर्च समाज संस्थेने केला. मात्र ते २० ते २५ लाख रुपये कुठून आणले? ते कशापद्धतीने खर्च झाले? ह्याचा साधा हिशोब आजपर्यंत आम्हाला मिळालेला नाही. अनेकदा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याचाच अर्थ समाज संस्थेमध्ये `ब्लॅक मनी' तयार करून तो निवडणुकीमध्ये वापरला जातो; स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला जातो! असं आमचं म्हणणं आहे. अन्यथा आम्हाला निवडणुकीच्या खर्चासंदर्भात सविस्तर माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली असती. 

३) निवडणुका झाल्यानंतर पदाधिकारी नेमणूक करण्याची चर्चा व ठराव होणे अपेक्षित असताना ते अक्षरशः आमच्यावरती लादले गेले. विश्वस्त आणि सुकाणू समितीने सांगितले म्हणून हेच पदाधिकारी होतील; अशी भूमिका आताच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली व स्वतः पदाधिकारी झाले आणि आमचा हक्क डावलण्यात आला. `विश्वस्त आणि सुकाणू समितीने पदाधिकारी सुचविले' असे सांगितले जाते! ते खरे की खोटे? हे माहित नाही. जर हे खरे असेल तर कार्यकारणी सदस्यांचे अधिकार सुकाणू समिती व विश्वस्त डावलतात; असा त्याचा अर्थ होतो. आणि हे खोटे असेल तर पदाधिकारी विश्वस्त आणि सुकाणू समितीच्या नावावर कार्यकारणी सदस्यांना उल्लू बनविले जाते. 

४) ज्या उपसमित्या स्थापन झाल्या; त्या समित्यांवरती कोणाला पदाधिकारी आणि कोणाला सदस्य म्हणून घ्यायचे? हे ठरविताना कार्यकारणी सदस्यांना विचारात घेतले गेले नाही.

५) दर महिन्यात होणाऱ्या कार्यकारणीच्या सभेत जमाखर्चाचा विषय असतो आणि तो मंजूर केला जातो. परंतु सदर जमाखर्च हा किती खरा आणि किती खोटा समजावा? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कारण खर्चाची व्हाऊचर्स तपासणीसाठी अनेकवेळा मागणी करूनही दिली जात नाहीत. मग त्या तथाकथित जमाखर्चावर विश्वास कसा ठेवायचा? एका कार्यकारणी सदस्याने मागील वर्षांचा संस्थेचा ऑडिट रिपोर्ट मागितला. त्यासाठी लेखी पत्र दिले होते. मात्र अद्यापपर्यंत ऑडिट रिपोर्टची प्रत संबंधित कार्यकारणी सदस्याला देण्यात आली नाही. उलट वार्षिक अहवाल म्हणजेच `ऑडिट रिपोर्ट' असा शेरा मारून अर्ज बेदखल करण्यात आला. 

६) कार्यकारणी सदस्यांच्या सभेमध्ये जे ठराव होतात; ते ठराव कधीही बदलले जातात. त्याचप्रमाणे त्या ठरावावर अंमलबजावणी होत नाही. या महिन्यात झालेल्या ठराव पुढच्या महिन्यात बदलण्यात येतो. अशी कार्यपद्धती समाज संस्थेला घातक नाही का? मासिक सभा कधी घ्यावी? याबाबत चर्चा करून ठराव झालेला असताना त्यावर अंमलबजावणी न करता मासिक सभेला कार्यकारणी सदस्य येऊ नयेत; अशी तारीख व वेळ ठरविली जाते.

७) दोन महिन्यापूर्वी समाज बांधव भगिनींसाठी वधू-वर मेळावा संपन्न झाला. यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे अपेक्षित असताना सहकार्य सोडाच; पण वधू-वर मेळाव्यात काही पदाधिकाऱ्यांनी खोडसाळपणा करीत वधू-वर मेळावा होऊच नये म्हणून डावपेच आखले. पण ते आम्ही यशस्वी होऊ दिले नाहीत. ह्याचा अर्थ काही पदाधिकारी समाज संस्थेच्या हिताच्या कार्यक्रमातही स्वतःच्या मोठपणासाठी `खो' घालतात, हे सिद्ध होतं.    

८) आपल्या संस्थेच्या मुंबई कार्यालयात काही संगणक धूळ खात पडले होते. सदर संगणक दुरुस्त करून ते आपल्याच मिठबांवच्या शाळेला द्यावेत अशी मागणी आम्ही केली. त्यानुसार सदर संगणक दुरुस्त करून घेण्यात आले; परंतु दुरुस्ती झाल्यानंतर ते मिठबांवला पाठविले नाहीत. शेवटच्या क्षणी काही पदाधिकाऱ्यांनी व्यत्यय आणला. 

९) सिक्युरिटी आणि हाऊसकीपिंगची कामं ठेकेदारामार्फत केली जातात. सदर ठेकेदार आपले काम व्यवस्थित करत नसताना सुद्धा त्याच ठेकेदारांना पुन्हा पुन्हा ठेकेदारी का दिली जाते? हा प्रश्न आम्ही अनेक वेळा उपस्थित केला; परंतु पदाधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील `अर्थपूर्ण' तडजोडीतून नवीन ठेकेदार आणले जात नाहीत. नव्याने निविदा काढली जात नाही. 

१०) दिवाळीला आपल्या समाज संस्थेतर्फे ८० ते ९० हजार रुपयांचे ड्रायफ्रुट वाटण्यात आले. सदर ड्रायफ्रुट कोणाला दिले? याचा मात्र सुगावा आजपर्यंत आम्हा कार्यकारणी सदस्यांना लागू दिला नाही. याबाबत आम्ही अनेक सूचना केल्या होत्या; परंतु त्या सूचनांकडे मुद्दामहून काही पदाधिकाऱ्यांनी कानाडोळा केलेला आहे. ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचा? 

११) समाज संस्थेत सभासद होण्यासाठी अनेक समाज बांधव भगिनी इच्छुक असतात; परंतु त्यांना सभासद करून घेतले जात नाही. आपल्याच नातेवाईकांना सभासद करून घेण्याचा मानस पदाधिकाऱ्यांचा असतो. ते अन्य समाज बांधव भगिनींना सभासदात्वापासून दूर ठेवतात.  हे सर्व समाज बांधव भगिनींनी समजून घेणे गरजेचे आहे.

१२) क्षा. म. समाज, मुंबई अर्थात डॉ. शिरोडकर स्मारक मंदिर इमारत पूर्णतः नादुरुस्त झालेली असताना त्याच्याकडे लक्ष दिले जात नाही. त्याबाबत आम्ही अनेकवेळा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. चांगले मुद्दे मांडले. परंतु तिथेही पदाधिकाऱ्यांनी दिरंगाई केलीच. ह्या वास्तूमध्ये हजारो मुलं शिकत आहेत, अनेक सभा समारंभ होतात. देव कृपा करो असे होऊ नये; पण जर काही बरे वाईट झाल्यास त्यास जबाबदार कोण राहणार? हा आमचा सवाल आहे.

१३) मिठबांव येथील शैक्षणिक संस्थेची इमारत अतिशय नादुरुस्त झालेली असताना कोणतीही कार्यवाही केली जात नाही. हापूस आंब्याची बाग नव्याने विकसित करणे गरजेचे असताना त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. 

१४) मागाठाणे बोरीवली येथील ह. ध. गावकर विद्या संकुल समाजाच्या पैशाने उभे राहिले. पण आज सदर इमारत संस्थेच्या ताब्यात नाही. तिथून मिळणारे उत्पन्न कुठे जाते? ती इमारत समाज संस्थेच्या ताब्यात घेण्यासाठी काय प्रयत्न केले जातात? हे कधीही पदाधिकारी स्पष्टपणे सांगत नाहीत. 

१५) शिरोडा येथे असलेल्या संस्थेच्या वास्तूमध्ये अजून काही नवीन उपक्रम घ्यावेत; याबाबत सविस्तर सूचना आम्ही केल्या होत्या. त्याकडेही सध्याचे पदाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. 

१६) समाज संस्थेला ज्याप्रमाणे मागाठाणे बोरीवली येथे भूखंड मिळाला; त्याचप्रमाणे डॉ. शिरोडकर स्मारक मंदिराच्या समोर जिथे ग्लोबल हॉस्पिटल उभे आहे तो भूखंड तसेच शिरोडकर हायस्कूलच्या लगत आज एक इमारत उभी राहिली आहे तो भूखंड आणि भायखळा येथे एक भूखंड मिळालेले असताना त्या भूखंडावरती तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी आपला हक्क राखला नाही. त्यामुळे ते संस्थेच्या हाती आलेले भूखंड संस्थेच्या ताब्यात राहिले नाहीत. त्यास जबाबदार कोण? हा प्रश्न आम्ही का विचारू नये?   

समाज संस्थेच्या कारभारात ज्यांनी चुका केल्या आहेत; त्यांना त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. त्यांचे खरे स्वरूप समाज बांधव भगिनीसमोर उघडे झालेच पाहिजे; असे आमचे म्हणणे आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा चांगल्या गोष्टी-उचित गोष्टी मांडल्या जातात तेव्हा तेव्हा पदाधिकाऱ्यांकडून, आजच्या विश्वस्तांकडून विरोध केला जातो. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येतो. कुठेतरी हे थांबायला हवे म्हणूनच आम्ही गांधी मार्गाने आंदोलनास सुरुवात केलेली आहे. समाज संस्थेला वाचवण्यासाठी सर्व समाज बांधव भगिनींनी आम्हाला सहकार्य करावे; आमच्या चळवळीत सहभागी व्हावे; ही विनंती! हा लेख सर्व समाज बांधव भगिनींना पाठवा! ही नम्र विनंती! 


आपला नम्र

- संदिप धोपटे (संपर्क- 9819572917)

कार्यकारिणी सदस्य- क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था, मुंबई

( महत्वाची टिप:- समाज संस्थेच्या हितासाठी आम्ही घेत असलेली भूमिका पदाधिकाऱ्यांच्या कारभाराचे वाभाडे काढणारी असल्याने ते आमची बदनामी करू शकतात. म्हणूनच आम्हाला आपण संपर्क करू शकता!

सदर लेख प्रत्येक गावातील, शहरातील, देश- विदेशातील क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज बांधव भगिनींना पाठवा! जेणेकरून सर्व समाज बांधव भगिनी जागृत होतील.) २५ एप्रिल २०२३ 

धन्यवाद