समाज संस्थेच्या हितासाठी विश्वस्तांनो उघडा डोळे, बघा नीट आणि आतातरी बोला!


 क्षा. म. समाज संस्थेच्या भल्यासाठी असणारे लेख `समाज माझा, मी समाजाचा!' ब्लॉगवर...

`क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, परळ, मुंबई' ह्या संस्थेच्या भल्यासाठीच...`समाज माझा, मी समाजाचा!' हा ब्लॉग मी गेली पाच वर्षे लिहितोय! आजपर्यंत तीस लेख झाले. आता समाज बांधव-भगिनी खऱ्या अर्थाने जागृत व्हायला लागले, बिनधास्तपणे व्यक्त व्हायला लागले, लिहू लागले, प्रतिक्रिया देऊ लागले! त्यांनी समाज संस्थेच्या हितासाठी जे काही लिहिलं, ते ह्या ब्लॉगवरती प्रसिद्ध करणं महत्वाचं आहे; कारण `समाज माझा, मी समाजाचा!' ह्या चळवळीला अधिक समर्थ करणारे ते लेख-त्या प्रतिक्रिया आहेत; असं मी मानतो! म्हणूनच मागील काही दिवसात समाजमाध्यमांवरती समाज बांधबांचे प्रसिद्ध झालेले लेख व प्रतिक्रिया देत आहे. 

-नरेंद्र हडकर


समाज संस्थेच्या हितासाठी विश्वस्तांनो उघडा डोळे, बघा नीट आणि आतातरी बोला!


आज ‘तेरावा' दिवस! बारावा कालच झाला! 

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजातील सर्व सुज्ञ बांधव भगिनींनो तुमच्या लक्षात आलेच असेल की मी नेमकं कशाबद्दल बोलतोय? 

आपल्या मातृतुल्य समाज संस्थेची निवडणूक नऊ महिन्यापूर्वी झाली. त्या निवडणुकीत निवडून आलेले सत्ताधारी पक्षाचे तीन कार्यकारणी सदस्य डॉ. शिरोडकर समाज मंदिरात डॉ. शिरोडकर यांच्या पुतळ्याजवळ दर दिवशी सायंकाळी गेल्या नऊ महिन्यात झालेल्या गैर कारभाराविरोधात गांधीगिरी मार्गाने आंदोलन करीत आहेत. 

आज तेरा दिवस पूर्ण झाले तरीही आपल्या समाज संस्थेचे महान, विद्वान, अनुभव संपन्न, सॉलिसिटर असणारे विश्वस्त मात्र समोर दिसत असूनही, ऐकू येत असूनही आणि तोंड असूनही पाहत नाहीत ऐकत नाहीत आणि बोलत नाहीत! ह्याचेच आश्चर्य वाटते. 

गैरकारभारा विरोधात कोणीही कितीही बोंबला, आंदोलन करा! तरीही पदाधिकारी सुधारत नाहीत?  मग विश्वस्तांचे काम काय? हा प्रश्न अधोरेखित होतो! 

आज पदावर असलेल्या विश्वस्तांची जबाबदारी समजून घेणे गरजेचे आहे; कारण गेले तेरा दिवस आंदोलन होत असताना त्याकडे पूर्णपणे कानाडोळा करणे हे समाज संस्थेच्या हिताचे नाही. एवढी साधी बुद्धी सुद्धा विश्वस्तांना असू नये, याचेच दुःख वाटते. 

सत्ताधारी कुठल्याही पातळीवर कोणताही असो; तो आंदोलन म्हटल्यावर आंदोलनकर्त्यांची बाजू समजून घेतो. ते आंदोलन लवकरात लवकर संपवावे, यासाठी प्रयत्न करतो; परंतु पदाधिकाऱ्यांची हुकूमशाही काही थांबत नाही. मात्र जबाबदार असणारे व यंत्रणेची संपूर्ण माहिती आहे असे समजणारे विश्वस्त गप्प का? हा आम्हाला प्रश्न पडतो? अनेक मुद्दे आहेत, अनेक प्रश्न आहेत, अनेक सूचना आहेत; ते आम्ही त्या त्या व्यासपीठांवर मांडत असतो; परंतु त्याकडे गेली १५-२० वर्षे कानाडोळा केला गेला. पण आज समाज संस्थेची इभ्रत चव्हाट्यावर येत असताना विश्वस्तांनी आता तरी डोळे उघडावेत, कानाने ऐकावे आणि तोंडाने बोलावे! तरच समाज संस्था वाचणार आहे; अन्यथा फारच कठीण अवस्था आहे. त्यास आजचे पदाधिकारी जेवढे जबाबदार त्याहीपेक्षा हजार पटीने आजचे विश्वस्त जबाबदार असणार आहेत. गांधी मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचा आज ‘तेरावा' दिवस म्हणून विश्वस्तांना जाहीरपणे आठवण करून दिली! 


- श्री. सुनिल जेठे

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेचं सदैव  हित पाहणारा समाज बांधव

१९ एप्रिल २०२३