`गांधी मार्ग' स्वीकारण्यास कारण की...!


 क्षा. म. समाज संस्थेच्या भल्यासाठी असणारे लेख `समाज माझा, मी समाजाचा!' ब्लॉगवर...

`क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, परळ, मुंबई' ह्या संस्थेच्या भल्यासाठीच...`समाज माझा, मी समाजाचा!' हा ब्लॉग मी गेली पाच वर्षे लिहितोय! आजपर्यंत तीस लेख झाले. आता समाज बांधव-भगिनी खऱ्या अर्थाने जागृत व्हायला लागले, बिनधास्तपणे व्यक्त व्हायला लागले, लिहू लागले, प्रतिक्रिया देऊ लागले! त्यांनी समाज संस्थेच्या हितासाठी जे काही लिहिलं, ते ह्या ब्लॉगवरती प्रसिद्ध करणं महत्वाचं आहे; कारण `समाज माझा, मी समाजाचा!' ह्या चळवळीला अधिक समर्थ करणारे ते लेख-त्या प्रतिक्रिया आहेत; असं मी मानतो! म्हणूनच मागील काही दिवसात समाजमाध्यमांवरती समाज बांधबांचे प्रसिद्ध झालेले लेख व प्रतिक्रिया देत आहे. 

-नरेंद्र हडकर 



`गांधी मार्ग' स्वीकारण्यास कारण की...!

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था डॉ. रामचंद्र शिरोडकर साहेबांनी १९३५ झाली स्थापन केली. ही `संस्था' आम्हा समाज बांधव भगिनींसाठी मातेप्रमाणे आहे. डॉ. शिरोडकर स्मारक मंदिर असा आम्ही स्वाभिमानाने उल्लेख करतो आणि त्या मंदिरात आमचा देव आहे डॉ. रामचंद्र शिरोडकर! ह्या युगपुरुषाने क्षा. म. समाज संस्था उभारली ती एकाच ध्येयापोटी... ते ध्येय म्हणजे शैक्षणिक क्रांती! क्षात्रकुलोत्पन्न मराठा अर्थात गावडे-गावडे समाजच नव्हेतर संपूर्ण बहुजन समाज हा शिक्षित झाला पाहिजे; हे त्यांचे ध्येय होते! मात्र ह्या आपल्या मातृतुल्य संस्थेत फक्त आणि फक्त समाज बांधव-भगिनीच सभासद होऊ शकतात अशी व्यवस्था त्यांनी करून ठेवली. कारण समाज संस्थेच्या माध्यमातून उभ्या राहणाऱ्या शैक्षणिक संस्था फक्त आणि फक्त समाज बांधव- भगिनींच्या नियंत्रणात राहतील. डॉ. शिरोडकर साहेबांच्या पश्चात शिक्षणतज्ञ एच. डी गावकर साहेबांनी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्याचा वटवृक्ष उभा केला. अशा क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या कार्यकारणी सदस्यांच्या निवडणुकीत नऊ महिन्यापूर्वी मी निवडून आलो! माझे जीवन धन्य झाले; अशी माझी त्यावेळी भावना होती. मात्र फक्त नऊ महिन्यानंतर मी जो कारभार पाहिला तो खरोखरच वेदनादायी आहे!     

गेल्या नऊ महिन्यात अनेकदा कार्यकारणीच्या सभा झाल्या. ह्या कालावधीत समाज संस्थेची यंत्रणा समजून घेताना जिथे जिथे अयोग्य पद्धतीचा कारभार वाटला, तिथे तिथे सामंजस्याने विरोध केला. संस्थेचा कारभार पारदर्शक होण्यासाठी अनेक सूचना केल्या, विनंत्या केल्या; परंतु गेल्या नऊ महिन्यात अनेक चांगल्या सूचनांकडे संबंधितांनी मुद्दामहून दुर्लक्ष केले. समाज संस्थेच्या हितासाठी-भल्यासाठी मांडलेले, सुचविलेले अनेक मुद्दे बेदखल करण्यास संबंधितांनी धन्यता मानली. अनेक विषय, अनेक मुद्दे, अनेक सूचना उचित असूनही फक्त स्वार्थासाठी संबंधितांनी त्या बासनात बांधून ठेवल्या. मी माझ्या भावना संबंधितांकडे स्पष्टपणे मांडल्या. समाज संस्थेचे हित कशात आहे? ते पटवून सांगितलं. तरी लोकशाही मूल्यांसह नैतिकता संबंधितांनी सोडून दिली; हे मला जाणवलं. शेवटी माझ्याकडे कोणताच पर्याय उरला नाही. तरीही गप्प राहायचे नाही, संस्थेच्या हितासाठी समर्थपणे उभे राहायचे; हा विचार मनात पक्का करून शिक्षणतज्ञ एच. डी. गावकर साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवसापासून म्हणजे ७ एप्रिल २०२३ पासून डॉ. शिरोडकर समाज मंदिरात डॉ. शिरोडकर साहेबांच्या पुतळ्याशेजारी शांतपणे बसण्याचे आंदोलन सुरू केले. माझी भूमिका समजून घेऊन कार्यकारणी सदस्य श्री. केशव गावडे आणि श्री. अनंत बांदिवडेकर यांनी मला साथ देण्यात सुरुवात केली.

ह्या आंदोलनाला मी `गांधी मार्ग' असे नाव दिले. गांधी मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला आज सात दिवस पूर्ण झाले. दररोज सायंकाळी मी व माझे दोन सहकारी `गांधी मार्ग' आंदोलनाला बसतो. त्याचे फोटो समाज माध्यमातून व्हायरल होतात आणि अनेक समाज बांधव-भगिनी माझ्याशी संपर्क साधून ह्यासंदर्भात विचारणा करतात. प्रत्येकाला माझी भूमिका तोंडी सांगण्यापेक्षा ती लिखित स्वरूपात सर्वांसमोर आणावी; असे मला वाटले म्हणून मी ह्या लेखाच्या माध्यमातून तुमच्या समोर येत आहे. 

मी अनेक वर्षे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात मग्न असतो. अनेक ठिकाणी मी संचालक म्हणून कार्य करीत आहे. त्यामुळे संस्थेच्या कारभाराचा मला अनुभव आहे. त्याचप्रमाणे एका शिक्षण संस्थेचा संचालक म्हणून मी कार्य करतो म्हणजे शिक्षण संस्थांच्या कारभाराबाबत मी अनभिज्ञ नाही. मात्र मागील नऊ महिन्यात क्षा. म. समाज संस्थेच्या कार्यकारणी सभासदांच्या सभेत जी काही लोकशाही तत्त्वाला तिरांजली दिली जाते, अयोग्य निर्णय घेतले जातात, संस्थेला आर्थिक व कायदेशीर प्रक्रियेत अडचणीमध्ये आणण्यासाठी कारभार केला जातो; तो माझ्यासारख्या प्रामाणिक, कार्यक्षम आणि पैशाचा-पदाचा स्वार्थ न बाळगणाऱ्या व्यक्तीला त्रासदायक ठरतो. मी डॉ. शिरोडकर साहेबांचा व एच. डी. गावकर साहेबांचा कृपार्शिवाद म्हणून कार्यकारी सदस्य म्हणून निवडून आलो. त्यामुळे त्यांच्या स्मृतीला स्मरून `जो काही गलिच्छ कारभार सुरू आहे, त्यास विरोध केलाच पाहिजे!' अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. ही माझी भूमिका तुम्ही समाज बांधव-भगिनींनी समजून घ्यावी; एवढीच माझी कळकळीची विनंती आहे!

मी कार्यकारणी सदस्य म्हणून निवडून आलो; त्यास नऊ महिने पूर्ण झाले आहेत. ह्या नऊ महिन्यात अनेक सभा झाल्या. पण समाज संस्थेच्या हिताचे अनेक मुद्दे माझ्यासह अनेक कार्यकारणी सदस्यांनी मांडले; परंतु विधायक गोष्टी मुद्दामहून डावलण्यात आल्या. आपल्या संस्थेमार्फत दिवाळी भेट म्हणून ८० ते ९० हजार रुपयांची मिठाई (मिठाई-ड्रायफ्रूट्स) विविध सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना वाटण्यात आली, असे सांगितले गेले. मात्र ती मिठाई कोणाला दिली? त्यावर नेमका खर्च किती झाला? हे सत्य आजपर्यंत लपविण्यात आले. जमाखर्च पडताळण्यासाठी जर व्हाऊचर दाखविण्याची मागणी केली तर `ती व्हाऊचर्स पाहण्याचा अधिकार तुम्हाला नाही' असे आम्हाला सांगितले जाते. नुकताच समाज संस्थेच्या माध्यमातून वधूवर मेळावा संपन्न झाला. त्यातही हेतूपुरस्करपणे अडथळा आणण्याचा प्रयत्न केला गेला. समाज संस्था कोणत्या केसवर किती वकिलांना किती रक्कम देते? हे आमच्यापासून लपविले जाते.

मागाठाणे बोरिवली संदर्भात खरी माहिती दिली जात नाही. निवडणुकीमध्ये झालेल्या खर्चावर समाधानकारक उत्तर मिळत नाहीत. ज्या समाज बांधव- भगिनींना समाज संस्थेचे सभासद व्हायचे आहे, त्यांना सभासद करून घेतले जात नाही. भविष्यात निवडणूक झाल्यास जे आपणास मतदान करतील त्यांनाच सभासद करून घेण्याची मोनोपॉली राबविली जाते. संस्थेमध्ये आणि संस्थेच्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणताही व्यवहार रोख स्वरूपात होता कामा नये; ही मागणी सुद्धा मान्य केली जात नाही. असे एक नाही तर शेकडो मुद्दे आहेत; त्यावर संबंधित दुर्लक्ष करतात आणि संस्थेला अडचणीत आणतात. हे सगळं थांबण्यासाठी म्हणजे गैरकारभार रोखण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेल्या आदर्श आंदोलनाच्या मार्गावरून जाण्याचा निश्चय केला आहे. समाज बांधव-भगिनींनी आमची भूमिका समजून घ्यावी; ही नम्र विनंती! आमच्या आंदोलनास आपला पाठिंबा महत्त्वाचा आहे; कारण क्षा. म. समाज संस्थेची सर्वांगिण सुंदर प्रगती त्यातूनच होणार आहे. आम्ही स्वीकारलेला मार्ग अनेकांना न पचणारा- न रुचणारा आहे. ते आमची बदनामी करू शकतात. म्हणून मी तुमच्याशी संवाद साधत आहे. कोणाला काही अधिक माहिती हवी असल्यास मला नक्की फोन करावा.   

महात्मा गांधींचा सत्याचा मार्ग स्वीकारला म्हणून आम्हाला कोणी नथुराम गोडसेची आठवण करून देऊ नये. कारण महात्मा गांधींचे विचार अजरामर आहेत. महात्मा गांधींच्या देहाला गोळ्या घालून मारता आले; पण त्यांच्या विचारांना नाही! हे आताच्या यंत्रणेने समजून घ्यावे. जर कोणी आमची बदनामी केली तर त्यांनी समाज संस्थेला कसे गोत्यात आणले? ते पुराव्यानिशी जाहीर करू! हे त्यांनी ध्यानी घ्यावे!

-श्री. संदिप धोपटे 

कार्यकारणी सदस्य- क्षा. म. समाज संस्था, मुंबई 

संपर्क- 9819572917

१३ एप्रिल २०२३