लेखांक २९ वा - `क्षा. म. समाज संस्था, मुंबई' ह्या संस्थेचा सभासद होण्याचा हक्क डावलणार्यांना पुन्हा एकदा आवाहन!


समाज माझा, मी समाजाचा! (लेखांक- २९ वा)

`क्षा. म. समाज संस्था, मुंबई' ह्या संस्थेचा सभासद होण्याचा हक्क डावलणाऱ्या विश्वस्तांना आणि पदाधिकाऱयांना पुन्हा एकदा आवाहन! 

`क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था, मुंबई' ह्या आपल्या मातृतुल्य संस्थेत फक्त क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज अर्थात गावडे - गावडा समाज बांधव - भगिनीच सभासद होऊ शकतात. ही ज्ञाती संस्था स्थापन करून महान शैक्षणिक कार्य डॉ. रामचंद्र शिरोडकर साहेबांनी केले. मात्र आपल्या ह्या संस्थेत सभासद होण्याचा समाज बांधव - भगिनींचा  हक्क विश्वस्त आणि आजचे पदाधिकारी नाकारत आहेत आणि डॉ. शिरोडकरांच्या विचारांना बासनात बांधून ठेवल्यासारखे वागत आहेत. 

क्षा. म. समाज संस्था, मुंबई ह्या संस्थेमध्ये समाज बांधवच सभासद होऊ शकतात; परंतु आजही हे सभासदत्व देताना भविष्यात `आम्हाला मतदान करतील काय?' हा एकच कपटी विचार मनात ठेवून आपल्या सग्यासोयऱ्यांना सभासदत्व दिलं जातं आणि इतर समाज बांधव-भगिनींना सभासद होण्यापासून रोखलं जातं. ही हुकूमशाही, बेबंदशाहीशाही, नादानपणा, अतिरेकपणा कशासाठी? समाज बांधव - भगिनींशी केलेली ही गद्दारीच आहे. हे सर्वांनी ध्यानी घ्यावे. सर्व विश्वस्तांना आणि पदाधिकाऱ्यांना आमचे आवाहन आहे की आता तरी ही हलकटगिरी थांबवा आणि ज्या समाज बांधव- भगिनींना सभासद व्हायचे आहे त्यांना सभासदत्व बहाल करा! अन्यथा तुम्हाला येणारा काळ आणि नियती कदापि माफ करणार नाही. 

बंधू-भगिनींनो तुम्ही म्हणाल, हुकूमशाही, बेबंदशाहीशाही, नादानपणा, अतिरेकपणा, गद्दारी, हलकटगिरी असे शब्द का वापरले? कारण आमचीच नव्हे तर हजारो समाज बांधव- भगिनींची मागणी आहे की संस्थेचे सभासदत्व खुले करा. त्याबाबत आम्ही अनेकवेळा लेखी निवेदने दिली. प्रत्यक्ष चर्चा केली. सहा महिन्यापूर्वी  झालेल्या निवडणुकीत `समाज बांधव भगिनींना संस्थेचे सभासदत्व खुले करू' असे जाहीर आश्वासन आजच्या सत्ताधाऱ्यांनी दिले होते. पण कुत्र्याची शेपटी काही सरळ झालीच नाही; म्हणून असे गैर शब्द वापरावे लागतात. आपल्याच लोकांना असे शब्द वापरताना मनाला वेदना होते - दुःख होतं; पण गेंड्याची कातडी असणाऱ्यांसाठी आणखी कोणत्या मार्गाने समजावून सांगू शकतो? हा समाज बांधव-  भगिनींसमोरचा मोठा प्रश्न आहे.

सर्वांना सभासद करून घेतले तर भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत आपला सपशेल पराभव होईल; ह्या एकाच भीतीपोटी समाज बांधव- भगिनींना २००९ पासून आजपर्यंत सभासद करून घेतले जात नाही. तरीही २०१२ च्या निवडणुकीत स्वप्निल फाटकचा सपशेल पराभव झाला. २०१७ आणि २०२२ मध्ये परिवर्तन पॅनलचा अनुक्रमे फक्त १५० आणि ८० मतांनी पराभव स्वीकारावा लागला. म्हणजेच झालेल्या मतदानापैकी ४९ ते ४९.५ टक्के मतं परिवर्तन पॅनेलला मिळाली. जर दोन्ही वेळेला सत्ताधाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेत चारासोबीसगिरी केली नसती तर सत्ताधारी उताणे पडले असते. परिवर्तन पॅनलच्या संबंधित व्यक्तींना सभासदत्व दिले जात नाही. तरीही त्यांना एवढी मतं का पडतात? ह्याचा विचार मुर्खांच्या नंदनवनातील नेते करीत नाहीत; ह्याचेच आश्चर्य वाटते. विभागवार फक्त ५० सभासद करायचे; अशी चुकीची परंपरा मुद्दाम तयार करण्यात आली. म्हणजेच आपल्या मर्जीतील लोकांना सभासद करून घ्यायचे. संस्था ही धर्मादाय कायद्याद्वारे स्थापित होते आणि चालवावी लागते. परंतु समाज बांधव भगिनींना सभासद न करून घेणे म्हणजेच त्या कायद्याच्या विरोधात कामकाज होय. असे कामकाज आजचे पदाधिकारी व विश्वस्त करीत आहेत.

लिहिण्यासारखे खूप आहे. कोळसा उगाळावा तेवढा.... तरीही पुन्हा पुन्हा लिहावं लागतं. कारण समाज बांधव भगिनींच्या हक्कावर गदा आणली जात आहे. माझे आणि हजारो समाज बांधव- भगिनींचे नम्र आवाहन आहे की ज्यांना सभासद व्हायचे आहे त्यांना संस्थेचे सभासदत्व द्या. जे कोणी समाज बांधव भगिनींचा हक्क डावलत असतील त्यांची मस्ती उतरावी लागेल; अर्थात लेखणीच्या साहाय्याने... तयारीत राहा!    

- नरेंद्र हडकर (९३२१४९८६३९)