समाज माझा, मी समाजाचा! (लेखांक- २६ वा)
होय! आम्ही विरोधक आहोत! समाज हिताच्या आड येणाऱ्यांना विरोध करणे; हाच आमचा धर्म!
क्षा. म. समाज संस्था, मुंबई आयोजित सक्रिय कार्यकर्त्यांची सभा कालच डॉ. शिरोडकर समाज मंदिरातील सभागृहात झाली. त्यावेळी मी आणि इतर चाळीस-पंचेचाळीस सभासद समाज बांधवभगिनी उपस्थित होते. सदर सभेत माजी अध्यक्ष श्रीपाद फाटक यांनी आपल्या भाषणामध्ये 'विरोधक' म्हणून सन्माननिय संजय गिरकर, सुनील जेठे, राकेश कांबळी, सुरेश डामरे आणि माझा उल्लेख केला. त्यासाठी हा लेखन प्रपंच!
(सभागृहातील उपस्थित समाजबांधवभगिनींनी सभेत बोलायला पाहिजे; असं श्रीपाद फाटक साहेब म्हणाले. पण सभेच्या अध्यक्षांनी मात्र त्याकडे कानाडोळा करीत व्यासपीठावरील नेत्यांशिवाय अन्य कोणाला बोलायची संधी दिली नाही. अन्यथा त्यांच्या दृष्टीने 'विरोधक' असणाऱ्यांनी चिरफाड करून वास्तव मांडलं असतं.
मी माझी भूमिका 'समाज माझा, मी समाजाचा!' ह्या ब्लॉगवरती प्रसिद्ध झालेल्या २५ लेखांमध्ये मागील पाच वर्षात मांडली आहे. मी कोणत्याही गटातटाचा समर्थक नाही. संस्थेच्या भल्यासाठी जे कार्य करतात, त्यांच्या पाठीशी मी राहतो. क्षा. म. समाज संस्था, मुंबई ह्या संस्थेच्या हितासाठी मी माझी भूमिका मांडतो आणि संस्थेच्या हजारो सभासदांना ती मान्य होते. त्यासाठी सर्वांनी गेल्या पाच वर्षातील पंचवीस लेख वाचावेत आणि त्यातील त्रुटी सांगाव्यात; असे जाहीर नम्र आवाहन पुन्हा एकदा करतोय! पण सत्तास्थानी असलेल्यांना सत्तेचा माज असतो आणि त्यांना आपल्या पदांची पडलेली असते. संस्था खड्ड्यात गेली तरी हरकत नाही; ही त्यांची भूमिका असते म्हणून जेव्हा आम्ही वास्तव मांडतो तेव्हा जबाबदार व्यक्तींना आम्ही नकोसे होतो. असो!)
होय! आम्ही विरोधक आहोत! समाज संस्थेच्या हिताच्या आड येणाऱ्यांना आम्ही विरोध करणारच!
२०१२ मध्ये खऱ्या अर्थाने समाज संस्था स्वप्नीक फाटकच्या बंधनातून सभासदांनी मुक्त केली. मात्र मागील दहा वर्षात चुकीच्या बेजबाबदार कारभारामुळे संस्था आणखी अडचणीत आली; हे वास्तव आहे. ज्यांनी ज्यांनी संस्था अडचणीत आणली त्यांना विरोध करायला नको का? त्याला आम्ही विरोध केलाय. दहा वर्षाच्या काळात साडेपाच वर्षे अध्यक्ष असलेले श्रीपाद फाटक आमचा `विरोधक' म्हणून का उल्लेख करतात? हे मागील पंचवीस लेख वाचल्यानंतर लक्षात येईल.
सर्वसामान्य सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत आपलं समाज हिताचं परखड मत मांडू शकतो. मात्र सभासदांना बोलायला न देण्याची सर्वाधिक हुकूमशाही श्रीपाद पाटील साहेबांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली होती आणि अशी माणसं आमच्याकडे आहेत; असं कौतुकाने-अभिमानाने एका विश्वस्तांनी काल सांगितलं. आम्ही ज्यांना दैवत मानतो त्या डॉ. शिरोडकर यांच्या संस्थेत सभासदांना बोलू न देणारा अध्यक्ष सामर्थ्यवान मानला जातो; यापेक्षा दुसरं कुठलं मोठं दुर्दैव नाही. सभासदांना बोलू न देणाऱ्या नेत्यांना विरोध करण्याची धमक आमच्यामध्ये आहे. तुम्ही आम्हाला विरोधक म्हटलं तरी हरकत नाही. होय, आम्ही हुकूमशाही लादणाऱ्यांना विरोध करणार!
सन्माननिय संजय गिरकर, सुनिल जेठे, राकेश कांबळी, विजय मुंबरकर, सुरेश डामरे आणि त्यांचे अन्य शिलेदार यांनी मागील दहा वर्षात समाज संस्थेला वाचविण्यासाठी जो लढा दिला, जो संघर्ष केला, जी आक्रमक भूमिका घेतली ती समाजहिताचीच होती. जेव्हा जेव्हा संस्था अडचणीत आली किंवा संस्थेवर संकट आलं की हीच माणसं धावून पुढे येतात! हा इतिहास कसा विसरता येईल? कोणत्याही पदांची- मोठेपणाची हौस त्यांना नाही. तरीही त्यांचा दोष काय? तर ते संस्थेला अडचणीत आणणार्या प्रवृत्ती विरुद्ध आवाज उठविणे! अशांना जर तुम्ही विरोधक मानत असाल तर तुमची विचारसरणी ही किती खालावली आहे, हे समजून येते.
कालच्या सभेत रामायण आणि महाभारतामधील उदाहरणे वक्त्यांनी दिली. अध्यात्माचा सूर आळवला म्हणून त्यांना समजण्यासाठी....
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र - श्रीराम यांना रावण आणि रावणाचे समर्थक राक्षस विरोधक मानत होते. शेवटी त्या विरोधकाच्या परमभक्ताने म्हणजेच हनुमंताने रावणाच्या लंकेला आग लावली. श्रीरामाने रावणाचे राज्य संपुष्टात आणले. महाभारतामध्ये पाच पांडव आणि त्यांचा मार्गदर्शक परमात्मा श्रीकृष्ण यांना कौरव आणि त्यांचे समर्थक विरोधक मानत होते. पण शेवटी काय झाले? हे सांगण्याची गरज नाही. भारतावर दीडशे वर्षे राज्य करणारे इंग्रज स्वातंत्र्यविरांना विरोधकच मानत होते. शेवटी त्यांचाही अस्त झाला.
अशी अनेक उदाहरणे देता येतील. आम्ही सत्याच्या मार्गावरून चालणारे आहोत. तथाकथित नेत्यांच्या मगरमिठीतून समाज संस्थेला सोडविण्यासाठी आमचा लढा सुरु आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला विरोधक म्हणून संबोधणारच. त्याचे आम्हाला दुःख नाही; पण समाजासमोर आमची प्रतिमा मलीन करण्याचा तुमच्या प्रयत्नांना आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.
समाज हितासाठी व समाज संस्थेच्या भल्यासाठी २०१२ पासून आजपर्यंतचे सर्व कार्यकारणी सदस्य आणि २०१७ मध्ये निवडणुकीत शंभर-दीडशे मतांच्या फरकाने विजयी न झालेले शिलेदार यांनी एकत्र यावे! असे मी जाहीररित्या नम्र आवाहन बुधवार २ फेब्रुवारी २०२२ रोजी केले होते. त्या लेखाचे शीर्षक होते, `क्षा. म. समाज संस्थेच्या भल्यासाठी लगेच सर्वांनी एकत्र येऊया! आहे तयारी...?' मात्र नेहमीप्रमाणे उचित गोष्टींसाठी दोन पावले पुढे येण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी दाखवली नाही आणि निवडणूक जवळ येताच एकत्र येण्याची भाषा करायची आणि सभासदांना दाखवून द्यायची की बघा आमची भूमिका कशी सामंजस्याची व समाजहिताची आहे. हे ढोंग आम्हीच नाही तर सगळेच समाज बांधवभगिनी सभासद ओळखून आहेत; हे लक्षात ठेवा!
समाज संस्थेला अडचणीत आणणार्या व्यक्तींविरुद्ध आम्ही लोकशाही मार्गाला धरूनच आक्रमक भूमिका मांडणार. आम्हाला विरोधक म्हटले तरी हरकत नाही. होय, आम्ही विरोधकच आहोत, समाज संस्थेची प्रगती रोखणाऱ्यांचे! संस्थेच्या हिताच्या आड येणाऱ्यांना विरोध करणे, हाच आमचा धर्म आहे! ही गोष्ट ध्यानात असू दे!
(क्रमश:)
-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक-पाक्षिक `स्टार वृत्त'