लेखांक २५ वा- मागाठाणेचं `भूत' आणि भूतांचे बाप!

समाज माझा, मी समाजाचा! (लेखांक- २५ वा)
मागाठाणेचं `भूत' आणि भूतांचे बाप!


क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था, परळ, मुंबई संचलित शिक्षण संस्थेला माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी मागाठाणे, बोरिवली पूर्व, मुंबई येथे मुंबई महानगरपालिकेकडून एक भूखंड मिळाला. त्यावर समाज संस्थेने करोडो रुपये खर्च करून इमारत बांधली. (जी इमारत ठेकेदाराला पूर्ण रक्कम देऊनही आजही अपूर्णावस्थेत आहे.) सदर इमारत भाड्याने देण्यात आली. (चुकीच्या पद्धतीने) परंतु २००९ पासून आजतागायत त्या इमारतीच्या भाड्याचे करोडो रुपये संस्थेकडे जमा झालेच नाही. उलट त्या इमारतीचे करोड रुपये शासकीय कर संस्था भरत आहे आणि ती इमारत संस्थेच्या ताब्यात येण्यासाठी न्यायालयीन लढाईसाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत. तरीही संस्थेच्या हाती कवडी सुद्धा मिळाली नाही. ही वेदनादायी, संतापजनक, दुर्दैवी घटना असूनही या सर्व गोष्टींना- घडामोडींना जबाबदार असणारी लोकंच आज संस्थेच्या यंत्रणेत बसलेली आहेत आणि या प्रकरणाचे वास्तव-सत्य सांगण्याची त्यांना हिंमत होत नाही. कारण ते स्वतःला दोषी-आरोपी कसे ठरवतील? स्वतःला दोषी- आरोपी ठरवण्याची ताकद ह्या लोकांमध्ये नाही. यातूनच पळवाट काढण्यासाठी आणि भविष्यात सभासदांचा आक्षेप राहू नये म्हणून २१ फेब्रुवारीला चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. 

या चर्चासत्रामध्ये विश्वस्त, सुकाणू आणि कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून वास्तववादी माहिती मिळणे अपेक्षित होते; पण मागाठाणेविषयी दोषी असणारीच मंडळी यंत्रणेत असल्याने वास्तव माहिती प्रश्नकर्त्यांना मिळाली नाही. संस्थेचे अध्यक्ष चर्चासत्र आयोजित करतात आणि यंत्रणेतील विश्वस्त, सुकाणू, कार्यकारी मंडळ आणि काही कॅटरिंगचे ठेकेदार; ही माणसं सोडून इतर कितीजण उपस्थित राहिले? हे खूप महत्त्वाचे आहे. यामधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, समाज बांधवांना - भगिनींना समाजाबद्दल आस्था का वाटत नाही? याला सर्वस्वी जबाबदार नेतेगिरी करणाऱ्यांवर नाही का? समाजाबद्दल आस्था असणारे प्रश्न विचारतात, आस्थेने कारभाराबद्दल चौकशी करतात आणि अशी प्रामाणिक प्रश्न विचारणारी माणसं, सडेतोड विचार मांडणाऱ्या व्यक्ती नेहमीच चौकडीच्या दृष्टीने भांडखोर - चिडखोर असतात. अशी माणसे यंत्रणेत येऊ नयेत म्हणूनच प्रयत्न केले जातात. 

आता मात्र सन्मानिय राकेश कांबळी, विजय मुंबरकर, सुनील जेठे, संजय गिरकर आणि सुरेश डामरे ह्या पाचजणांनी पुढाकार घेऊन या मागाठाणेच्याच नव्हेतर अनेक प्रश्नांबाबत समाजासमोर वास्तव मांडावं; असं माझं म्हणणं आहे. मागील २३ आणि २४ व्या लेखावर सन्मानिय अनिल खाजणवाडकर, प्रकाश वाळके, श्रीकृष्ण हंजनकर, अरुण रावले, रमाकांत हंजनकर आणि अनंत नरे यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सुद्धा मागाठाणेचा पंचनामा करण्याची तयारी दर्शविली पाहिजे. जे कोणी प्रामाणिकपणे समाजहितासाठी पुढे येतील, त्यांना मी व्यक्तिशः साथ देणार आहे!

२१ फेब्रुवारीला  झालेल्या चर्चेत फक्त सात जणांनी प्रश्न विचारले. हे प्रश्नकर्ते नेहमीच वर्षानुवर्षे समाजहितासाठी तन-मन-धन अर्पण करून आक्रमक होत असतात. अशांना ह्या चौकडीने विश्वासात घेतले नाही म्हणूनच संस्थेसमोर समस्यांच्या राक्षस उभा राहिला, मागाठाणेचं `भूत' उभं राहिलंय! 

आमच्या कोकणामध्ये खूप भुतं असतात... भूतांचे अनेक प्रकार आहेत... भूतांना अनेक नावं आहेत. ही भुतं काय करतात? हे आम्हा मालवणी लोकांना चांगलं माहित आहे. मागाठाणेचं `भूत' उभं राहिलं म्हणजे नेमकं काय झालं? ते आपण समजून घेऊ!

काळाचे तीन मुख्य प्रकार! वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ! वर्तमानकाळ जलद गतीने भूतकाळात रुपांतरीत होत असतो आणि हा भूतकाळच सगळ्यांना त्रासदायक ठरतो. वर्तमानकाळात सभानता राखून, प्रामाणिकपणे - निस्वार्थीपणे कार्य केल्यास निर्माण होणारा भूतकाळ चांगल्या दर्जाचा तयार होतो. मग मात्र भूतकाळाला म्हणजेच भूताला घाबरण्याची गरज नसते. मात्र मागाठाणे प्रकरणात २००४ पासून आजतागायत यंत्रणेत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्यात्यावेळी वर्तमान काळात स्वार्थीवृत्तीने पदांसाठी काम केले. त्यामुळे त्यातून निर्माण झालेले `भूत' संस्थेला संपवायला निघाले; म्हणूनच ह्या भूतांना संपविण्यासाठी भूतांना जन्माला घालणाऱ्यांनी स्वतः राजीनामा देऊन बाहेर गेले पाहिजे अन्यथा समाज संस्था वाचण्यासाठी भुताच्या बापांना हाकलल्याशिवाय दुसरा पर्याय नाही; तरच क्षा. म. स. समाज संस्था वाचेल! 

समाज बांधव - भगिनी आपण म्हणत असाल की, तुम्ही पुढील लेखात मागाठाणेचं वास्तव मांडणार होता. त्याचे काय झाले? बरोबर आहे. हे वास्तव मांडण्याचा अधिकार आताच्या पदाधिकाऱ्यांकडे आहे, असं माझं प्रामाणिक मत! म्हणून मी त्यांची वाट पाहतोय. कालच्या चर्चासत्रात ते वास्तव मांडलं जाईल; असंही वाटत होतं; पण भुताचे बापच व्यासपीठावर असल्याने ते मांडलं गेलं नाही; हे वास्तव आहे. 

चर्चासत्रात पदाधिकाऱ्यांकडून तीन गोष्टी उपस्थितांना नव्याने समजल्या. त्या तीनही गोष्टी अतिशय भयानक आहेत. एक म्हणजे माजी संचालक कैलासवासी सुभाष शंकर फाटक यांनी मृत्यूपत्र करून `आपल्या मुलग्याला `सीईओ' हे पद द्यावं' असा आदेश दिला होता आणि तो आदेश  शिरसावंद्य मानून पदाधिकाऱ्यांनी त्या मृत्युपत्राचे वाचन कार्यकारणी आणि सर्वसाधारण सभेत केले आणि मंजुरी दिली. दुसरी गोष्ट अशी की, संस्थेच्या इमारतीच्याबाबतीत बक्षिसपत्र तयार करण्यात आले. तिसरी गोष्ट म्हणजे केंद्रात सत्तास्थानी असलेल्या पक्षाच्या आमदाराचा सहभाग! या तीनही गोष्टी सखोलपणे मांडण्यासाठी त्यावर स्वतंत्रपणे लेख लिहिण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. लवकरच त्यावर लेख प्रकाशित करू! 

मागील २४ व्या लेखात मी सर्वांना हात जोडून एकत्र येण्याची विनंती केली होती; परंतु आताच्या यंत्रणेतील एकाही व्यक्तीने ती विनंती मान्य केली नाही. ह्याचा अर्थ एकच होतो की, यंत्रणेतील लोकांना मनापासून समाज हितासाठी पुढे येऊन भूमिका मांडणाऱ्या समाज बांधवांशी चर्चाच करायची नाही आणि दुसऱ्या बाजूला चर्चासत्र ठेवून ढोंग करायचे. हा ढोंगीपणा लवकरच उघड होईल! 

`समाज माझा, मी समाजाचा! ह्या सदराखाली आजपर्यंत २४ लेख प्रसिद्ध झाले. त्याबाबत स्पष्टपणे भूमिका न मांडता खोटंनाटं काहीतरी सांगून समाज बांधवांशी दिशाभूल केली जाते. गेल्यावर्षी आठ नऊ महिने लेख लिहिला नव्हता. तेव्हा एक पदाधिकारी म्हणाला, ``आता लिहून लिहून संपले. आता काय लिहिणार? त्यांच्याकडे लिहिण्यासारखे काहीच नाही!'' समाजहितासाठी चुका केलेल्यांना मी रोज नागवं करू शकतो. पण प्रत्येक गोष्टीत भान ठेवावं लागतं म्हणून अत्यावश्यक असेल तरच मी लेख लिहितो. हे त्या मुर्खाला कसं समजणार?

सुकाणूतील एक सदस्य म्हणतो, ``मी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे नरेंद्र हडकर लिखाण करतात.'' स्वतःला स्वयंभू समजणाऱ्या ह्या नेत्याने समाजातील अनेक कागदपत्रे - दस्तऐवज घरी नेऊन कोचाखाली ठेवलेत आणि म्हणे `मी त्या कागदपत्रांवर झोपतो!'  त्या आवश्यक कागदपत्रांच्या आधारे मागाठाणेच्या भुताला का थांबवले नाही? आपल्याला पद मिळावे म्हणून त्या कागदपत्रांचा वापर करायचा; ही मानसिकता निश्चितच समाजहिताची नाही; हे समजायला समाजबांधव दूधखुळा नाही; हे ध्यानी घ्यावे. कार्यकारणीतील एक सदस्य म्हणते, ``असे लिखाण करणारे अनेक पत्रकार आमच्याकडे आहेत. आम्हीही असे लेख लिहू शकतो.'' त्यांना माझं खुलं आव्हान आहे; पत्रकार आणा आणि लिखाण करून घ्या! मात्र प्रामाणिकपणा - नि:स्वार्थीपणा भाड्याने मिळत नाही; हे लक्षात असू द्या! 

आणि अशाच यंत्रणेतील लोकांनी मागाठाणेचं `भूत' उभं केलं. ते `भूत' मागाठाणे प्रकरणाला जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही. ते त्यांच्या मानगुटीवर बसणारच आहे. अजूनही वेळ गेलेली नाही! सावधान....  

(क्रमश:)

-नरेंद्र राजाराम हडकर

संपादक-पाक्षिक `स्टार वृत्त'