लेखांक २२ वा- कॅलेंडरच्या माध्यमातून `अपमान' करण्याचे षडयंत्र!

समाज माझा, मी समाजाचा! (लेखांक २२ वा)

कॅलेंडरच्या माध्यमातून `अपमान' करण्याचे षडयंत्र! 

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेची जानेवारी महिन्यामध्ये नव्या वर्षाची दिनदर्शिका प्रसिद्ध झाली. गावागावामध्ये जाऊन ती काही विश्वस्तांनी, सुकाणू समितीच्या सदस्यांनी आणि कार्यकारणी सदस्यांनी-पदाधिकाऱ्यांनी वाटली. ती सगळी छायाचित्रे समाजमाध्यमांमध्ये पाहिली आणि आमची समाज संस्था केवढं मोठं (?) कार्य करते त्याची जाणीव झाली. 

मागाठाणे शैक्षणिक प्रकल्पात समाज संस्था कोट्यवधी रुपयांना तोट्यात आहे, ती समाजाची इमारत अजूनही समाज संस्थेच्या ताब्यात येत नाही, कोट्यवधी रुपयांचे कर महानगरपालिकेला द्यायचे आहेत त्याची पुन्हा पुन्हा नोटीस येत आहे, समाज संस्था म्हणून त्या इमारतीचा ताबा मिळावा म्हणून न्यायालयात न जाता तेथील अनधिकृतपणे असलेले कब्जेदार (पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि आताच्या विश्वस्तांच्या गलथान, बेजबाबदार कारभारामुळे ही भयंकर स्थिती निर्माण झाली.) समाज संस्थेला न्यायालयात खेचत आहे आणि समाज संस्था बचावाच्या भूमिकेत जात आहे. त्यामुळे त्या प्रकल्पात गोंधळाची परिस्थती निर्माण झाली असून त्यासाठी खऱ्या अर्थाने कार्य करण्याचे सोडून गावागावात कॅलेंडर वाटण्याची हौस भागविण्यात येत आहे. 

ह्या दिनदर्शिकेत कार्यकारिणीतील १९ पैकी ६ जणांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे. समाज संस्था सभासदांनी १९ जणांना निवडून दिले आहे. असे असताना ६ जणांची नावे काढून टाकण्याची गैर गोष्ट कोणी केली? ह्यास संपूर्ण विश्वस्त मंडळ जबाबदार आहे आणि त्याचे उत्तर त्यांनी द्यायचे आहे. ही मनमानी झाली. मनमानी करायला समाज संस्था कोणाच्या मालकीची नाही; ही गोष्ट सर्वांनी ध्यानी घ्यावी. 

समाज संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि खजिनदार यांना बेकायदेशीरपणे बडतर्फ करून विश्वस्तांनी समाज संस्थेवर आणखी एक केस लादून घेतली. त्याचा निकाल आज ना उद्या लागेल. ज्याच्या विरोधात निकाल जाईल त्यांनी त्या केसाचा खर्च स्वतःच्या खिशातून करायचा आहे. त्यासाठी समाज संस्थेचे पैसे वापरायचे नाहीत. २०१२ पासून आजपर्यंत समाज संस्थेचे सुमारे ४० लाख रुपये वकिलांवरती खर्च झाले असतील. तरीही समाज संस्थेच्या बाजूने आजपर्यंत एकही निकाल झालेला नाही. ह्याचा अर्थ काय होतो? ही जबाबदारी पदाधिकाऱ्यांना बडतर्फ करणाऱ्या मान्यवर विश्वस्तांची नाही का? पदांसाठी पदाधिकारी संस्थेत यादवी माजवत असतील आणि त्यासाठी संस्थेला आर्थिक भुर्दंड पडत असेल; तर त्याचा हिशोब जबाबदार व्यक्तींना द्यावाच लागेल. असे असताना गावागावात चुकीच्या पद्धतीने कॅलेंडर वाटण्याची हिमंत होतेच कशी? हा आमचा प्रश्न आहे. 

कारण स्वर्गीय मोहन लोकेगावकर यांची १५ हजार रुपये घेऊनही चुकीच्या पद्धतीने जाहिरात छापली गेली. मोहन लोकेगावकर हे समाजाचे नेते. त्यांनी समाजासाठी केलेला त्याग आणि केलेले कार्य सर्वोच्च आहे. गावडे-गावडा म्हणून समाजाला आरक्षण मिळवून देण्यात त्यांनी जे योगदान दिले ते समाज बांधवांना कधीच विसरता येणार नाही. तसेच समाजाच्या भल्यासाठी त्यांनी देहात असेपर्यंत ठोस भूमिका घेऊन कृती केली. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. ही गोष्ट निरंतर स्मरणात ठेवलीच पाहिजे; असे असताना आणि त्यांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालेले नसतानाही त्यांची जी जाहिरात छापलेली आहे ती अतिशय क्लेशकारक आहे. स्वर्गीय मोहन लोकेगावकर यांची शोकसभा समाजाने आयोजित करायला हवी होती किंवा किमान त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनासाठी किमान फोन तरी करायला पाहिजे होता किंवा पदाधिकाऱ्यांनी जाऊन भेटले पाहिजे होते. ह्यामधील एकही गोष्ट झाली नाही, हे संतापजनक आहे. नैतिकता संपल्याचे हे लक्षण नाही का? असे असतानाही स्वर्गीय मोहन लोकेगावकर यांच्या पुत्राला कॅलेंडरच्या जाहिरातीसाठी मात्र फोन आठवणीने केला गेला. त्याचे १५ हजार रुपयेही घेण्यात आले. तरीही चुकीच्या पद्धतीने ती जाहिरात छापली गेली. ह्या गोष्टीवर आमचा आक्षेप आहे. किमान आपल्या कृतीने स्वर्गीय मोहन लोकेगावकर यांच्या कुटुंबियांच्या भावनांना ठेच पोहचता कामा नये; ह्याची काळजी का घेण्यात आली नाही? लोकेगावकर कुटुंबियांवर दुःखाचा पहाड कोसळला असताना, त्यातून ते नुकतेच सावरत असताना संबंधितांनी जबाबदारीने वागले पाहिजे होते. पण त्यासाठी `जबाबदारीचे भान' असायला पाहिजे ना?

ह्यावर्षी कॅलेंडरवर किती खर्च झाला? गावागावात फिरण्यावर किती खर्च झाला? निवडून आलेल्या ६ कार्यकारणी सदस्यांची नावे का काढून टाकण्यात आली आणि स्वर्गीय मोहन लोकेगावकर यांची जाहिरात छापताना महाचूक झालीच कशी? कॅलेंडरच्या माध्यमातून `अपमान' करण्याचे षडयंत्र कशासाठी? हे समाज संस्था सदस्यांचे सवाल आहेत. कॅलेंडरच्या माध्यमातून भविष्यात निवडून येण्याचे मनसुभे आखले जात आहेत. हे योग्य नाही. त्यापेक्षा समाज संस्थेच्या भल्यासाठी कार्य करा अन्यथा पुन्हा पुन्हा लेखणीला वास्तव समाजासमोर आणावंच लागेल.* 

(क्रमश:)

-नरेंद्र राजाराम हडकर

संपादक-पाक्षिक `स्टार वृत्त'

(क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या बोरिवली मागाठाणे येथील शैक्षणिक प्रकल्पाबाबत अनेक वेळा वास्तव माहिती समाजबांधवांसमोर आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांना-विश्वस्तांना ह्याच स्तंभातून आवाहन केले; तरीही आजपर्यंत त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे पुढील लेखापासून उपलब्ध कागदपत्रांसह (पुराव्यानिशी) वास्तव समाजासमोर आणणार आहोत.)