समाज माझा, मी समाजाचा! (लेखांक-२० वा)
विश्वस्त महाशयांनी उत्तरे द्यायलाच पाहिजेत!
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज बंधू-भगिनी, मनःपूर्वक नमस्कार!
ह्या लेखाच्या माध्यमातून खूप दिवसानंतर मी तुमच्याशी सुसंवाद साधणार आहे. `समाज माझा, मी समाजाचा!' ह्या लेखमालेतील पहिला लेख २० जुलै २०१७ रोजी आणि एकोणिसावा लेख १८ फेब्रुवारी २०२० रोजी प्रसिद्ध झाला. मागील एकोणीस लेख हे आजच्या विसाव्या लेखाचे प्रास्ताविक लेख आहेत. पुन्हा तेच तेच मुद्दे मांडून पुनरावृत्ती टाळण्याचा माझा प्रयत्न असून ठराविक मुद्दे मला तुमच्यासमोर मांडायचे आहेत.
प्रथम नूतन पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! अभिनंदन करायला एवढा उशीर का झाला? असा प्रश्न पडेल; पण ज्या पद्धतीने पदाधिकाऱ्यांची अदलाबदली झाली ती समाजाला क्लेशकारक होती. २०१२ ते २०१७ आणि २०१७ ते २०१८ या कालावधीत अध्यक्षांसहीत इतर पदाधिकारी बहुमताच्या जोरावर बदलले गेले आणि असा रिवाज पडला. परंतु अध्यक्ष खाजणवाडकर, उपाध्यक्ष वाळके, सेक्रेटरी हंजनकर आणि खजिनदार रावले यांना विश्वस्तांनी बडतर्फ केले. अशाप्रकारे बडतर्फी करून विश्वस्तांनी नेमके काय साध्य केले? म्हणूनच विश्वस्तांनी आता खालील प्रश्नांना जाहीरपणे उत्तरे द्यावीत. ती त्यांची जबाबदारी आहे. ते आपल्या जबाबदारीतून पळून जाऊ शकत नाहीत.
१) ``पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करू नका; कारण त्यांच्या नेतृत्वाखाली मागाठणे संदर्भात जाहीर सभा लावणे आवश्यक आहे.'' अशी भूमिका ६ मार्च २०२१ रोजी झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक सभासदांनी मांडली होती. क्रियाशील सभासदांचे म्हणणे दुर्लक्षित का करण्यात आले? सभासदांच्या मतांना कोणतीही किंमत न देता निर्णय घेण्याचे धाडस का दाखविण्यात आले?
२) विश्वस्तांच्यावतीने सभेच्या विषय पत्रिकेत विषयी नसतानासुद्धा अनधिकृतपणे पदाधिकाऱ्यांचा गुणगौरव करणारा ठराव मांडण्यात आला. गुणगौरव करतांना विश्वस्तांनी अध्यक्ष खाजणवाडकर, उपाध्यक्ष वाळके, सेक्रेटरी हंजनकर आणि खजिनदार रावले यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. असे असताना गुणगौरव केलेल्या वरील पदाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची नामुष्की विश्वस्तांवर का ओढावली?
३) मागाठाणे प्रकल्पावर समाजाचे आजपर्यंत सात कोटी पेक्षा अधिक रुपये खर्च झाले आहेत. बिल्डिंग बांधणाऱ्या व्यक्तीला इमारत अर्धवट असूनही करारामध्ये नमूद केलेल्या रक्कमेपेक्षा कोट्यवधी रुपये जास्त दिले गेले. संस्थेची अनेक फिक्स डिपॉझिट मुद्दाम त्यासाठी रद्द करून ती कोट्यवधींची रक्कम मागाठाणे इमारतीसाठी वापरण्यात आली. तसेच अनेक समाज बांधव भगिनींनी ह्या इमारतीसाठी ठेव दिली. त्या इमारतीतून आजपर्यंत सुमारे ८० ते १०० कोटी रुपये उत्पन्न मिळाले; पण ते आजपर्यंत संस्थेकडे आले नाही; उलट आपली समाज संस्था त्या इमारतीचे सर्व शासकीय कर भरते. असे असतानाही इमारत संस्थेचे ताब्यात घेण्यासाठी विश्वस्तांनी आजपर्यंत कोणते प्रयत्न केले? माझा असा आरोप आहे की, विश्वस्तांच्याच भोंगळ, बेजबाबदार कर्तृत्वामुळे इमारत संस्थेच्या ताब्यातून निसटली आणि आजपर्यंत ताब्यात आली नाही.
४) आजच्या विश्वस्त मंडळातील काहीजण पदाधिकारी असताना स्वप्निक फाटकला सर्वाधिकार देण्याचा करार, सीईओ नेमण्याचा करार करण्यात आले होते. म्हणूनच स्वप्निक फाटक सुमन एज्युकेशन आणि प्रकाश घोसाळकर ( केटरर्स) यांना कराराने इमारत व्यावसायिक वापरासाठी देऊ शकला. मग त्या विश्वस्तांना संस्थेत राहण्याचा अधिकार नसताना आजही ही मंडळी समाज संस्थेमध्ये गोंधळ घालीत बसली आहेत. म्हणूनच मी वार्षिक सर्वसाधारण सभेत ``मागाठणे इमारत आपल्या ताब्यातून का निसटली व का ताब्यात येत नाही? याचे मूळ शोधा!'' असे आवाहन केले होते. मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न मी केला आहे; आज ना उद्या ती कागदपत्रे सभासदांना मी जाहीरपणे दाखविणार आहे म्हणूनच विश्वस्तांनी आपली भूमिका जाहीर करावी. २०१२ पासून डोळे बंद करून घेतलेल्या विश्वस्तांनी आजपर्यंत संस्थेसाठी काय चांगले काम केले? त्याचा खुलासा व्हायला पाहिजे.
५) संस्थेचे अपना बँकेतून ५८ लाख रुपये परस्परपणे काढण्यात आले. सीबीएसईबाबत अद्यापही कोणी खुलासा करीत नाही. मागाठाणेचे सुमारे ८० ते १०० करोड रुपयांचे उत्पन्न कोणाच्या घशात गेले? दिड करोडपेक्षा जास्त कर महानगरपालिकेला भरण्याची अंतिम नोटीस संस्थेला आली आहे. त्यामुळे भविष्यात ती इमारत महानगरपालिका कधीही ताब्यात घेऊ शकते. अशा अनेक मोठ्या छोट्या प्रश्नांबाबत मी मागील लेखांमधून समाजहिताची भूमिका मांडली. त्यावर आजपर्यंत विश्वस्तांनी मूग गिळून गप्प बसले? विश्वस्तांनी त्यावर काय कर्तृत्व केले?
६) नुकतीच समाज बांधवांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. त्या क्लिपमध्ये क्षा. म. समाजाचे संचालक कै. सुभाष फाटक सरांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.
संस्थेचे आद्यसंस्थापक डॉ. शिरोडकर यांनी आपल्या हयातीमध्ये एच. डी. गावकर साहेबांना संस्थेची धुरा सांभाळायला दिली आणि गावकर साहेबांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यानंतर एच. डी. गावकर साहेबांनी सुभाष फाटक सरांना ती जबाबदारी दिली. त्यांनीही ती जबाबदारी आपल्यापरीने पार पाडली. मात्र शेवटच्या काही वर्षात पुत्र प्रेमामुळे आणि तात्कालीन पदाधिकारी व विश्वस्तांनी दिलेल्या अंध पाठिंब्यातून स्वप्नीककडे संस्थेची धुरा गेली. त्यासाठी आताचे विश्वस्तही जबाबदार आहेत.
कै. सुभाष फाटक सरांची प्रतिमा २०१२ मध्ये का काढण्यात आली व २०२१ मध्ये पुन्हा तीच प्रतिमा का लावण्यात आली? या प्रश्नांची उत्तरे समाजाला हवी आहेत. फाटक सरांनी सुद्धा संस्थेसाठी त्याग केलेलाच आहे. तो त्याग २०१२ पासून आजपर्यंत विश्वस्तसाहेब विसरले होते का? २०२१ मध्ये त्यांचा त्याग-कर्तृत्व पुन्हा लक्षात कसे काय आले? स्वतःच्या स्वार्थासाठी सरड्यासारखे रंग बदलणाऱ्यानी समाजाला उत्तर द्यावं.
समाज बांधव-भगिनींनो, समाज संस्थेच्या भल्यासाठी आम्हाला रोखठोकपणे स्पष्ट भूमिका मांडावी लागते. त्यात वैयक्तिक हेवेदावे किंवा द्वेष नाही. ``क्षा. म. समाज संघटन'' ह्या वेबसाईटच्या उद्घाटनाला तात्कालीन अध्यक्ष-सेक्रेटरी गैरहजर राहिले. त्यांचा `प्रोटोकॉल' त्यांच्या आडवा आला. ह्या तथाकथित `प्रोटोकॉल' जपण्यामुळेच संस्थेची वाताहात होत आहे; हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे; म्हणून विश्वस्तांनी `प्रोटोकॉल'ची आणि स्वतःच्या खुर्चीची काळजी करण्यापेक्षा संस्थेची काळजी घ्यायला पाहिजे! अन्यथा लेखणीला वास्तव मांडावं लागेल. ते दाहक असेल; एवढे लक्षात ठेवा!
(क्रमश:)
-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक-पाक्षिक `स्टार वृत्त'