समाज माझा, मी समाजाचा!
मागील लेखाचा मथळा होता `विश्वस्त महाशयांनी उत्तरे द्यायलाच पाहिजेत!' हा लेख वाचल्यानंतर अनेकांनी साधक-बाधक प्रतिक्रिया दिल्या. अनेक विद्वान तज्ञ समाजप्रेमी पुढे आले आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ऑनलाईन सभा घेऊन क्षा. म. समाज संस्था, ह्या समाजाच्या संस्थेची प्रगती कशी करता येईल? यासंदर्भात चर्चा केली. एखाद्या लेखावर प्रतिक्रिया देऊन गप्प न बसता सकारात्मक कृती करण्यासाठी अनेक समाज बांधव भगिनींनी तयारी दर्शविली. त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद! लवकरच ऑनलाइन सभा घेऊ, तेव्हा समाजातील सर्वांनी उपस्थित राहावे आणि समाज संस्थेच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन करावे; ही विनंती!
समाज माझा, मी समाजाचा! (लेखांक २१ वा)
क्षा. म. समाज संस्थेचे ५८ लाख रुपये परत मिळविण्यासाठी...
२०१२ जुलैमध्ये क्षा. म. समाज संस्थेत निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने परिवर्तन झाले होते; परंतु अपना बँक आणि स्वप्निल फाटक यांनी संगनमत करून ५८ लाख रुपयांचा अपहार केला. एवढ्या मोठ्या रक्कमेबद्दल क्षा. म. समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी- विश्वस्तांनी मूग गिळून गप्प बसण्यात धन्यता मानली; अन्यथा समाज संस्थेचे ५८ लाख रुपये समाज संस्थेला परत मिळाले असते. यासंदर्भात १४ सप्टेंबर २०१९ रोजी सविस्तर लेख लिहिला होता. (समाज माझा, मी समाजाचा! (लेखांक-१७ वा) अभिनंदन आणि कौतुक तरीही प्रश्न (अपना) माझ्या समाजाचे! हा लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा! http://samajmazamisamajacha.blogspot.com/2019/09/blog-post.html )
सदर लेखावर सन्माननिय समाजबांधव श्री. उल्हास फाटक यांच्याशिवाय इतर कोणीही सविस्तर प्रतिक्रिया नोंदवली नाही. याचाच अर्थ सर्वांना समजून येईल. श्री. उल्हास फाटक साहेबांनी ह्या संदर्भात अपना बँकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले होते की, क्षा. म. समाज संस्थेच्या ५८ लाख रुपयाचा अपहार कसा झाला? परंतु त्यांना कोणीही साथ दिली नाही आणि आपल्या क्षा. म. समाज संस्थेचे ५८ लाख रुपये अद्यापही संस्थेकडे आलेले नाहीत; हे दुर्दैव आहे.
५८ लाखाचा अपहार कसा झाला?
२०१२ मध्ये क्षा. म. समाज संस्थेच्या निवडणुकीत सभासदांनी स्वप्नीक फाटकला नाकारले. त्यानंतर संस्थेत कायदेशीर बदलाचे पत्र अपना बँक आणि सारस्वत बँकेला देण्यात आले. सारस्वत बँकेने हे पत्र मान्य केले; पण अपना बँकेने क्षा. म. समाज संस्थेचा विरोध असतानाही ५८ लाख रुपये स्वप्नीक फाटकला काढण्यास सहकार्य केले. समाज संस्थेचे खाते अपना बँकेच्या डॉ. आंबेडकर शाखेत होते. येथील शाखाधिकाऱ्याने संस्थेच्या खात्यातून दुसऱ्या खात्यावर रक्कम वळती करण्यास (संस्थेचा पत्रानुसार) नकार दिला. असे असतानाही अपना बँक परेलच्या मुख्य शाखेतून सदर रक्कम बँकेच्या कामकाजाची वेळ संपून गेल्यानंतर दुसर्या खात्यात वळती करण्यात आली.
दैनिक 'लोकसत्ता'च्या बातमीनुसार...
(संस्थेची १५ जुलै २०१२ मध्ये निवडणूक झाली होती. त्यात सभासदांनी ‘परिवर्तन पॅनेल’च्या हाती सूत्रे सोपविली. त्यानंतरही पदभार न सोडता स्वप्नील यांनी बनावट कागदपत्रे, ठराव यांच्या मदतीने स्वत:च्याच हाती कारभार रहावा, यासाठी धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल केली. या विरोधात परिवर्तन पॅनेलतर्फे शहर दिवाणी न्यायालयात दाद मागण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने स्वप्नील यांना केवळ संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्याची परवानगी दिली. जून, २०१३ मध्ये न्यायालयाने परिवर्तन पॅनेलची निवड वैध ठरवून त्यांना संस्थेचा कारभार हाती घेण्यास परवानगी दिली.
संस्थेवर निवड झाल्यानंतर परिवर्तन पॅनेलच्या पदाधिकाऱ्यांनी सहा महिन्यात ६० लाखांचा निधी संकलित करून ती रक्कम ‘अपना सहकारी बँके’च्या परळमधील डॉ. आंबेडकर मार्गावरील शाखेतील बचत खाते क्रमांक २१६६२ मध्ये जमा केली होती. दरम्यान स्वप्नील यांना दैनंदिन कामकाज पाहण्याची मुभा मिळाली होती त्या काळात १३ आणि १४ फेब्रुवारी, २०१३ रोजी ही रक्कम अन्यत्र वळवून लंपास केल्याचा आरोप आहे. सुरूवातीला अपना बँकेच्या या शाखेतील रक्कम याच बँकेच्या एस. एस. राव मार्गावरील शाखेतील ‘के.एम.एस. एज्युकेशन इन्स्टिटय़ूट’च्या नावे असलेल्या बचत खाते क्रमांक ३६८४ मध्ये वळती करण्यात आली. तेथून दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारीला सिंधुदुर्गमधील सहकारी बँकेतील सत्येन अप्पा केसरकर यांच्या ‘एस. के. इंटरप्रायझेस’च्या चालू खाते क्रमांक ११०८ मध्ये ३० लाख रुपये वळविण्यात आले. तर त्यांच्याच बचत खात्यात २८ लाख २५ हजार रुपये वळते करण्यात आले. त्यानंतर या रकमा काढून घेण्यात आल्याचा आरोप आहे.)
आज `अपना बँक' जी समर्थपणे उभी आहे, त्यामागे सहकारमहर्षी स्वर्गीय सहदेव फाटक यांचे योगदान कोणालाही विसरता येणार नाही. आजही अनेक समाज बांधव अपना बँकेत आहेत. तरीही समाज संस्थेचे ५८ लाख रुपये संस्थेला परत मिळत नाहीत. ते मिळविण्यासाठी २०१३ नंतर क्षा. म. समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी-विश्वस्तांनी प्रयत्न का केले नाहीत? हा सर्व समाज बांधवांचा प्रश्न आहे म्हणून त्यांनी आता पुढाकार घेतला पाहिजे.
ह्या अपहारामध्ये `अपना बँक' प्रथमदर्शनी जबाबदार आहे म्हणून `अपना बँके'ने ५८ लाख रुपये संस्थेकडे जमा करावेत. क्षा. म. समाज संस्थेला स्वतःची एवढी मोठी रक्कम मिळाली तर अनेक सामाजिक उपक्रम घेता येतील. त्यासाठी क्रियाशील समाजप्रेमींनी पुढाकार घेतलाच पाहिजे.
(क्रमश:)
-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक-पाक्षिक `स्टार वृत्त'