लेखांक १६ वा
अभिनंदनीय; पण...!
।। हरि ॐ ।।
२५ ऑगस्ट २०१९ रोजी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबईची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. त्या सभेमध्ये काही गोष्टी खूप चांगल्या आणि समाजाच्या भविष्यासाठी उपयुक्त अशा होत्या. त्यासाठी अभिनंदन करावे लागेल. समाजहिताच्या आड येणाऱ्या गोष्टींवर नाराजी, दु:ख, टिका आणि संताप व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येक समाज बांधवाला असतो; तसेच चांगल्या गोष्टींचे अभिनंदन करता आले पाहिजे, ही आमची साधी, सोपी आणि स्पष्ट भूमिका आहे.
क्षा. म. समाज, मुंबईच्यावतीने सुरु असलेल्या सीबीएसईच्या अभ्यासक्रमाला दहावीची परिक्षा जवळ आलेली असताना कार्यकारी मंडळाने परवानगी मिळविली (मागील दहा वर्षे अशक्य असलेली गोष्ट शक्य केली) म्हणून कार्यकारी मंडळाचे बहुतेक वक्त्यांनी अभिनंदन केले. ही घटना खरोखरच अभिनंदनास पात्र आहे आणि ह्याच सदरातून आम्ही सुद्धा सीबीएसईची मान्यता मिळताच अभिनंदन केले होते; परंतु त्याचवेळी सीबीएसई संदर्भात आणि मागाठणे शैक्षणिक प्रकल्पाबाबत संपूर्ण सविस्तर माहिती देणारी श्वेतपत्रिका काढावी; असे नम्र आवाहन केले होते. (समाज माझा, मी समाजाचा! लेखांक-१३ व लेखांक-१४ अवश्य वाचा!) त्यामुळे समाज बांधवांना खरीखुरी सद्यपरिस्थिती स्पष्टपणे लक्षात आली असती; परंतु आमच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करण्यात आले.
आम्हाला त्याचा रागही नाही आणि दु:खही नाही. परंतु वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अनिल खाजणवाडकर यांनी मागाठणे शैक्षणिक प्रकल्पाबाबत जे काही सांगितले ते अतिशय दु:खदायक आणि क्लेशकारक होते. शिक्षणमहर्षी समाजाचे प्रेरणास्थान एच. डी. गावकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त मागाठणे येथील समाजाने सुमारे ७ करोड रूपये खर्च करून बांधलेल्या समाजाच्या इमारतीत प्रवेश करण्यासाठी तिथे ठाण मांडून बसलेल्या ठेकेदारांना विनंती करून परवानगी मागावी लागते.
`ह. ध. गावकर विद्या संकुल, मागाठणे, बोरीवली, मुंबई' असे नाव असलेल्या समाजाच्या वास्तूत ह. ध. गावकर यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी आमच्या समाजाच्या कार्यकारी मंडळाला तेथील ठेकेदारांची परवानगी घेण्यासाठी विनंती करावी लागते. अन्यथा तेथे प्रवेश नाही. ही अध्यक्षांनी सांगितलेली माहिती क्षा. म. समाजासाठी अतिशय संतापजनक आहे.
मागाठणे प्रकल्प स्वप्नीकने ताब्यात घेऊन तो ठेकेदारांच्या हाती सोपविला. मागील सात वर्षात सुमारे पाच ते सहा करोड रुपये उत्पन्न जे समाजाकडे जमा व्हायला पाहिजे ते परस्पर लांबविण्यात आले. या संदर्भात २०१२ नंतर आजपर्यंत म्हणजे सुमारे सात वर्षात कार्यकारी मंडळाने कोणते निर्णय घेऊन कृती केली; हे समाजाला समजणे आवश्यक आहे. (समाज बांधवांनी २०१२ साली परिर्वतन करून स्वप्नीकची सत्ता खालसा केली होती.) ते कोणी सांगत नाही म्हणून श्री. मोहन लोकेगांवकर यांनी मांडलेली स्पष्ट भूमिका कार्यकारी मंडळाच्या डोळ्यात अंजन घालणारी होती.
मागाठणे प्रकल्पाबाबत सविस्तर लिखाण करून समाज बांधवासमोर वास्तव मांडण्याचा मानस आम्ही यापुर्वीच जाहीर केला होता. पण आवश्यक ती माहिती देण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेण्याची तयारी कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी दाखविली नाही. पण शेवटी अध्यक्ष अनिल खाजणवाडकर यांनी मागाठणे प्रकल्पामध्ये प्रसाद लाड ह्या राजकारण्याचे नाव घेऊन जी माहिती सभेमध्ये दिली ती खरोखरच समाजबांधवांना वर्तमानात आणि भविष्यात कसा समर्थपणे लढा द्यावा लागेल; त्याची कल्पना देणारी होती म्हणूनच सन्मानिय अध्यक्षांचे अभिनंदन!
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये इच्छुकांना बोलण्याची संधी दिली म्हणून अध्यक्षांचे अभिनंदन!
सभेमध्ये लेखी-तोंडी प्रश्न विचारणारे समाजबांधव विजय मुंबरकर, सुनिल जेठे, संजय गिरकर, मंगेशी मसुरकर, अविनाश घारकर, सत्यविजय चव्हाण यांचे अभिनंदन! कारण ज्या संस्थेमध्ये जागृत राहून स्पष्टपणे प्रश्न विचारणारे सभासद असतात, ती संस्था खऱ्या अर्थाने समर्थ होते. आजपर्यंत समाजामध्ये प्रश्न विचारणाऱ्यांना गद्दार ठरविले जायचे. त्याचा फटका राकेश कांबळी, सुनिल जेठे यांना बसला आणि त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले होते.
सभेमध्ये सुनिल जेठे, संदिप शिर्के, सुरेश डामरे, संजय गिरकर आणि मोहन लोकेगांवकर यांनी मांडलेले विचार खरोखरच समाजाला सर्वोच्चस्थानी घेऊन जाणारे होते. त्या मुद्द्यांवर कार्यकारी मंडळाने कार्य करावे अशी सर्व समाजबांधवांच्यावतीने आम्ही विनंती करीत आहोत.
संदिप शिर्के या तरूण समाजबांधवाने विजयदुर्ग विभागावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविला. त्यांनी समाजहिताच्या तळमळीने खडे बोल सुनावले. त्यांचे अभिनंदन!
विशेषत: संजय गिरकर या समाज नेत्याने मांडलेली भूमिका खरोखरच कौतुकास्पद अशी होती. रोखठोकपणे कुठल्या पदाची अभिलाषा न ठेवता समाजाचा भुतकाळ व वर्तमानकाळ कसा गेला आणि उज्वल भविष्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? हे संजय गिरकर यांनी स्पष्टपणे मांडले. नियतीचा खेळ कसा चालतो? हे उदाहरणासह त्यांनी कोणाचीही तमा न बाळगता सांगितले. त्यांचेही अभिनंदन!
क्षा. म. समाजाला आरक्षण मिळवून देण्यास अग्रस्थानी असलेले नेते मोहन लोकेगांवकर यांनी मांडलेली भूमिका समाजाला भविष्यात तारक ठरणारी होती. सर्वांनी एकत्र येऊन साधकबाधक चर्चा करून निर्णय घ्या, हा त्यांचा सल्ला जपायला पाहिजे. म्हणून त्यांचे अभिनंदन.
अभिनंदन अगदी मनापासून केले आहे; परंतु ज्यांचे आम्ही अभिनंदन केले त्यांनी क्षा. म. समाजाला सुवर्ण युगाकडे घेऊन जायचे आहे.
स्वप्नीकचे नाव घेऊन बोट मोडत बसायचे आणि समाजाला संकटात टाकणाऱ्यांना पदावर बसवायचे; हे घातक समाजहानीची विकृती थांबविण्यासाठी जे समाज बांधव पुढे येतील त्यांचेही आम्ही नेहमीच अभिनंदन करू!
(क्रमश:)
-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक-पाक्षिक `स्टार वृत्त'

