लेखांक १७ वा- अभिनंदन आणि कौतुक तरीही प्रश्न `अपना' (माझ्या) समाजाचे!

लेखांक १७ वा

अभिनंदन आणि कौतुक तरीही प्रश्न `अपना' (माझ्या) समाजाचे!

कालच अपना बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. जिंकून आलेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन आणि पराभूत झालेल्यांचे कौतुक!

वाचकांना प्रश्न पडला असेल; जिंकून आलेल्यांचे अभिनंदन सगळेच करतात. पण पराभूत झालेल्यांचे कौतुक कशासाठी? जर पराभूत झालेल्यांनी निवडणूक लढविली नसती तर अपना बँकांची निवडणूक बिनविरोध झाली असती आणि क्षा. म. समाजाच्या हिताचे मुद्दे पुन्हा एकदा समोर आले नसते म्हणून पराभूतांचे मनापासून कौतुक! 

दुसरा प्रश्न असा तयार होतो की, अपना बँक आणि क्षा. म. समाज, मुंबईचा संबंध काय? ह्या प्रश्नाचे उत्तर सगळ्या समाज बांधवांना माहित असावे. बँकेचे संस्थापक सहदेव फाटक साहेब हे क्षा. म. समाजातील आदर्श व्यक्तिमत्व! अपना बँकेचा पाया रचणारे सहदेव फाटक साहेबांनी सहकार क्षेत्रात केलेली पायाभरणी किती मजबूत होती ती आजही अपना बँकेच्या रूपाने पाहावयास मिळते. त्यामुळे अपना बँक, अपना बाजार, अपना परिवारात क्षा. म. समाजबांधवांचे प्राबल्य होते, आहे आणि राहील. असो; पण मला ह्या लेखात समाजाच्या संबंधित मुद्दे मांडायचे आहेत. 

२०१२ जुलै मध्ये  क्षा. म. समाज, मुंबई मध्ये निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने परिवर्तन झाले होते. समाजबांधवांनी स्वप्नीक फाटकाच्या ठोकशाही-मालकी वृत्तीचा पराभव केला. परंतु धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल करीत स्वप्नीकने संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि २०१२ नंतरचे जमा झालेले ५८ लाख रुपयांचा अपहार अपना बँकेशी संगनमत करून केला. यासंदर्भात दै. `लोकसत्ता' बातमी प्रसिद्ध झाली होती. ( त्याची लिंक- https://www.loksatta.com/mumbai-news/shirodkar-education-organization-former-trustee-arrested-1191407/ ) ही बातमी वाचल्यावर अनेक गोष्टी समोर येतात. त्या अशा... 

अ) अपना बँकेला सूचना करूनही बँक व्यवस्थापनाने स्वप्नीकला अपहार करण्याची मुभा का दिली? क्षा. म. समाजाचे आणि अपना बँकेचे संबंध दृढ असताना असे कसे घडले? बँकेच्या कुठल्या अधिकाऱ्याने अपहार करण्यास मदत केली व दोषींवर अद्याप कारवाई का झाली नाही? 

ब) २०१२ मध्ये परिवर्तन झाले. ५८ लाख अपहार प्रकरणी गेली ७ वर्षे क्षा. म. समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी अपना बँक अधिकाऱ्यांच्या विरोधात का कारवाई केली नाही?  पराभूत उमेदवारांनी सुद्धा निवडणुकीसाठी हा मुद्दा वापरून घेतला. अन्यथा त्यांनी गेली सात वर्षे कायदेशीर लढाई केली असती. 

सन्मानिय श्री. दत्ताराम चाळके हे अनेक वर्षे अपना बँकेचे अध्यक्ष आहेत. चाळके साहेबांचे सहकार क्षेत्रातील कार्य राष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान असे आहे. त्यांचे निवडून आल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन! परंतु क्षा. म. समाजाच्या अपहार झालेल्या ५८ लाखांबद्दल त्यांनी आजही ठोस-स्पष्ट भूमिका घेऊन दोषींना शिक्षा होईल अशी कारवाई करावी. 

चाळके साहेबांच्या पॅनेलला क्षा. म. समाज, मुंबईच्या कार्यकारिणीने जाहीर पाठींबा दिला आहे. राजकीय असो व इतर संस्थाची निवडणूक असो समाजाच्या कार्यकारिणीने-समाज नेत्यांनी अलिप्त राहिले पाहिजे; समाज एकजुटीने संघटीत राहण्यासाठी. असे आमचे ठाम मत आहे.  (संदर्भ- समाज माझा, मी समाजाचा! -लेखांक १५) अपना बँक निवडणुकीत दोन्ही पॅनेलमध्ये समाज बांधव उमेदवार असताना फक्त एकाच पॅनलला जाहीर पाठिंबा देण्याची क्षा. म. समाज पदाधिकाऱ्यांची भूमिका योग्य नाही! त्यामुळे समाजाचा कोणता फायदा ते समाज बांधवांना कळू दे! 

मागाठणे येथील समाजाच्या इमारतीत एच. डी. गावकर साहेबांचा स्मृतिदिन साजरा करण्यासाठी ठेकेदारांना विनंती करून परवानगी घ्यावी लागते; (वाचा-समाज माझा, मी समाजाचा! -लेखांक १६) अशी माहिती क्षा. म. समाजाच्या अध्यक्षांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत नुकतीच दिली. नामवंत प्रसिद्ध राजकारणी प्रसाद लाड समाजाच्या विरोधात काम करत असल्याचेही अध्यक्षांनी त्यावेळी सांगितले. त्याच प्रसाद लाड यांनी चाळके साहेबांना जाहीर पाठींबा दिला. 

वर उल्लेख झालेल्या `लोकसत्ता'मधील बातमीत समाजाचे तात्कालीन अध्यक्ष श्री. श्रीपाद फाटक यांचा उल्लेख आहे. त्यांनी सुद्धा छत्री हाती घेतली होती. 

वरील सन्मानियांचे विचार ह्या निमित्ताने जुळत असतील तर आम्ही त्यांचे अभिनंदन करून क्षा. म. समाजाच्या भल्यासाठी जाहीरपणे तीन गोष्टी होण्याचा आग्रह धरतो आहोत. 

१) ५८ लाखांचा अपहार करणारा आणि अपहार करण्यास मदत करणारा नागवा झाला पाहिजे. 

२) सुमारे ७ करोड खर्च करून समाजाने उभी केलेली ह. ध. गावकर विद्या संकुल, मागाठणे ही इमारत समाजाच्या ताब्यात आली पाहिजे. मागील सात वर्षात सुमारे सहा करोड रुपये उत्पन्न परस्पर लाटले गेले; जे उत्पन्न समाजाकडे जमा व्हायला पाहिजे होते. 

३) क्षा. म. समाज, मुंबईमध्ये ज्याने भ्रष्टाचार-अपहार-गैरव्यवहार केला आणि भविष्यात कोणी करेल त्याला कोणीही पाठींबा देऊ नये. 

क्षा. म. समाजाच्या भवितव्यासाठी ठोस भूमिका मांडणे अत्यावश्यक आहे आणि आम्ही ती मांडतो. सन्मानिय चाळके साहेब, राजकीय नेते प्रसाद लाड तसेच आमचे समाजनेते सन्मानिय अनिल खाजणवाडकर, श्रीपाद फाटक, उल्हास फाटक यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर वाटतो; कारण आपल्या सर्वांवर डॉ. शिरोडकरांच्या थोर विचारांचे संस्कार झालेले आहेत. ह्या लेखामध्ये काही चूकभूल असल्यास अवश्य सांगा; निश्चितपणे दुरुस्त केली जाईल! पण समाजासाठी काही मुद्दे मांडावेच लागतात, ते आम्ही प्रामाणिकपणे कोणावरही राग, द्वेष न ठेवता मांडतो. कारण `क्षात्रकुलोत्पन्न समाज माझा आहे आणि मी समाजाचा आहे' ही असंख्य समाजबांधवांची तळमळ आहे. 

(क्रमश:)
-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक-पाक्षिक `स्टार वृत्त'