लेखांक- ११ वा- न्याय मिळण्यासाठी क्षा. म. समाजाची एकजूट महत्वाची!

लेखांक- ११ वा
न्याय मिळण्यासाठी क्षा. म. समाजाची एकजूट महत्वाची! 

मी कुठल्या विभागाचा?
माझं घर असलदे (कणकवली) गावात, माझ्या मामाचं घर लिंगडाळ, आईची मावशी फणसे गावाची, एका मामाची सासरवाड आरे गावात, दुसऱ्या मामाची सासरवाड शिरोडा गावात, वडिलांची मावशी मिठबावची, माझी सासरवाड मालवण, भावाची सासरवाड कसाल ....... वगैरे वैगेरे ..... खूप मोठी यादी आहे... 
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व मुंबई मधीलच क्षा. म. समाज नातेवाईक नाहीत तर प्रत्येक समाज बांधव हा माझा बांधव आहे. तो प्रत्येकजण माझा इकडून तिकडून नातेवाईक आहे; फक्त मला माहित नाही, एवढेच!

मग माझा विभाग कुठला?
कारभार व्यवस्थित व्हावा म्हणून क्षा. म. समाज, मुंबई ह्या संस्थेने वेगवेगळे विभाग निर्माण केले. सुंदर कल्पना होती. पण स्वस्वार्थ साधणाऱ्या काही तथाकथित समाज नेत्यांनी त्याचा गैरवापर समाजातील राजकारणासाठी केला. कारण त्यांना विभागाविभागात व्देष पसरावयाचा होता; जेणेकरून ते नेहमीच सत्तेवर, सत्तेच्या जवळ राहणार होते किंवा त्यांचा आर्थिक लाभ होणार होता. ह्या स्वार्थी लोकांच्या खेळीने क्षा. म. समाज एकमेकांकडे कुठल्या विभागाचा म्हणून (संशयाने) पाहू लागला. त्याचा फायदा स्वार्थी लोकांनी करून घेतला व आम्ही समाजबांधव (तुकड्यांमध्ये) वाटले गेलो. ही गोष्ट आता प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. 

स्वार्थी लोकांकडून नक्कीच एखाद्या विभागावर अन्याय झाला असेल. पण `मी' (इतर विभागातील समाजबांधव) दोषी का? न्याय मिळविण्यासाठी क्षा. म. समाज बांधवांची एकजूट महत्वाची नाही का?  

ह्याचा आता प्रत्येकाने विचार करून आमचा एकच विभाग तो म्हणजे `डॉ. शिरोडकरांचा-एच. डी. गावकरांचा क्षा. म. समाज.' बस्स! ही भावना एकदा आमच्या मनात रुजली की क्षा. म. समाजाचे खऱ्या अर्थाने परिवर्तन होईल आणि स्वार्थी मंडळी नामशेष होतील. स्वार्थी मंडळींना विभाग नसतो, नातं नसतं; फक्त त्यांना स्वस्वार्थ साधायचा असतो. ही गोष्ट आम्ही सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. 

क्षा. म. समाज संस्थेकडून आपल्या काही अपेक्षा आहेत. पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे राग येणे साहजिकच आहे. तो राग व्यक्त करताना आम्ही समाज बांधव कुठल्याही कारणाने (विभाग, गाव, भावकी) वेगवेगळे होणार नाही; ह्याची काळजी घ्यायलाच पाहिजे. 

बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. त्या दुरुस्त आम्हालाच कराव्या लागतील. म्हणूनच क्षा. म. समाजाची एकजूट महत्वाची! 

भ्रष्ट कारभाराविरुद्ध, गैर कारभाराविरुद्ध एकजूट महत्वाची! 

नाटे शैक्षणिक प्रकल्प पंधरा वर्षे मुद्दाम दुर्लक्षित केला गेला. शैक्षणिक प्रकल्प होतो म्हटल्यावर समाजबांधवानी विनामूल्य जमिनी मिळविल्या. कै. प्रभाकर गिरकर यांनी त्यासाठी केलेले प्रयत्न कधीच विसरता येणार नाहीत. असे असून सुद्धा आजपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होत नाही म्हटल्यावर समाज बांधवांच्या भावनांचा उद्रेक होणारच! ज्यांनी मोबदला न घेता जमिनी दिल्या त्यांचा काय संताप होत असेल? ह्याचा कोणी विचार करायचा? त्याचा जाब विचारलाच पाहिजे; पण आपण सर्व एकजूट होऊन!

भ्रष्ट कारभाराविरुद्ध लढण्याची जबाबदारी सर्वांची असते. जे जे असे लढाई लढले त्यांना सलाम! त्यांचा विभाग कोणता हे शोधूया नको! कारण ते कुठल्या विभागाविरुद्ध लढले नाहीत; तर गैरव्यवहाराविरुद्ध लढले. जर त्यांना विभागाच्या चष्म्यातून पाहिलं तर त्यांची भ्रष्ट कारभाराविरुद्ध लढाई संकुचित ठरेल आणि भ्रष्ट कारभार ज्याने केला त्याला नैतिक पाठबळ मिळेल. 

चुकीचं काम करणाऱ्याला वठणीवर आणलं पाहिजे; पण आपण सर्व एकजूट होऊन! अनेक प्रश्न सोडवायचे आहेत; त्यासाठी जाब विचारलाच पाहिजे; पण आपण सर्व एकजूट होऊन!

`समाज माझा, मी समाजाचा' ही चळवळ क्षा. म. समाजाच्या भल्यासाठी समर्थपणे उभी राहिली पाहिजे; कारण `डॉ. शिरोडकरांचा-एच. डी. गावकरांचा' आदर्श समोर ठेवून क्षा. म. समाजाला पुढील प्रवास करावा लागणार आहे.

काही चुकीचं वाटल्यास सांगा; राग येणार नाही. कारण `समाज माझा, मी समाजाचा' आहे; ही माझी शुद्ध प्रामाणिक भावना आहे!   

 -नरेंद्र हडकर