लेखांक १५ वा
क्षा. म. समाज कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधू नका!
|| हरि ॐ ||
देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. दुसऱ्या टप्प्याचे मतदान आजच झाले. अशाप्रकारे सहा महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका येतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाच वर्षांनी होत असतात; म्हणजे आपण नेहमी कोणत्या ना कोणत्या निवडणुकीच्या वातावरणात वावरत असतो. या निवडणुका आल्या म्हणजे वेगवेगळे राजकीय पक्ष आले, त्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते किंवा राजकीय पक्षाला मानणारे मतदार आले. हे वेगवेगळे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते किंवा राजकीय पक्षांचे समर्थन करणारे प्रत्येक कुटुंबात, भावकीत, वाडीत, मंडळात, समाजात, मित्रांच्या ग्रुपमध्ये, नोकरी-व्यवसाय करतो त्या ठिकाणी असणारच! इथपर्यंत काहीच समस्या नाही. परंतु एखाद्या कुटुंबातील एका व्यक्तीला योग्य वाटतं म्हणून कुटुंबातील इतर सदस्यांवर अमुक एकाच पक्षाला पाठिंबा देण्यासाठी दबाव आणते; तेव्हा खरी लोकशाहीची गळचेपी होते. कुटुंब एकत्र असलं तरी प्रत्येकाचं मत राजकारणाबाबत वेगवेगळं असू शकतं म्हणूनच अठरा वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा हक्क आहे. तो अठरा वर्षानंतर स्वतंत्रपणे विचार करून मतदान करू शकतो. एका कुटुंबांमध्ये एखादी व्यक्ती त्याला आवडते म्हणून अमुकच एका पक्षाला मतदान करा किंवा अमुकच एका पक्षाला आम्ही पाठिंबा देतो असे सांगू किंवा जाहीर करू शकत नाही. तिथे सर्वांची संमती आवश्यक ठरते.
पाच-सहाजणांच्या एका कुटुंबात एकाच विचारसरणीच्या व्यक्ती सापडणे मुश्किल असताना जेव्हा एखादी व्यक्ती चार-पाच जणांना हाताशी धरून म्हणजेच स्व-फायद्यासाठी (पद, प्रतिष्ठा इत्यादी) आपल्या भावकीचा, वाडीचा, आपल्या समाजबांधवांचा एखाद्या पक्षाला जाहीररित्या पाठिंबा जाहीर करते, तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने त्या टप्प्यांवर (भावकी, वाडी, समाज) लोकशाहीचा खून होतो; असं माझं स्पष्ट मत आहे.
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज ही काही ठराविक राजकीय नेत्यांची मक्तेदारी नाही. लाखो समाज बांधव आज स्वतंत्ररित्या विचार करू शकतो, कारण तो सुशिक्षित विद्वान आहे आणि ते क्षा. म. समाजाचे आद्यसंस्थापक डॉ. रामचंद्र शिरोडकर आणि एच. डी. गावकर यांना दैवत मानतात. असं असताना क्षा. म. समाजाचा एखाद्या पक्षाला जाहीररित्या पाठिंबा देऊन आमचे नेते नेमके काय साध्य करीत आहेत? हा खरा सवाल आहे.
ज्याप्रमाणे एखाद्या कुटुंबात, भावकीत, वाडीत वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते-वेगवेगळ्या पक्षांना मांनणारे समर्थक असतात; त्याचप्रमाणे क्षा. म. समाजबांधवही वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी जोडलेले आहेत. त्याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही. उलट वेगवेगळ्या पक्षात जर समाजबांधव वरच्या पदांवर असतील तर त्याचा अभिमान वाटेल आणि वाटतोही; परंतु संपूर्ण समाजाचा एकाच पक्षाला पाठिंबा देण्याची घोषणा करून जर समाज एखाद्या पक्षाच्या दावणीला बांधण्याचा प्रकार होत असेल तर तो योग्य नाही. त्यामुळे काय होईल?
आपल्या क्षा. म. समाज, परळ, मुंबई संस्था अंतर्गत अनेक शिक्षण संस्था सुरू आहेत. त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी प्रत्येक पक्ष चक्रव्ह्यूव रचणार. त्यामध्ये आपण अडकता कामा नये. आज मागाठणे बोरिवली येथील समाजाची शैक्षणिक वास्तू एका राजकीय पुढाऱ्याच्या नियंत्रणात गेली. त्याबद्दल नक्कीच लिखाण करून समाजासमोर वास्तव आणणार आहोत; परंतु आज देशात, राज्यात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणाऱ्या निवडणुकीबाबत चर्चा करतोय. समाजबांधव निवडणुकीत उभा नसताना समाजबांधवांना विश्वासात न घेता परस्पर समाजाचा पाठिंबा एखाद्या राजकीय पक्षाला जाहीर करणं हे गैर आहे आणि असा प्रकार चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला आहे.
आम्हाला समाजबांधव असलेल्या राजकीय नेत्यांबद्दल आदर आहे; परंतु आमचे असंख्य समाज बांधव वेगवेगळ्या पक्षाशी निगडीत आहेत; हे सत्य का नाकारायचे? समाजबांधवांनी राजकारणात जावे, मोठे व्हावे; पण राजकारण समाजात आणू नये. जर असे राजकारण समाजात, वाडीत, भावकीत झाले तर संघटनेत फूट पडू शकते- एकसंघ भावनेला तडा जाऊ शकतो!
आपल्या समाजबांधवांनी ग्रामपंचायत सदस्य ते खासदार ह्या पदावर लोकप्रतिनिधी म्हणून यशस्वी कार्य केलेले आहे. वेगवेगळ्या पक्षात समाजबांधवांनी महत्त्वाच्या पदावर काम केले आहे आणि आजही करीत आहेत; त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. परंतु मनाला खटकणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे मांडणे, आम्ही कर्तव्य समजतो म्हणून हा लेखन प्रपंच!
समाजबांधवांचे अनेक व्हॉट्सऍप ग्रुप आहेत. त्या ग्रुपवरही अनेक राजकीय मेसेज येतात आणि एकमेकांमध्ये जुंपते. अशा गोष्टी मनाला खटकतात. समाजाच्या व्यासपीठावर राजकीय पक्षांना प्रवेश दिल्यास आपापसात भांडणतंटे होणारच. हे सुद्धा कुठेतरी थांबायला पाहिजे.
आपला समाजबांधव जर राजकीय पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीत उभा असेल तर त्याला सहकार्य करायला हरकत नाही; पण जाहीररित्या पाठिंबा दिल्याने इतरांच्या मनाचा अनादर होतो; हेही लक्षात घेतले पाहिजे म्हणूनच समाजाला कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधू नका अशी आमची जाहीररीत्या कळकळीची विनंती आहे.
कुठल्याही राजकीय पक्षाला वाईट किंवा चांगले ठरविण्याचा अधिकार हा प्रत्येक समाजबांधवाला आहे आणि तो अबाधित राहिला पाहिजे म्हणून प्रत्येकाने समंजसपणा दाखविला पाहिजे.
राजकीय पक्ष सत्ताप्राप्तीसाठी गट-तट, जातीय समीकरणाची मांडणी करीत असतात. त्यात आपण वैयक्तिकरित्या सहभागी होऊ शकतो. पण आपल्या समाजबांधवांनाही सहभागी व्हावे त्यासाठी प्रयत्न करा; पण आपल्या क्षा. म. समाजावर कुठल्याही पक्षाचा शिक्का मारून घेऊ नका. आम्ही एकमेकांचे नातेवाईक आहोत, आमचं एकमेकांशी रक्ताचं नातं आहे, ते तुटता कामा नये म्हणून मी माझं मत स्पष्टपणे मांडलं. कोणाला मुद्दामहून दुखविण्याचा हेतू नाही.
`समाज माझा, मी समाजाचा!' या सदराखाली यापूर्वी १४ लेख प्रसिद्ध झाले. खरेतर १५ वा लेख चौदाव्या लेखाशी संबंधित लिहावा, असे ठरविले होते. पण निवडणुकीच्या विषयावर लिहावे लागले. मात्र पुढील लेख १४ व्या लेखाशी संबंधित असणारा प्रसिद्ध करणार आहोत.
(क्रमशः)
-नरेंद्र राजाराम हडकर
