लेखांक १३ वा- नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन... समाजहितासाठी निर्णय घ्याच!

लेखांक १३ वा

नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन... समाजहितासाठी निर्णय घ्याच!

।। हरि ॐ ।। 
परवाच क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज समाज, मुंबई संस्थेच्या कार्यकारणी मंडळाने नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका बहुमताने केल्या. अध्यक्षपदी अनिल खाजणवाडकर, उपाध्यक्षपदी प्रकाश वाळके, सरचिटणीसपदी श्रीकृष्ण हंजणकर, खजिनदारपदी अरुण रावले, सहचिटणीस व उपचिटणिसपदी अनुक्रमे सुरबा मुंबरकर आणि अनिल कोठारकर यांची बहुमताने निवड झाली. सर्वांचे मन:पुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना अनेक मुद्द्यांवरती लक्ष वेधून घ्यायचे आहे.

मागील लेखामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे गंभीर प्रश्न आणि वास्तव मांडणाऱ्या शिलेदारांचे अभिनंदन केले होते. तसेच चुकीच्या ठरावांना डोळे बंद करून व बुद्धीचा वापर न करता हात वर करून मंजूरी देणाऱ्यांचा समाचार घेतला होता. 

सभेत उत्तरे मिळविण्यासाठी मांडल्या गेलेल्या प्रश्नांवर लिखाण ह्या लेखात करायचे होते. ते आता पुढील लेखात करू आणि ह्या लेखात नवीन पदाधिकाऱ्यांसमोर समाजाच्या भल्यासाठी अत्यावश्यक असणारे मुद्दे मांडूया!

१) वास्तव मांडणारी श्वेत पत्रिका मांडा!
आज समाजासमोर अनेक प्रश्नांनी गंभीर स्वरूप धारण केलेले आहे. ‘स्वप्नीक फाटक'च्या कारकिर्दीमधील सर्व व्यवहार व निर्णय कसे अयोग्य पद्धतीने घेतले गेले? सुभाष फाटक यांनी पुत्रप्रेमापोटी चुकीच्या गोेष्टींना कसा वाव दिला? भ्रष्ट व्यवहार कसे झाले? त्यास जबाबदार कोण? सहा महिन्यांसाठी झालेले अध्यक्ष रवी गावकर यांच्याकडे गो. रा. खैरनारांप्रमाणे ट्रकभर पुरावे होते. त्याचे काय झाले? आज आपल्या शिक्षण संस्थांची परिस्थिती कशी आहे? म्हणजेच क्षा.म. समाजाच्या मागील किमान पंधरा ते वीस वर्षातील प्रत्येक व्यवहार, वाटचाल याचा सखोल अभ्यास करून भविष्यात त्याच चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून उपाययोजना सुचविणारी आणि संस्थेच्या कामकाजाचे वास्तव मांडणारी श्वेतपत्रिका एका महिन्यात आताच्या पदाधिकाऱ्यांनी मांडावी! अशी आमची आग्रही मागणी आहे. त्यामुळे समाज संस्थांची प्रगतीला अडसर असणारे घटक समाजासमोर येतील. 

२) विश्वस्त व सुकाणू समितीमध्ये बदल आवश्यक!
`समाज माझा मी समाजा'च्या लेखामध्ये विश्वस्त व सुकाणू समितीच्या सन्मानिय सदस्यांबाबत मी स्पष्टपणे लिहिले होते. समाजाचा कारभार स्वच्छ, पारदर्शक व समाजहिताचा करायचा असल्यास त्वरीत विश्वस्त व सुकाणू समितीमध्ये सक्षम प्रामाणिक नेत्यांना घेणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा फायदा कार्यकारी मंडळाला होऊ शकतो आणि समाजाच्या भल्याचे निर्णय घेतले जाऊ शकतात. 

ही फेररचना करताना सत्तेचा दुरुपयोग करून स्वस्वार्थ साधणाऱ्या लोकांना दूर करायला हवे. पाटीलशाही पुन्हा यावी म्हणून धडपडणारे जे कोणी असतील; त्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे. 

३) `समाज माझा मी समाजाचा' अशी भावना समाज बांधवांमध्ये निर्माण होण्यासाठी प्रयत्न करा!
डॉ. शिरोडकर, ह. द. गांवकर यांनी क्षा. म. समाज संस्था घडविली. त्या समाजाला सकारात्मक वैचारिक दृष्टीकोन देणे महत्वाचे आहे. प्रत्येक समाजबांधव आज समाज संस्थेकडे संशयाने पाहतोय. `क्षा. म. समाज माझा आहे आणि मी क्षा. म. समाजाचा आहे' असा आपलेपणा समाजबांधवांना वाटला पाहिजे. त्यासाठी मागील कारभारी जसे वागले, तसे वागून चालणार नाही. 

त्यासाठी इथे दोन उदाहरणं पाहू. 
काही महिन्यापुर्वी मिठबांवच्या एका शिक्षकाला मुंबईत आणण्यासाठी `अर्थपूर्ण' तडजोड झाली. तो शिक्षक मुंबईला आला शिक्षण खातं परवानगी देणार नाही. म्हणून मुंबईतील शिक्षकांची व शिपायांची बदली मिठबांवला केली गेली. जे शिक्षक प्रामाणिक, कार्यक्षम, सच्चे आणि नियमानुसार कार्य करतात; त्यांच्या मुद्दाम व आकसाने बदल्या केल्या गेल्या. कोणाच्या हट्टापायी? समाबांधवांना कळू दे. 

सदर शिक्षक न्यायालयात गेले व बदल्या नियमबाह्य ठरल्या. पण न्यायालयात केस लढवायला समाजाचे पाच लाख रूपये वाया गेले. त्या शिक्षकांना ४२ दिवसांचा बसून पगार द्यावा लागला. विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान झाले. अजूनही शिपाई पदावर असलेल्यांची केस न्यायप्रविष्ठा आहे. म्हणजे एका शिक्षकांकडून मुंबईत आणण्यासाठी आर्थिक तडजोड केली व ती पचविण्यासाठी समाजाच्या सुमारे दहा लाख रूपयांची माती केली.

तरीही चौगुले नामक कायदेशीर सल्लागाराने मागील सभेत अक्कलेचे तारे तोडले. म्हणे शिस्त येण्यासाठी बदल्या कराव्या लागतात. ह्याचा अर्थ काय? लंगडं समर्थन करणारा हा सल्लगार क्षा.म. समाजामार्फत भविष्यात सुरू होणाऱ्या लॉ कॉलेजचा प्रमुख होण्याची स्वप्न पाहतोय. 

नको ती स्वप्न पडायला लागली की असंच लंगडं समर्थन करावं लागतं. ह्या सल्लागाराने कायद्यात बसणारा योग्य सल्ला दिला नाही म्हणूनच शिक्षक कोर्टात जिंकले आणि समाजाचे लाखो रूपये वाया गेले. 

आदर्श शिक्षकांवर सूड उगविण्याचा सैतानी घृणास्पद प्रकार ज्याने केला, त्याला आज आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले. ही नियती कोणालाही सोडत नाही. जो कोणी क्षा. म. समाजात भ्रष्ट, गैर कारभार करेल त्याला त्याची शिक्षा भोगावीच लागणार आहे. कारण हे डॉ. शिरोडकरांचे समाजमंदिर आहे. ह्या समाजमंदिरात खोट्याचं खरं करणारा खड्ड्यात पडणार आहे. वॉरंटीमध्ये असलेले एसी बदलून समाजाच्या पैशाने नवीन एसी लावणारी सरंमजामशाही इथे टिकत नाही. हे समाज बांधवांनी पुन्हा एकदा पाहिले. म्हणूनच नवीन पदाधिकाऱ्यांनी स्वच्छ, पारदर्शक कारभार करावा. 

मागाठणे येथील ह. ध. गांवकर विद्यासंकुल उभं करण्यासाठी समाजाचे लाखो रूपये खर्च झाले. परंतु काही आजी-माजी नेत्यांच्या चुकीमुळे ही वास्तू समाजाच्या ताब्यात नाही आणि तेथून मिळणारे लाखो रूपयांचे उत्पन्न समाजाकडे जमा होत नाही. ते कोणाच्या खिशात जाते? ह्याला जबाबदार असणारे आजही उजळ माथ्याने कसे काय फिरू शकतात? त्यांना समाजाच्या संस्थांमध्ये पदं कोण देत आहेत? ह्याचा खुलासा व्हायलाच पाहीजे. 

`शिक्षकांच्या पीएफचा प्रश्न, सीबीएसईचा प्रश्न' असे अनेक गंभीर प्रश्न आहेत. 

आजही भ्रष्ट वृत्तीला पाठींबा देणारे तथाकथित नेते समाजात वावरताहेत; जोपर्यंत त्यांना लगाम लावला जात नाही तोपर्यंत समाज व्यवस्था बिघडलेलीच राहणार आहे.

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संचलित सर्व सस्थांमध्ये अजिबात गैरव्यवहार होता कामा नये. समाजसंस्थांनी एवढी प्रगती करावी की त्याचा आदर्श जगभरात पसरला पाहिजे. हीच आमची भावना!

आमची कोणाची वैयक्तिक दुष्मनी नाही; पण समाजाच्या विकासाच्या आड येणाऱ्यांची गय करायची नाही. 
हाच आमचा विचार... 
म्हणून हा लेखन प्रपंच...!
(क्रमश:)
-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक-पाक्षिक `स्टार वृत्त'