लेखांक- १२ वा
समाजहिताची भूमिका मांडणाऱ्या समाजबांधव शिलेदारांचे अभिनंदन!
पुन्हा एकदा समाजबांधव म्हणून लेखणीचा सुदुपयोग करावा लागतोय. `समाज माझा, मी समाजाचा' ह्या लेखमालेतील अकरावा लेख `न्याय मिळविण्यासाठी क्षा. म. समाजाची एकजुठ महत्वाची!' ह्या मथळ्याखाली असलेल्या लेखात समाजबांधवांनी विभागवार वाटणी न करता आपल्या न्याय हक्कांसाठी आणि गैरव्यवहार व भ्रष्टाचाराविरुद्ध एकसंघपाणाने लढले पाहिजे, असे आवाहन केले होते. बहुसंख्य समाजबांधवांनी आमच्या भूमिकेचे स्वागत केले. त्यांना धन्यवाद देऊन समाजाच्या संस्थेमधील गैरप्रकार थांबविण्यासाठी संघर्षाची भूमिका घेण्याची जय्यत तयारी करावी, असे आवाहन पुन्हा एकदा करावेसे वाटते.
`क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबई' ही आमची मातृसंस्था. १९ ऑगस्ट २०१८ वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेसंदर्भात साधकबाधक चर्चा करणे गरजेचं होतं. पण लेख लिहिण्याची घाई न करता समाजबांधवांना काय वाटते? ह्याची चाचपणी करावी; असं ठरविलं व चार दिवसांनी लेख लिहिण्यास घेतला.
गेल्यावर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा २३ जुलै २०१७ रोजी झाली. ही सभा ऐतिहासिक ठरली. त्या सभेमध्ये मागील वर्षाचा जमाखर्च आणि पुढील वर्षाचे अंदाजपत्रक गंभीर त्रुटीमुळे मंजूर झाले नाही. म्हणून विषेश सर्वसाधारण सभा १४ जानेवारी २०१८ रोजी घेण्यात आली. त्यावेळी `समाज माझा, मी समाजाचा' ह्या लेखमालेतील सहावा आणि सातवा लेख अनुक्रमे `सावधान...!' व `समाजबांधवांनो आतातरी जागे व्हा!' ह्या मथळ्याखाली लिहून गैरकारभाराची चिरफाड केली होती. त्याकडे दुर्लक्ष करून १९ ऑगस्ट २०१८ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कार्यकारी मंडळाने समाजबांधवांच्या अतिशय गंभीर प्रश्नांना बगल देऊन मागील सभेचे इतिवृत्तांत, जमाखर्च, अंदाजपत्रक मंजूर करू घेतले. सभेमधून अधिकृतरित्या हरकत घेऊन सुद्धा चुकीचे ठराव करण्याची पद्धत लोकशाहीला मारक आणि गैरव्यवहाराला-गैरकारभाराला पाठबळ देणारी होती. नुसते हात वर करणाऱ्या सभासदांनी कार्यकारी मंडळाने केलेल्या बेकायदेशीर कृत्याला संमत्ती देण्यासारखा हा किळसवाणा प्रकार आहे. ज्या समाजाचे आपण घटक आहोत, त्या समाजामध्ये गैरकारभाराविरुद्ध कोणी प्रश्न उपस्थित केल्यास, त्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी द्यायला हवी; पण सत्तेला भुलून पुन्हा एकदा काहीजणांनी चुकीच्या ठरावाच्या बाजूने हात वर केले. `चुकीच्या गोष्टींना आपणच पाठबळ देत आहोत!' ही भावना त्यांच्या मनात का निर्माण होत नाही? हा प्रश्न आम्हाला सतावत आहे.
२०१२ साली खऱ्या अर्थाने `परिवर्तन' झाले असे वाटत होते. २०१२ पुर्वीही १०-१५ वर्षे हात वर करून चुकीचे ठराव संम्मत केले गेले. त्यामुळे पाटीलकी प्रस्थापित झाली व समाजाचे कसे अतोनात नुकसान झाले; ते आपण पाहिले. तरीही आज इतिहासापासून धडा न घेता नातं व स्वार्थ जपणारी मंडळी समाजाच्या सभेमध्ये चुकीच्या बेकायदेशीर ठरावांना डोळे बंद करून साथ देते. त्यातून जे समाजाचे नुकसान होणार आहे; त्यास सर्वस्वी हीच माणसं जबाबदार असणार आहेत. कारण त्यांनी प्रश्नकर्त्यांचे प्रश्न नमके काय आहेत? हे जाणूनच घेतले नव्हते. अशा पद्धतीने हात वर केले त्यांनी समाजाचा आर्थिक हिशोब शुद्धीवर राहून प्रामाणिकपणे तपासावा म्हणजे प्रश्नकर्त्यांची समाजहिताची भावना व समाजाबद्दलची तळमळ लक्षात येईल; एवढंच आमचं म्हणणं आहे. कशाला पापाचे वाटेकरी होता. वाल्याकोळ्याची बायकामुलं-आईवडील त्याच्या पापात सहभागी होण्यापासून दूर राहिले. केवळ एकावेळच्या जेवणासाठी आणि केवळ आपला नातलग व मित्र आहे म्हणून किंवा चांगले संबंध आहेत म्हणून चुकीच्या बेकायदेशीर ठरावांना पाठिंबा देणं म्हणजे क्षा. म. समाजाचे संस्थापक डॉ. शिरोडकर, एच्. डी. गावकर ह्या ऋषीतुल्य महामानवांशी गद्दारी होय.
२०१२ साली खऱ्या अर्थाने `परिवर्तन' झाले असे वाटत होते. २०१२ पुर्वीही १०-१५ वर्षे हात वर करून चुकीचे ठराव संम्मत केले गेले. त्यामुळे पाटीलकी प्रस्थापित झाली व समाजाचे कसे अतोनात नुकसान झाले; ते आपण पाहिले. तरीही आज इतिहासापासून धडा न घेता नातं व स्वार्थ जपणारी मंडळी समाजाच्या सभेमध्ये चुकीच्या बेकायदेशीर ठरावांना डोळे बंद करून साथ देते. त्यातून जे समाजाचे नुकसान होणार आहे; त्यास सर्वस्वी हीच माणसं जबाबदार असणार आहेत. कारण त्यांनी प्रश्नकर्त्यांचे प्रश्न नमके काय आहेत? हे जाणूनच घेतले नव्हते. अशा पद्धतीने हात वर केले त्यांनी समाजाचा आर्थिक हिशोब शुद्धीवर राहून प्रामाणिकपणे तपासावा म्हणजे प्रश्नकर्त्यांची समाजहिताची भावना व समाजाबद्दलची तळमळ लक्षात येईल; एवढंच आमचं म्हणणं आहे. कशाला पापाचे वाटेकरी होता. वाल्याकोळ्याची बायकामुलं-आईवडील त्याच्या पापात सहभागी होण्यापासून दूर राहिले. केवळ एकावेळच्या जेवणासाठी आणि केवळ आपला नातलग व मित्र आहे म्हणून किंवा चांगले संबंध आहेत म्हणून चुकीच्या बेकायदेशीर ठरावांना पाठिंबा देणं म्हणजे क्षा. म. समाजाचे संस्थापक डॉ. शिरोडकर, एच्. डी. गावकर ह्या ऋषीतुल्य महामानवांशी गद्दारी होय.
चुकीच्या ठरावांना पाठींबा मिळविण्यासाठी काही मंडळी समाजबांधवांशी चांगले संबंध ठेवण्याचा आभास निर्माण करतात. पण आपल्याशी चांगले संबंध ठेवण्यामागे त्यांना मलिदा मिळवून देणारी सत्ता टिकविण्याचा स्वार्थ असतो. ते कपट वेळीच ओळखले पाहिजे नाहीतर समाजाचं काही खरं नाही.
चुकीच्या ठरावांना पाठींबा देण्याची कृती संपूर्ण समाजावर विपरीत परिणाम करणारी आहे. वर्षाने एकदा गैरकारभाराबाबत जाब विचारण्याची संधी सच्च्या प्रामाणिक अभ्यासू समाजबांधवांना येत असते. त्यांचे प्रश्न काय? हे ऐकून घेतल्यास समाजातील गैरव्यवहार उजेडात येऊ शकतात-सर्वांच्या लक्षात येऊ शकतात. काही निवडक समाजबांधव अज्ञानामुळे-सत्ताधाऱ्यांच्या नादी लागल्यामुळे ती संधी घालवितात.
विचार न करता हात वर करणाऱ्या मंडळींमुळे `स्वप्नीकपाटीलशाहीचा' उदय काही वर्षापुर्वी झाला होता; त्याच वृत्तीमुळे गैरकारभार करणाऱ्या `पादशाहीचा' उदय पुन्हा एकदा झाला आहे. दुसरीकडे त्याच्या विरोधात सच्चे, प्रामाणिक, समाजहित जाणणारे व जपणारे संजय गिरकर, राकेश कांबळी, सुनिल जेठे, राम गावडे, विजय मुंबरकर, संतोष वाळके, सुरेश डामरे, संदिप शिर्के, मंगेशी मसुरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेकायदेशीर ठरावांना जोरदार विरोध केला. ह्या समाजबांधवांनी सभेपुर्वी मुदतीत नियमानुसार लेखी प्रश्न विचारले होते. त्याची उत्तरं समाजबांधवासमोर यायला हवी होती; पण तसे घडले नाही.
गेल्यावर्षीची सभा १२-१५ मिनिटात गुंडाळण्यात आली. तसेच कार्यकारी मंडळामध्येही गेल्या दिड वर्षाच्या कारभाराबाबत प्रचंड अस्वस्थता आहे. ह्याची भीती वाटल्याने प्रश्नकर्त्यांना नंतर बोलायला दिले. तरीही त्या संधीचा वापर करुन संजय गिरकर, राकेश कांबळी, सुनिल जेठे, राम गावडे, विजय मुंबरकर, सुरेश डामरे आणि संतोष वाळके यांनी सध्या चाललल्या समाजाच्या गैरकारभाराविरुद्ध वाभाडे काढले. नव्हे समाजामध्ये कसा गैरकारभार चालतो आहे? ते परखडपणे सांगितले.
जमाखर्च, अंदाजपत्रक, ठराव, शिक्षकांच्या बदल्या नाटे शैक्षणिक प्रकल्प, मागाठणे प्रकल्प, सीबीएसई बोर्ड, कॅटरिंग, विश्वस्त व सुकाणू समीतीच्या सदस्यांची निवड, वकीलांवरील खर्च अशा अनेक महत्वाच्या विषयावर त्यांनी खरं वास्तव सभागृहासमोर मांडलं. त्यांचे त्रिवार आभारच मानायला हवे. कारण सत्ताधाऱ्यांची डोळे बंद करून बाजू घेणाऱ्यांपेक्षा समाजहितासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ठामपणे पवित्रा घेणारे आभारास पात्र आहेत. ऋषीतुल्य संस्थापक डॉ. शिरोडकर, एच् डी. गावकर यांच्या विचारांनी प्रेरीत असणारेच समाजबांधव अशी समाजहिताची भूमिका घेऊ शकतात, असं आमचं स्पष्ट मत आहे.
सभेच्या काही दिवसापूर्वी नियमानुसार लेखी प्रश्न समाजबांधवांनी विचारले होते. त्याची सभागृहात सविस्तर योग्य खुलासा करणारी उत्तरे मिळायला हवी होती. ते प्रश्न सत्ताधिशांना नागवे करणारे होते म्हणूनच ते प्रश्न नेमके कोणते होते? त्याची आपण पुढील लेखातून चर्चा करू.
चुकीच्या ठरावांना हात वर करणारी मंडळी आणि समाजहितासाठी ठाम भूमिका मांडणारे समाजबांधव ह्या सभेमध्ये पाहिले. पण आज जरी ‘असत्य’ जिंकल्याचा आभास निर्माण होत असला तरी उद्या ‘सत्य’ उघड होणारच आहे. कारण काळ आणि नियती कोणालाही सोडत नाही. `स्वप्नीकपाटीलशाहीचा' अस्त कधीच होणार नाही असं २०१२ पुर्वी वाटत होतं; पण नंतर काय झाले ते सर्वांना माहित आहेच. जर आताचे सत्ताधारी समाजहिताच्या बाजूने राहिले नाही तर ‘पादशाहीचा’ अस्त लवकरच होईल असं वाटतं. कारण कार्यकारणी, सुकाणू व विश्वस्त मंडळातील सदस्यांची अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे.
(क्रमशः)
-नरेंद्र राजाराम हडकर
