लेखांक ९ वा-
प्रवास तोच, पण उचित गोष्टींच्या संकिर्तनातून...
|| हरि ॐ ||
समाजबांधव व भगिनींनो, सप्रेम नमस्कार!
'समाज माझा, मी समाजाचा!' ह्या मथळ्याखाली क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज ह्या संस्थेबद्दल मला व हजारो समाजबांधवांना काय वाटते? ते स्पष्टपणे लिहिले. २० जुलै २०१७ ते २७ जानेवारी २०१८ ह्या कालावधीत अतिशय परखडपणे अगदी मनापासून आठ लेख लिहिले. प्रत्येक लेख लिहिताना 'क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज हा माझा आहे आणि मी ह्या समाजाचा आहे' ही शुद्ध मानाना परमात्म्याला स्मरून ठेवली. हजारो समाज बांधवांनी-समाज भगिनींनी आमच्या ह्या छोट्याशा प्रयत्नांना भरभरून पाठींबा दर्शविला. मी अनेकवेळा आवाहन करूनही लेखात मांडलेल्या गैर, भ्रष्ट गोष्टींबाबत कोणीही आक्षेप घेतला नाही. माझी मनापासून इच्छा होती की, जे काही लेखांमध्ये मांडले आहे, ते खोटं असत्य असल्याचा कोणीतरी खुलासा करील; दुसरी बाजू कोणीतरी मांडेल. पण आजपर्यंत तसं झालं नाही. आजपर्यंतच्या आठ लेखांमध्ये मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली. सदर आठ लेख समाजबांधवांनी पुन्हा पुन्हा वाचावेत आणि काही चुकीचे असल्यास सांगावे. कारण कोणावरही चुकीचे आरोप, कोणाचीही बदनामी होऊ नये; असं मला वाटतं!
मी लेख लिहून 'राजकारण करतो, खोटं बोलतो' असे म्हणून नुसती बोटं मोडण्याचा किळसवाणा प्रकार करू नका. माझ्या गावच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर सुकाणू समितीतील एका सदस्याने असाच एक निंदनिय आरोप केला. 'आम्हालाही लिहिता येते' असा इशाराही मला दिला. प्रथम त्या बिनडोक व्यक्तीने माझे आठही लेख वाचावेत. लिहिण्यासाठी अगोदर वाचावं लागतं. बेशुद्ध अवस्थेत वाचता येत नाही. लिहिण्याचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला दिलेले आहे. लिहा, बिनधास्त लिहा. आठ लेखांत आलेल्या प्रत्येक मुद्द्यांवर लिहा. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबई ह्या संस्थेचा कारभार कसा पारदर्शक आहे, ते तुमच्या लिखाणातून स्पष्ट होऊ दे!
पटण्यालायक लिखाण असल्यास आम्हीही जाहीर अभिनंदन करून आमच्याकडून चुकीचे लिखाण झाल्यास तसे स्पष्ट करू!
नाहीतर समाजाच्या क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या पतपेढीच्या निवडणूकीत ज्याने पतपेढीत आर्थिक गैरव्यवहार केला त्यालाच पाठींबा देण्याचा 'मिम' पराक्रम कोणी केला हे सगळ्या समाजाला माहित आहे; ते लिहायला भाग पाडू नका!
मी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही किंवा समर्थक नाही. मला क्षा. म. समाजातील गट-तट माहीत नाहीत आणि समाजाच्या संघटनेतील कुठल्याही पदावर डोळा नाही. एका प्रामाणिक जिव्हाळ्यातून ही लेखमाला मी लिहीतोय. गैरकारभार भ्रष्टाचार कसा झाला? हे लिहिल्यास हजारो लेख लिहावे लागतील; हे ध्यानी घ्यावे. कारण आम्हाला लेख लिहिताना जी काही माहिती मिळत गेली ती अत्यंत किळसवाणी आणि नैतिकता रसातळाला नेणारी होती. त्याबद्दल मी ह्या सदराखाली लेखन करू इच्छित नाही. एक वेळ आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांकडून वसुली करता येईल. पण घाणेरड्या गोष्टींची लंपटगिरी करणाऱ्यावर काय लिखाण करायचे?
एखाद्या प्रामाणिक माणसाने 'गटार' साफ करण्याचा प्रयत्न केला तर त्या गटारातील घाण त्याच्या अंगावर थोडीतरी उडणारच. मग 'गटारातील घाण' आनंदाने नाचते व त्या प्रामाणिक माणसालाच घाणेरडा म्हणून हिनवायला पुढे येते. पण त्या गटारातील घाणीला माहित नसते की, प्रामाणिकपणा हा परमात्म्याने दिलेला सद्गुण आहे म्हणून तो फक्त आणि फक्त पवित्रच असतो. पवित्रता कधीही गटाराच्या घाणीने बरबरट नाही किंवा अपवित्रही होत नाही.
वेळ पडल्यास समाचार घ्यायला आम्हाला कोणाच्या भाडोत्री डोक्याची -अक्कलेची आवश्यकता नाही. माझी लेखणी त्यास संपूर्ण समर्थ आहे.
तुर्तास हा विषय थांबवितो. कारण ही लेखमाला मला एका वेगळ्याच दिशेला न्यायची आहे. ह्याचाच विचार मी अनेक दिवस करीत आहे. आजचा नववा लेखही मला अशा सुंदर समाजाला दिशादर्शक विचारांना समर्पित करायचा होता; पण कधी कधी अंगावर बसलेली मच्छर हाकलावी लागते.
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजामध्ये अनेक अशा व्यक्ती आहेत; त्यांनी स्वत:च्या कर्तृत्वावर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ठसा उमठविला आहे. अनेक आदर्श व्यक्तीमत्वे आमच्या समाजात जन्माला आली आहेत; की त्यांनी समाजासाठी खूप कष्ट सोसले. समाजकारण असो वा राजकारण आपले नेतृत्व-कर्तृत्व सिद्ध केले. कोणी उद्योजक म्हणून नावारूपाला आले तर कोणी शिक्षण संस्था यशस्वीपणे चालविल्या. आमदार, खासदार, नगरसेवक, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, सरपंच असे अनेक लोकप्रतिनिधी होणारे आमच्या समाजात अनेक आहेत. सिनेसृष्टीमध्येही आमचे बांधा-भगिनी नाव कमावून आहेत. अनेक डॉक्टर-इंजिनिअर आपआपल्या क्षेत्रात आघाडीवर कार्यरत आहेत. नकील, सीए, पत्रकार, शिक्षक, प्राध्यापक म्हणून कार्य करणारे समाज बांधव-भगिनी संपर्कात आल्यावर खूप आनंद होतो. राजकारणामध्येही सक्रीय राहून नेतृत्व करणारे समाज बांधवा-मगिनी समाजसेवा करताहेत. ह्या सर्व समाज बांधा-भगिनींचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. त्यांची ओळख संपूर्ण समाजाला व्हायला हवी आणि त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा क्षा. म. समाजाला व्हायला पाहिजे; असे माझे मत आहे. तरच आमचा क्षा. म. समाज पुन्हा एकदा उजळून निघेल.
'समाज माझा, मी समाजाचा' ह्या सदराखाली ह्यापुढे आपण अशा नामवंत, प्रज्ञावंत, बुद्धीवंत, कर्तृत्ववान, प्रामाणिक, कार्यक्षम व्यक्तीमत्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.पण त्यासाठी मला तुमची साथ अपेक्षित आहे. अशा आदर्शवत व्यक्तींची आपण मला माहिती द्यावी, जेणेकरून त्यांच्याशी संपर्क करून त्यांचे सद्गुण आपल्या समाजासमोर मांडता येतील. त्यांचे सद्गुण, त्यांचा अनुभव, त्यांचे ज्ञान आमच्या क्षा. म. समाजासाठी कसे उपयोगात आणता येईल; त्याची चाचपणी आपण अवश्य करू.
चांगल्या गोष्टी कधी स्वत:हून आपल्याकडे येत नसतात; तर चांगल्या गोष्टींकडे आपणास स्वत:हून जावे लागते. तरच चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. क्षात्रकुलोत्पन्न मराठी समाजाला डॉ. शिरोडकर, एच. डी. गावकर ह्या ऋषीतुल्य महामानवांचा वारसा आहे. ही आमची दैवत आहेत. त्यांच्याच मार्गावरून जाताना आम्हाला आमच्याच समाजातील यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. ते मार्गदर्शन घेण्याची आमची तयारी आहे आणि समाजाच्या भल्यासाठी ती सर्वाचीच तयारी असली पाहिजे.
'समाज माझा, मी समाजाचा!' ह्या लेखमालेचा प्रवास भ्रष्ट कारभार संपविण्यासाठी सुरु झाला होता. तो प्रवास सुरुच राहणार आहे; फक्त उचित गोष्टींचे संकिर्तन करून! त्यासाठी आपली साथ मोलाची आहे; हे आम्ही कधीही विसरणार नाही! नाथसंविध्!
(क्रमश:)
-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक-पाक्षिक 'स्टार वृत्त'