लेखांक ८ वा- क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या भल्यासाठीच...

लेखांक ८ वा 

समाजहितासाठी दुटप्पी भूमिका नको!

।। हरि ॐ ।।
आम्ही स्व:ताच्या कुटुंबाबद्दल जेवढे संवेदनशील असतो; तेवढेच संवेदनशील आपण सभासद असलेल्या समाज संस्थेबद्दल का नाही? आम्ही आमच्या मुलांची निरंतर काळजी घेतो. आरोग्य, शिक्षण, करिअर अशा वेगवेगळ्या घटकांची काळजी वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर घेऊन त्यांच्याकडून चुकीचे काही घडल्यास समजावून सांगतो; प्रसंगी कानशिलात वाजवितो. कारण आम्हाला आमच्या मुलांचे भविष्य बिघडवायचे नसते. काय केल्याने व काय न केल्याने भविष्य उज्ज्वल होईल; ह्याचे ज्ञान अनुभवाने आपल्याकडे आलेले असते. परंतु ज्या संस्थेचे आम्ही सभासद असतो; त्या संस्थेमधील कारभार चुकीच्या पद्धतीने होत असल्यास त्या संस्थेचे भविष्यही लयाला जावू शकते. त्यासाठी आपल्याला सभासद म्हणून ठोस भूमिका घ्यावी लागते. चुकीला चूक म्हणण्याचं धारिष्ट तिथे दाखवावं लागतं. अन्यथा पदाधिकारी माझा मित्र आहे, नातेवाईक आहे, तो मला मान-इज्जत देतो, त्याच्याकडून मी माझा स्वार्थ साधलाय, भविष्यात माझं काहीतरी काम करेल; अशा क्षुल्लक गोष्टीसाठी आपण समाजातील गैरव्यवस्थेला अप्रत्यक्षरित्या मान्यता देत असतो. स्वत:च्या घरात काहीही गैर होऊ नये म्हणून काळजी घेणारे आपण; सभासद असलेल्या संस्थेत गैरकारभार होत असताना डोळेझाक करतो; हाच दुटप्पीपणा अतिशय वाईट असतो. क्षात्रकुलोल्पन्न मराठा समाज, परळ, मुंबई'चे आम्ही सभासद आहोत; आम्हाला त्याचा अभिमान असला पाहिजे. कारण डॉ. शिरोडकरांच्या आणि एच. डी. गावकर साहेबांच्या सर्वस्वी त्यागातून ही समाज संस्था उभी राहीली आहे म्हणून आम्ही आमची जबाबदारी ओळखून समाजहिताची ठोस भूमिका स्वीकारली पाहिजे. 

`क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज' संस्थेमध्ये डॉ. शिरोडकरांनी एक उत्तम व्यवस्था निर्माण केली. ती व्यवस्था एच. डी. गावकर साहेबांनी पुढे चालविली. त्या व्यवस्थेमध्ये सभासदांनी निवडून दिलेले कार्यकारी मंडळ, सुकाणू समिती आणि सर्वोच्च अशी विश्वस्त समिती अशी सुस्पष्ट व्यवस्था होती व आहे. समजा कार्यकारी मंडळाने आपले काम जबाबदारीने पूर्ण केले नाही तर सुकाणू समितीने आणि विश्वस्त समितीने महत्वाची समाजहिताची भूमिका घ्यावी व समाजामध्ये गैरकारभार होऊ नये म्हणून कार्य करावे अशी अपेक्षा होती. पण आज क्षा. म. समाज, परळ, मुंबईचे विश्वस्त कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत. त्याचेच वाईट वाटते.

आपल्या देशामध्ये वृद्ध झालेल्या नेत्यांना राज्यपाल पद देऊन राज्यकर्ते आपल्याला हवा तसा कारभार करण्यास मोकळे होतात. पण क्षा. म. समाज, मुंबईमध्ये विश्वस्त पद तसं नाही. विश्वस्तांनी `रबर स्टँम्प' बनू नये. त्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा समाजाला कसा होईल? हे पाहायला हवे. त्यांनी सुद्धा कार्यकारी मंडळाला गैरकारभाराबाबत जाब विचारला पाहिजे; पण दहा-पंधरा वर्षे तशी भूमिका घेतली गेली नाही; असे दिसते. 

क्षमा असावी; मी अनुभवी वृद्ध पित्यासमान असणाऱ्या विश्वस्तांबद्दल लिहितोय; ह्याचे भान मला आहे. परंतु सत्य मांडावेच लागेल. कारण मागील पंधरा वर्षात जे साधक-बाधक घडले, त्यावेळी विश्वस्तांनी आपली विश्वस्तगिरी प्रकट केली नाही; हे खेदाने म्हणावे लागते. अन्यथा `स्वप्नीक'वृत्ती निर्माणच झाली नसती. 

जेव्हा बापच आंधळा असतो व आई डोळ्यावर पट्टी बांधून घेते तेव्हा कौरव अधर्म करणारच! भर राजसभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जाते तेव्हा भिष्माचार्यासारखा महान योद्धा सुद्धा खाली मान घालून राहतो. म्हणूनच धृतराष्ट्र-गांधारी असो वा भिष्माचार्य असो; ते आमचे आदर्श होऊच शकत नाहीत. आमचा आदर्श श्रीकृष्ण असतो, अर्जून असतो. कारण त्यांनी बलाढ्य अधर्माविरोधात लढाई लढली व जिंकूनही दाखविली. अशीच भूमिका क्षा. म. समाजाच्या विश्वस्तांनी घ्यावी; असे माझे ठाम म्हणणे असून त्यांच्याबद्दल पूर्णपणे आदर ठेऊन मी हे विधान करतोय. 

विश्वस्तांचा विषय आहे म्हणून आठवलं. २३ जुलै २०१७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये श्री. बांदिवडेकरांना विश्वस्तपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव आला होता व तो सदस्यांनी महत्वाचे गंभीर मुद्दे लक्षात आणून दिल्यावर बासनात गुंडाळून ठेवण्यात आला होता. कारण त्यांनी पदावर असताना गैरकारभार केला व `स्वप्नीक फाटक'ला सर्वाधिकार दिले म्हणूनच मागाठणे प्रकल्पावर समाजचे करोडो रूपये खर्च होऊनही त्या प्रकल्पातून मिळणारा लाखो रूपायांचा फायदा समाजाला मिळत नाही. हे वास्तव समजून घेतलं पाहिजे. तरीही १४ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत जो अहवाल देण्यात आला; त्या अहवालानुसार श्री. बांदिवडेकर विश्वस्त असल्याचे समजले. विद्यमान अध्यक्षांनीच श्री. बांदिवडेकर यांच्याविरोधी संबंधित खात्याकडे पुर्वीच तक्रार केलेली आहे. तरीही त्यांनाच विश्वस्त केले गेले. विश्वस्त हा सर्वसाधारण सभेत निवडला जातो; मग सभासदांना अंधारात ठेऊन हा निर्णय का घेतला गेला? सर्वसाधारण सभेचा म्हणजेच सभासदांचा हा अवमान ठरतो. सर्वसाधारण सभेमध्येच सभासद आपले प्रश्न विचारू शकतो-आपली भूमिका मांडू शकतो. परंतु सभासदांचा हक्क १४ जानेवारीच्या सभेमध्ये पायदळी तुडविण्यात आला. एवढंच नव्हेतर सभासदांना न विचारता विश्वस्त नेमण्याचा प्रतापही करण्यात आला. ह्याचा समाजबांधवांसाठी खुलासा व्हायलाच हवा. कार्यकारणी मंडळाचा हा दुटप्पीपणा योग्य नाही. 

समाजहितासाठी दुटप्पी भूमिका नको!
शिरगाव पंचक्रोशिच्या एका सभेमध्ये (२०१७ च्या निवडणूकीपुर्वी) मी हजर होतो, त्यावेळी श्री. बांदिवडेकरांनी विद्यमान अध्यक्षांच्या विरोधात अनेक गोष्टी सांगितल्या. त्यासंदर्भात सभेतील उपस्थित जेष्ठ सदस्यांनीही गैरकारभाराविरोधी भूमिका घेतली. मी स्वत: तेव्हा `लेखी आरोपपत्र जाहीर करा' असे सांगताच, श्री. बांदिवडेकरांनी ``अध्यक्ष श्रीपाद फाटकांच्या विरोधातील गैरकारभार मी पुस्तकरूपाने लवकरच प्रसिद्ध करीन;'' असे जाहीर केले. मला श्री. बांदिवडेकरांबद्दल विशेष आस्था वाटली. पण ते आरोपांचे पुस्तक काही आजपर्यंत प्रसिद्ध झालेच नाही. त्यांची भूमिका का बदलली?  

क्षा. म. समाज, मुंबईचे विश्वस्त पद वडिलधाऱ्या मार्गदर्शकाचे असायला हवे, प्रामाणिक व कार्यक्षमतेने कार्य करणाऱ्या जेष्ठाचे असायला हवे, समाजासाठी त्याग करणाऱ्या व त्याग करण्याची वृत्ती करणाऱ्या समाजहितचिंतकाचे असायला हवे, समाजहितासाठी ठाम भूमिका घेणाऱ्या समाजप्रेमीचे असायला हवे. क्षा. म. समाज, मुंबईच्या विश्वस्तपदावर बसणाऱ्या व्यक्तीने आपल्या पुत्राला सभेतील बेजबाबदार गुंडगिरी वर्तवणूकीपासून लांब ठेवायला पाहीजे. हा क्षा. म. समाजाचा इतिहास नाही; हे ध्यानी घ्यावे. आंधळ्या पुत्र प्रेमाने समाजाची कशी वाताहत होते? ते समाजाने पाहिले आहे. क्षा. म. समाज म्हणजे शेरेगरचा चिटफंड नव्हे! हे आम्ही लक्षात ठेवले तरी खूप चांगले होईल. विश्वविद्यालय सुरु करणाच्या बाता मारणाऱ्यांनी ह्याची जाणीव ठेवावी!

क्षा. म. समाज, मंबई संस्थेमध्ये असणाऱ्या प्रत्येक सभासदाने क्षा. म. समाजाच्या भल्याचाच विचार केला पाहिजे. जे समाजाच्या भल्याचे नाही, जे समाजाच्या सर्वांगिण विकासाच्या आड येत आहे, ज्याने समाजाची प्रगती रोखली जाईल; अशा गोष्टी रोखल्या पाहिजेत. आणि अशा गैरगोष्टी करणाऱ्या व्यक्ती दूर केल्या पाहिजेत; मग त्या आमच्या रक्तातील नात्यातील असल्या तरी चालतील. इथे आमची दुटप्पी भूमिका चालणार नाही! 
नाथसंविध्!  
(क्रमश:)
-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक-पाक्षिक `स्टार वृत्त'