लेखांक ७ वा- समाजबांधवांनो आतातरी जागे व्हा!

लेखांक- ७ वा 

समाजबांधवांनो आतातरी जागे व्हा! 

।। हरि ॐ ।।
‘समाज माझा, मी समाजाचा’ ही लेखमाला सुरू करण्याचा नेमका उद्देश काय? असा प्रश्न नक्कीच आपणास पडला असेल आणि तो पडला पाहिजे. मागील सहा लेखांमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तरीही पुन्हा एकदा मी माझी भूमिका स्पष्ट करीत आहे.

`क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबई'चे संस्थापक डॉ. रामचंद्र शिरोडकर आणि त्यांच्यानंतर संस्थेचे मुख्य असणारे एच. डी. गावकर ह्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वांनी आपल्या समाजाला-`क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबई' ह्या संस्थेला नावारूपाला आणलं. शिक्षणतज्ञ डॉ. अंकुश गावडे, शिक्षण प्रसारक भाऊसाहेब लोकेगावकर, सहकार महर्षी सहदेव फाटक या महामानवांनी शैक्षणिक व सहकार क्रांती घडवून आणली. त्यासाठी त्यांनी जो त्याग केला, तो आम्हाला आदर्शवत असला पाहिजे. त्यांचे संपूर्ण जीवनच हा समाजाच्या भल्यासाठी असणारा यज्ञ होता. त्या यज्ञात ह्या महान तपस्यांनी त्यागरूपी समिधा अर्पण केल्या. त्यांना आपल्या समाजबांधवांचे सर्वांगिण सुंदर कल्याण करायचे होते. हेच त्यांचे ध्येय होते. त्या त्यागयज्ञातून तयार झालेल्या शैक्षणिक-आर्थिक विकासाच्या रोपाचे रूपांतर आज वटवृक्षात झाले. ते अजून खूप खूप मोठे झाले पाहिजे. त्यांनी लावलेल्या वृक्षाला किड लागू नये, असे आमचे प्रामाणिक मत! 

क्षा. म. समाज म्हणजे माझी पंढरी. ज्याप्रमाणे वारकरी त्या विठू माऊलीला शरण जातात, त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात. तसंच प्रेम आम्ही  डॉ. शिरोडकरांवर, एच. डी. गावकर, डॉ. अंकुश गावडे, भाऊसाहेब लोकेगावकर, सहदेव फाटक यांच्यावर केलं पाहिजे आणि कोणी आपला स्वार्थ साधण्यासाठी त्यांच्या महान ध्येयाच्या आड येत असेल तर त्याचा स्पष्ट शब्दात समाचार घेतला पाहिजे; असे आम्हाला वाटते. 

`क्षा. म. समाज, मुंबई' ह्या संस्थेत गैरकारभार करणारा कोणीही असो. त्याला जोपर्यंत बाजूला केले जात नाही तोपर्यंत संस्थेच्या वटवृक्षाला लागलेली वाळवी नष्ट होणार नाही. मला स्वत:ला गट, तट मान्य नाहीत. जो परमात्म्याला स्मरून समाजाचे शुद्ध प्रामाणिक कार्य करतो, तोच खरा! मग ज्याच्याकडे भ्रष्टाचार व गैरकारभाराच्या दृष्टीने पाहिले जाते; नव्हे तशी संशयास्पद परिस्थिती निर्माण ज्यांनी करून ठेवलेली आहे; ते सुद्धा स्वत:ला प्रामाणिक सच्चे असल्याचा आव आणतील. सभ्यतेचा, उच्चविद्याविभूषित असल्याचा मुखवटा घालतील. मग खरं कोण आणि खोटं कोण? ह्याचा शोध लावायचा कसा? माझं ह्याबद्दल स्पष्टपणे म्हणणे आहे की, ज्यांच्यावर आज संस्था  चालविण्याची जबाबदारी आहे आणि जे आज आरोप-प्रत्यारोप करीत आहेत; ह्या दोन्ही बाजूच्या नेत्यांनी-लोकांनी आपल्या देवाला स्मरून आपल्या मुलाबाळांची, आईबापाची, पतीपत्नीची शपथ घ्यावी की, ``मी क्षा. म. समाजाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे एक रूपयाही खाल्लेला नाही व भविष्यात खाण्याचा विचारही करणार नाही!'' 

आजच्या सैतानी कलियुगात अशा शपथा भ्रष्टाचारी-गैरव्यवहारी सहजपणे घेऊ शकेल; असं कोणीही म्हणेल. परंतु हा राजकारणाचा अड्डा नाही. `क्षा. म. समाज, मुंबई' ह्या संस्थेची वास्तू पवित्र मंदिर आहे व त्या मंदिरातील डॉ. शिरोडकर व एच. डी. गावकर हे दोन देव आहेत. त्यांच्यावर समाजबांधवांची श्रद्धा आहे; हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.

एक रूपयाचा ताळमेळ बसत नाही म्हणून रात्रभर जागरण करून जमाखर्च तपासणाऱ्या डॉ. शिरोडकरांची कृती आजच्या जमान्यात आम्हाला हास्यास्पद वाटेल. पण त्यांच्या ह्या सज्जन, प्रामाणिक, कार्यक्षम, तत्पर, कार्यातूनच `क्षा. म. समाज, मुंबई' ही शैक्षणिक संस्था उभी राहिली; हे लक्षात ठेवलं पाहिजे.

१४ जानेवारी २०१८ रोजी विशेष सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेचे मुख्य विषय होते; २०१६-२०१७ सालचा जमाखर्च मंजूर करणे व २०१७-१८ सालची अंदाजपत्रके मंजूर करणे. ह्या सभेमध्ये मी स्वत: उपस्थित होतो. तत्पुर्वी काही समाजबांधवांनी लेखी प्रश्न विचारले होते. ते प्रश्न अत्यंत गंभीर होते. पण त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे धारिष्ट्य कोणामध्येही दिसले नाही.

सभा पंधरा- वीस मिनिटात संपविण्याचा इतिहास घडला; जो क्षा. म. समाजाला काळीमा फासणारा आहे. कारण....

१) २७ सप्टेंबर २०१७ रोजी वैधानिक लेखा परिक्षण अहवाल प्राप्त होऊनही ३ जानेवारी २०१८ रोजी सभेची नोटीस दै. `नवशक्ती'मधून प्रसिद्ध होते. ८ जानेवारी २०१८ पर्यंत प्रश्न विचारण्याची मुदत दिली जाते. म्हणजे तीन महिन्यापुर्वी अहवाल प्राप्त होतो. आणि समाजबांधवांना फक्त ४ ते ५ दिवस प्रश्न विचारण्यासाठी दिले जातात. ह्या वरून सत्ताधाऱ्यांच्या मनातील हेतू स्पष्ट होतो.

करोडो रूपयांचा जमाखर्च अभ्यासपूर्ण वाचून त्यातील त्रुटी शोधून काढणे हे किती समाजबांधवांना शक्य आहे? तरीही चार-पाच समाजबांधवांनी लेखी प्रश्न विचारले. त्यांचे अभिनंदन करावेच लागेल. 

२) १४ जानेवारीच्या सभेमध्ये सत्ताधाऱ्यांना साथ देणाऱ्या कितीजणांनी अहवाल वाचून अभ्यास केला होता? हा गंभीर प्रश्न असून फक्त `माझा नातेवाईक' किंवा `मला त्यांच्यापासून लाभ होऊ शकतो'; ह्यासाठीच सत्ताधाऱ्यांना साथ देणारे समाजाचं वाटोळं करीत नाहीत का?

३) सभेमध्ये प्रथम जमाखर्च वाचन खजिनदारांकडून केले जाते. त्यानंतर शुद्धीपत्रक, प्रश्नांची उत्तरे दिली जातात. नंतर जमाखर्च मंजूर होतो. त्यानंतर पुढील अंदाजपत्रक मंजूर होते. ही प्रथा आहे आणि नियमही आहे. 
पण सभेला खजिनदारच उपस्थित नव्हते, हे अध्यक्षांनी सभागृहाला का सांगितले नाही? ह्याचा अर्थ खजिनदारांना जमाखर्च मान्य नव्हता का? `२०१६-१७ सालचा जमाखर्च मंजूर करीत आहोत.' अशा एका ओळीचा ठराव मांडून ते मंजूर करून घेण्याची घाई काय दर्शविते? अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे लपविण्यासाठी ही अवदसा आठवली नाही ना? 

४) समाजबांधवांनी जमाखर्चाबाबत दिलेल्या प्रश्नांना थातुरमातुर उत्तरे शुद्धीपत्रक-माहितीपत्राद्वारे देण्यात आली ती नियमाला व नैतिकतेला धरून नाही. ह्याबद्दल कोणाचा आक्षेप असल्यास आम्ही पुराव्यानिशी स्पष्ट करू! तीन महिन्याचा कालावधी असताना अहवालात त्रुटी राहतात आणि जेव्हा समाजबांधव प्रश्न विचारतात तेव्हा भोंगळ शुद्धीपत्रक दिले जाते; ते सुद्धा नियमबाह्य! 

५) समाजबाधवांनी विचारलेला एक प्रश्न असा होता की, २०१७ च्या लेखापरीक्षण अहवालात डॉ. शिरोडकर कर्मचारी पतपेढीला खालीलप्रमाणे रक्कमा दिलेल्या आहेत. 

अहवाल पान नं. ६९ वर क्षा. म. समाज इंग्लिश मिडियम स्कुलने ३ लाख, २५ हजार, ७२६/-रूपये व अहवाल पान नं. १२५ वर क्षा. म. समाज ज्युनि. कॉलेजने (परेल) ५ लाख, ३५ हजार,  ५५३/- रूपये डॉ. शिरोडकर कर्मचारी पतपेढीला दिले आहेत. परंतु डॉ. शिरोडकर कर्मचारी पतपेढीत वरील रक्कम जमा झाल्याची नोंद नाही. असे पतपेढीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मग ह्या प्रश्नाचे उत्तर का दिले नाही?

६) मागाठाणे येथील इमारत, भुखंड, तेथील शिक्षण संस्था, व्यावसायिक जागा समाजाच्या ताब्यात आजपर्यंत आल्या नाहीत. हे कोणाचे अपयश? तेथील उत्पन्न कोणाच्या खिशात जाते? हे का सांगितलं जात नाही? तरीही तेथे शाळा सुरू करण्याचा मानस आहे असे सांगून ५ लाखाची तरतुद कशी काय केली जाते? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळायला नको का?

समाजबांधवांनो-समाजभगिनींनो असे अनेक मुद्दे, प्रश्न निर्माण होतात. ते गंभीर आहेत. हे समाजबांधवांसमोर यायलाच पाहिजेत. म्हणूनच मागील लेखाचे शिर्षक होते; ‘सावधान!’ तरीही आम्ही सावध झालो नाही. स्वत:ला ज्ञानी समजणाऱ्या नेत्याने ह्या प्रश्नाची उत्तरं द्यावीत. `दुसऱ्याला अर्धवट ज्ञान आहे' असे म्हणून समाजाला रसातळाला नेऊ नये; असे माझे स्पष्ट मत आहे. 

भूतकाळात एकमेकांवर आरोप करणारे वर्तमानकाळात एकत्र आले आहेत. भविष्यात कोण कुठे असेल? माहित नाही. कोण कुठल्या गटाचा मला समजत नाही. पण भ्रष्टाचार-गैरकारभार होऊ नये व समाजाची दैदिप्यमान प्रगती व्हावी; हेच मनापासून वाटते म्हणूनच हा लेखन प्रपंच! 

कोणावर तरी नाहक टीका करावी किंवा कोणाला बरे वाटावे, त्यासाठी आजपर्यंत लिखाण केले नाही आणि करणार नाही. पत्रकारिता हे परमात्म्याचे व्रत आहे; ते शुद्धतेने पाळायचे असते. पत्रकारितेच्या माध्यमातून तसेच अन्य कुठल्याही मार्गाने `मी कधीही भ्रष्टाचाराचा एक रुपयाही घेतलेला नाही' हे मी शपथेवर सांगू शकतो. अशी भूमिका जर प्रत्येकाने मांडली तर भ्रष्टाचार-गैरव्यवहार करणाऱ्यांना पळता भुई कमी होईल!

क्षा. म. समाजबांधवांनो आतातरी जागे व्हा! नाथसंविध्!
(क्रमश:)
-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक-पाक्षिक `स्टार वृत्त'