लेखांक दुसरा- भ्रष्टाचार व गैरकारभार नकोच!

लेखांक दुसरा

भ्रष्टाचार व गैरकारभार नकोच!

।। हरि ॐ ।। 
समाजबांधवांशी संवाद साधावा, ह्या कळकळीने केलेल्या लेखनाला आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिला, त्याबद्दल मन:पुर्वक धन्यावाद! 

अनेकांनी आपआपल्या प्रतिक्रिया कळविल्या. प्रत्येकाला समाजाबद्दल कळवळा आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे आणि आपल्या क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या माध्यमातून उत्तुंग कार्य व्हावं, अशी भावना असल्याचे जाणवले. खूप आनंद झाला. सकारात्मक स्पष्ट विचारातून उभी राहिलेली चळवळ समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी हितकारक ठरू शकते. 

पहिला लेख लिहिताना अनेक गोष्टींचा त्रोटक आढावा घेतला होता; पण आता आपणास एक एक मुद्दा अधिक सविस्तरपणे पाहावा लागेल. तत्पुर्वी दोन-तीन घटनांचा उल्लेख टाळता येण्यासारखा नाही. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे २३ जुलै २०१७ रोजी  `क्षा. म. समाज, परळ, मुंबई' ह्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. दुसरी गोष्ट म्हणजे नुतन कार्यकारणीने पदाधिकारी जाहीर केले. तिसरी गोष्ट म्हणजे श्री. नामदेव विश्राम परब यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केलेली लेखी तक्रार.

२३ जुलै २०१७ रोजी `क्षा. म. समाज, परळ, मुंबई' ची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. माझ्या माहितीनुसार ही सभा ऐतिहासिक सभा होती. कारण मागील वर्षाचा जमाखर्च ह्या सभेत मंजूर झाला नाही. त्यामुळे पुढील वर्षाचे अंदाजपत्रकही मंजूर होऊ शकले नाही. त्यासाठी आता विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी लागणार आहे. ह्या दोन्ही गोष्टी जेवढ्या दिसतात तेवढ्या साध्यासोप्या नाहीत. कारण कुठल्याही संस्थेचा जमाखर्च हा वादातीत असता कामा नये. पण तो अनेक त्रुटींनी भरलेला असल्याने त्याबाबत अध्यक्ष श्री. रविंद्र गावकर यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद होती. त्यांनी जे काही सत्य उघड केले ते समाजाच्या आर्थिक व्यवहारासाठी घातक आहे. त्याचा गंभीर विचार समाजबांधवांना करावाच लागणार आहे. 

नुकतीच निवडणूक झाली आणि एका पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे १९ उमेदवार निवडून आले. त्यांनी आपले पदाधिकारीही जाहीर केले आहेत. निवडून आलेल्या सर्वांचे आम्ही मन:पुर्वक अभिनंदन करीत आहोत. तसेच जे पदाधिकारी म्हणून जाहीर झाले आहेत त्यांचे विशेष अभिनंदन करून `समाज हिताचाच विचार करून निर्णय घ्यावा' अशी विनंती करतो. 

आमची लढाई, आमचा रोष, आमचा रोख आहे तो भ्रष्टाचारी गैरकारभार करणारे जे कोणी आह्रेत त्यांच्या विरोधात. मग तो कोणीही असो. विशेष म्हणजे सगळेच भ्रष्टाचार व गैरकारभार करणारे होते, आहेत आणि असतील; असं विधान करणं अनुचित होईल. त्यामुळे जे पदाधिकारी आणि कार्यकारणी सदस्य आहेत त्यांनी समाजाच्या सर्वांगिण भल्यासाठी त्यागवृत्तीने प्रामाणिक व कार्यक्षमतेने कार्य करावे; हीच अपेक्षा!

तिसरा मुद्दा खूपच गंभीर आहे. श्री. नामदेव परब यांनी धर्मादाय आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. निवडणूक कालावधीत भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप करण्यात आहे. त्याची सखोल चौकशी करण्यात यावी; असे  तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक कालावधीत जी पत्रके प्रसिद्ध केली गेली त्यांचा पुरावा म्हणून वापर केला आहे. असो. प्रत्येकजण समाजाच्या भल्यासाठी आपआपल्यापरीने क्रिया करीत असतो. परंतु तक्रारदाराने माजी अध्यक्ष श्री. रविंद्र गावकर यांच्याकडून पुरावे घेतले असते तर बरे झाले असते. कारण त्यांनी एका जाहीर सभेत व वार्षिक सर्वसाधारण सभेत आर्थिक गैरव्यवहार झालेली कागदपत्रे दाखविली होती. 
२०१२ मध्ये जेव्हा तात्कालिन मुख्यकार्यकारी अधिकारी असणाऱ्या इसमाच्या विरुद्ध निवडणूक लढविताना अनेक मुद्दे वचननाम्यात दिलेले होते. पण त्यानंतरच्या पाच वर्षात काय झाले ते आपल्या सर्वांसमोर आहे. २०१२ च्या निवडणुकीतल्या मुद्द्यांबाबत पहिल्या लेखामध्ये उल्लेख आला होता. त्याची अनेकांनी विचारणा केली म्हणून त्या पत्रकातील ठळक मुद्दे देत आहे; म्हणजे बऱ्याच गोष्टी सहजतेने समजून येतील. पत्रकातील ठळक मुद्दे.... 


डॉ . शिरोडकर पार्टी परिवर्तन पॅनल 
(कट्टर समाज बांधवांचे राजकिय पक्ष विरहीत पॅनल) 
हे परिवर्तन पॅनल समाजाच्या विरोधी नसून समाजाच्या शिक्षण संस्थेत तसेच पतपेढीत गैरकारभार करणाऱ्या नाशिकच्या पाटलाच्या विरोधात उभं आहे. 

कै. डॉ. रा. का. शिरोडकर, कै. एच. डी. गावकर, कै. विजयाताई गावकर व कै. सुभाष शंकर फाटक सर यांनी निस्वार्थी वृत्तीने अहोरात्र परिश्रम करून महाराष्ट्र राज्यात समाजाला व शिक्षण संस्थांना सन्मानाने प्रतिष्ठा मिळवून दिली व समाज बांधवांना मानाने जगावयास शिकविले. 

आज शिक्षण संस्थेत संचालक कै. सुभाष शंकर फाटक सरांच्या निधनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नाशिकच्या पाटीलशाहीच्या साथीने बेबंदशाहीला सुरूवात केली आहे. आपल्या कारभारात कोणीही ढवळाढवळ करू शकणार नाही ह्या गुर्मीने कार्यकारी मंडळाला काडीमात्र किंमत न देता समाजात व शिक्षण संस्थेत धुडगुस घालीत आहेत. समाजाच्या गेल्या चार वार्षिक सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपल्याला राजकिय नेत्यांचा आशीर्वाद आहे असे भासवून व समाजाला आरक्षण लवकरात लवकर मिळणार आहे; अशी दिशाभूल करून समाजाला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

समाजाच्या सभेत मोठमोठ्या राजकिय पुढाऱ्यांची नावे घेऊन आपली खोटी राजकिय प्रतिष्ठा उंचावत समाजावर राजकिय दहशतीचा प्रभाव पसरविणे हाच यांचा हेतू. जर यांची राजकिय ताकद मोठी असेल तर नुकत्याच पार पडलेल्या मुंबई सहकारी बोर्डाच्या निवडणुकीत मुख्य कार्यकारी यांचा दारूण पराभव का झाला? तेव्हा यांची राजकिय ताकद कुठे गेली? ज्या राजकिय पुढाऱ्यांची हे सभेत नावे घेतात त्या पुढाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे पाढे वर्तमान पत्रातून व टी. व्ही. चॅनलवर दाखविले जात आहेत. 

तेव्हा हीच का यांची राजकिय दैवतं! 

समाजात व शिक्षण संस्थेत आपला आवडता सहकारी, पडद्यामागचा सूत्रधार व ठेकेदार सचिन पाटील याच्या ठेकेदारीचं वर्चस्व राखण्यासाठी शाळा प्रवेश पैसे, हॉल डेकोरेशन, बांधकाम व रंगोरंगोटी, इलेक्ट्रीक व्यवस्था, शालेय बसव्यवस्था व संगणक विभाग इत्यादी कामे पाटीलशाही दंडुकीचा धाक दाखवित आपल्याकडे घेणे हाच यांचा स्वार्थी उद्योग. मागाठणे येथील शाळेच्या बांधकामाचा अर्थिक अहवाल अजूनही दाखवला नाही. 

सुरुवातीला बेरोजगार संघटनेला मदतीचा हात देऊन आता त्यांच्या तोंडाला पाने पुसून सध्या पाटील शाहीच्या संस्थांना मदत करणे हा ह्यांचा तोडपाणीचा धंदा. समाज शिक्षण संस्थेच्या सर्व विभागात (मालवण, मिठबांव, मुंबई व मागाठणे) येथे नोकर भरती ही पाटील व त्यांच्या नातेवाईकांचीच केली जात आहे व पुढेही चालू ठेवण्याचा यांचा इरादा पक्का आहे. समाज बांधवात सुशिक्षित व लायक उमेदवार नाहीत काय?

शिरोडकर हायस्कूलमधील शिशू विकास मंदिर हा हॉल एक खाजगी संस्थेला दहा लाख रूपयात कायम स्वरूपी देण्याच्या कृतीला विरोध झाल्याने तो व्यवहार झाला नाही.  
-----------------------------------------------
(सदर पत्रक खूप मोठे आहे. त्यामुळे ते पुढील लेखात घेऊ!) हे सर्व वाचल्यावर आपल्याला समाजातील वाईट गोष्टींचा मागोवा घेणं सोपं जाईल. समाजात भ्रष्टाचाराचा उगम केव्हा व कसा झाला? त्यावर समाजबांधव विचार करू शकतील. परंतु भ्रष्टाचार-गैरकारभार रोखला गेलाच पाहिजे! ही आमची ठाम भूमिका आहे! आमच्या भूमिकेला पाठींबा द्याल का? जर लेखाबाबत काही आक्षेप असतील तरी अवश्य संपर्क साधा! `माझं तेच खरं' ही भूमिका आमची नाही!          (क्रमश:)
-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक-पाक्षिक `स्टार वृत्त' 
(प्रसिद्धी ता. २८ जुलै २०१७)