लेखांक-तिसरा
स्वत:चा स्वार्थ समाजाच्या भल्यापेक्षा मोठा नाही!
।। हरि ॐ ।।
२०१२ मध्ये तात्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या इसमाच्या विरुद्ध निवडणूक लढविताना अनेक मुद्दे वचननाम्यात दिलेले होते; ते मागील लेखामध्ये आपण पाहत होतो. त्याचा पुढील भाग.....
ग्रामीण विभाग:-
१) मिठबांव येथील श्री रामेश्वर हायस्कुलमधील हिशोबात दोन लाख आठ हजारांचा घोळ कसा झाला?
याचा शोध घेण्यासाठी कार्यकारी मंडळाने ७५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच चौकशी समिती नेमली. समितीने सर्व संबंधित अधिकारी यांची कसून चौकशी केली; त्यात सर्वजण दोषी आढळले. म्हणूनच तो अहवाल सुकाणू समिती तसेच कार्यकारी मंडळात ठेवला गेला नाही!
२) खासदार श्री. सुरेश प्रभू यांच्या फंडातून मालवण येथे समाज भवन हॉल श्री. मनोज लुडबे आणि सहकाऱ्यांनी पूर्ण केला. परंतु मिठबांव येथील समाज भवनाचे काय झाले?
३) कुडाळ (ओरोस) येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वत:च्या फायद्यासाठी स्वत:ची शिक्षण संस्था समाजाबाहेरील लोकांना विश्वस्त म्हणून घेऊन सुरू केली. परंतु गेली कित्येक वर्षे भिजत पडलेला नाटे प्रकल्प कधी पूर्ण करणार आहेत?
४) मालवण येथील रेकोबा हायस्कुलला लुडबे यांनी विनामुल्य दिलेली जागा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका खाजगी संस्थेला विकण्याचा प्रयत्न करताच तेथील ग्रामस्थांनी तो डाव हाणून पाडला. आपला समाज बांधव आता जागृत झाला आहे, हे ह्यावरून कळते.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांची १६ कलमी गाजराची पुंगी
१) कै. विजयाताई गावकर स्मरणार्थ रुग्णवाहिकेच्या घोषणेचे काय झाले? व त्यासाठीचे एक लाख वीस हजार रूपये नेमके गेले कुठे?
२) के. ई. एम. मधील डॉक्टर व नर्सना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या डब्याचे कॉन्ट्रक्ट समाजाच्या महिला बचत गटाला देण्यात येणार होते; ते न देता खाजगी बचत गटाला का देण्यात आले?
३) सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टकडून मागाठाणे प्रकल्पाला एक कोटी रूपयांची आर्थिक मदत मिळवून देण्याचे कबूल केले होते. यासाठी तीन सभासदांचे सदस्यत्व निलंबित केले गेले. ती मदत अजून का मिळाली नाही?
४) समाज बांधवांना आरक्षण लवकरात लवकर मिळेल असं गेली पाच वर्षे वार्षिक सभेत खोटी आश्वासने देताना सत्तेतील राजकिय पार्टी मदत करीत असल्याचे सांगता सांगता आता अचानक दुसऱ्या पक्षाचे माजी नगरसेवक आणि समाज बांधव श्री. मोहन लोकेगावकर मदत करीत असल्याचे उघड झाले आहे.
५) समाजातील बेरोजगार तरुणांसाठी सरकारी बेरोजगार संस्था स्थापणार यांचे नेमके काय झाले?
६) मागाठणे प्रकल्पाला खासदार सुप्रिया सुळे यांच्या निधीतून प्रकल्पाच्या खर्चाचे वीस टक्के मदत मिळणार होती; ती खासदारांनी देण्याची का नाकारली?
७) डॉ. शिरोडकर समाज मंदीर हॉलच्या नुतनीकरणाकरीता आमदार कपिल पाटील यांच्यातर्फे पाच लाखांची मदत मिळणार होती त्याचे काय झाले?
८) ग्रामीण विभागातील सर्व शिक्षण संस्थाना राजकिय पक्षातर्फे मोफत संगणक देणार होते. ते संगणक आजतागायत का मिळाले नाहीत?
९) नाटे प्रकल्पाच्या शैक्षणिक इमारतीचे बांधकाम हे खासदार श्री. निलेश राणे यांच्या फंडातून होणार होते. त्याचे काय झाले?
१०) अपना सहकारी बँकेत समाज बांधवांना नोकरीचे आमीष दाखविले जात आहे. प्रत्यक्षात आजतागायत कोणत्याही समाज बांधवास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातर्फे नोकरी मिळाली आहे काय?
११) आपल्या शैक्षणिक संस्थेकडे असलेली महाराष्ट्र राज्य शासनाची M. S. CIT ची मान्यता मुख्य कार्यकारी यांच्या गैरकारभारामुळे रद्द करण्यात आली आहे.
१२) C. B. S. C. चे वर्ग सुरु आहेत; पण त्याची मान्यता कुठे आहे?
१३) डॉ. शिरोडकर हायस्वूâलच्या गच्चीवर व्यायामशाळा (Body Metrix) सुरु करण्यात आली. या आर्थिक व्यवहाराचा मालक व सूत्रधार कोण आहे?
१४) सर्व महिला बचत गटांना समाजाकडून आर्थिक मदत व काम मुख्य कार्यकारी अधिकारी मिळवून देणार होते त्याचे काय झाले?
१५) क्षा. म. समाजाच्या पतपेढीत समाजाबाहेरील लोकांना पदाधिकारी करण्यामागचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा उद्देश काय आहे?
१६) मागाठणे येथील ह. द. गावकर संकुल चारकोपच्या एल. एन. इन्स्टीट्युटला विकले गेले आहे काय? मुख्य कार्यकारी अधिकारी हे किती खरे बोलतात? हे वरील १६ कलमी गाजराच्या पुंगीवरुन लक्षात आलेच असेल. अशा खोटारडेपणामुळेच संपूर्ण क्षा. म. समाज डॉ. शिरोडकर पार्टी परिवर्तन पॅनेलच्या सोबत आला आहे. त्यांच्या पॅनलला १६ पुरुष उमेदवार न मिळाल्यामुळे त्यांना दोन महिला उमेदवार खुल्या गटात उभ्या कराव्या लागल्या आहेत.
--------------------------------------
अशाप्रकारे प्रसिद्ध झालेल्या पत्रकाखाली ८१ नावे आहेत. ती सर्व नावे जागेअभावी छापता येणार नाहीत. ह्या ८१ नावांमध्ये राजकिय पुढारी, क्षा.म. समाजाचे आजी-माजी पदाधिकारी, क्षा. म. समाजाचे सभासद, समाजबांधव आहेत.
आज हे सर्व वाचल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात. निवडणूक प्रक्रिया जर नसती तर ह्या गोष्टी समाजबांधवांसमोर आल्या असत्या का? म्हणजेच लोकशाहीचा पाया निवडणुकीच्या माध्यमातून भक्कम होऊ शकतो.
खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराची किड लागण्यास सुरूवात झाली ती तात्कालीन संचालक सुभाष फाटक यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये. समाजाचे ऋषी एच. डी. गावकर यांनीच सुभाष फाटक यांची निवड केली होती; हेही इथे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजेच काळानुसार माणसाच्या विचारांमध्ये, कार्यामध्ये बदल होऊ शकतो; जो एखाद्या संघटनेला रसातळाला नेऊ शकतो. समाज घडविणारे डॉ. शिरोडकर, एच. डी. गावकर, विजयाताई गावकर यांनी काळानुसार विचारांमध्ये, कार्यामध्ये बदल केला नाही म्हणूनच त्यांचे महानत्व अजर-अमर राहिले. भारत देशाच्या इतिहासातच नव्हे तर जगाचा इतिहासात आदर्श ठरलेल्या व्यक्तींनी आपले उत्तुंग कार्य पूर्णत्वाला नेताना कधीही १) आपल्याला फायदा-तोटा किती? २) आपल्या कुटुंबियांना-नातेवाईकांना फायदा तोटा किती? ३) लोक काय म्हणतील? ४) आपल्याकडे नेतृत्व यावे. ५) आपल्याला लोकांनी मोठेपणा द्यावा. असे वाईट विचार केले नाहीत किंवा तशी कृतीही केली नाही आणि जे असा विचार करतात ते महान होऊच शकत नाहीत.
२०१२ मध्ये क्षा. म. समाजाची निवडणूक झाली तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर वरीलप्रमाणे आरोप करण्यात आले. परंतु असे आरोप करणाऱ्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला कित्येक वर्षे सर्व प्रकारची साथ देणारेही होते. आजही हीच माणसे आपल्या स्वार्थासाठी तळ्यात मळ्यात करीत राहतात. कारण त्यांना स्वत:चा स्वार्थ समाजाच्या भल्यापेक्षा खूप मोठा वाटतो.
मला एक समाज बांधव म्हणाला, ``मी समाजात पंचविस वीस वर्षे काम करतोय!'' मी त्याला म्हटले, ``खूपच सुंदर! पण तुम्ही क्षा. म. समाज संस्थांमध्ये घडणाऱ्या वाईट गोष्टींबद्दल किती आक्षेप नोंदविले. नेमकं काय केलं?'' त्यावर त्याच्याकडे उत्तर नव्हते. दररोज समाजाच्या ऑफिसमध्ये जायचे चहापाणी करून यायचे; म्हणजे समाज कार्य नाही. अशा मनोवृत्तीच्या लोकांना जवळ करून समाजात राजकारण केले जाते; ह्याचेच वाईट वाटते.
स्वत:च्या स्वार्थासाठी कोणी जर समाजामध्ये गैरव्यवहार, गैरवर्तवणूक, गैरकारभार करत असेल तर त्याला बाहेरचा रस्ता दाखविलाच पाहिजे. नाहीतर डॉ. शिरोडकरांनी लावलेल्या वटवृक्षाला......... (क्रमश:)
-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक-पाक्षिक `स्टार वृत्त'
(प्रसिद्धी ता. ३० जुलै २०१७)