लेखांक चौथा
भंपक नेतेच क्षा. म. समाजाच्या प्रगतीच्या आड!
।। हरि ॐ ।।
कालच भारताचा ७१ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभरात साजरा झाला. त्याच दिवशी गोपाळकाला असल्याने दहीहंडी फोडण्याचा उत्सव संपन्न झाला. आपण स्वातंत्र्यदिनासारखा राष्ट्रीय विशेष दिन तसेच धार्मिक सण एकाच वेळी साजरा करताना समाजहिताच्या गोष्टी त्यात कशा गुंफल्या गेल्या आहेत; त्याचा विचार करतो का?
इंग्रजांना शेवटी मायदेशी परतावे लागले. दिडशे वर्षाचा अन्यायी जुलमी सत्तेचा काळा सूर्य भारतामधून कधीच मावळणार नाही; अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु स्वातंत्र्यविरांनी-क्रांतीविरांनी इंग्रजांविरोधी जी निर्णायक भूमिका घेतली; ती इंग्रजांना न पेलणारी होती. ते राज्यकर्ते होते; तरीही त्यांना भारतातून शेवटी पळावेच लागले. अन्यायी राजवट, हुकूमशाही वृत्ती, स्वार्थाचा राक्षसीपणा इंग्रजांनी स्वीकारला आणि त्याला विरोध करणारी वीर मंडळी अखेर जिंकली. इंग्रज ही विकृती होती. ती विकृती संपविण्यासाठी भारतीयांना मोठा लढा द्यावा लागला म्हणूनच भारतीय स्वातंत्र्य लढा जगाच्या इतिहासात ठळकपणे तळपत राहतो.
आम्हाला सहजपणे स्वातंत्र्य मिळाले नाही; तर स्वातंत्र्य मिळवावे लागले. इंग्रजांची सत्ता भारतीयांनी उलथून टाकली. म्हणजेच भारतीयांनी अन्यायाविरुद्ध, भ्रष्ट कारभाराविरुद्ध, अनिती विरुद्ध, स्वार्थाविरुद्ध लढाई जिंकली. त्यासाठी अनेकांना प्राणांची आहुती द्यावी लागली. दिडशे वर्षाची सत्ता घालविण्यासाठी भारतीयांना शेकडो वर्षे प्राणपणाने लढावे लागले. वाईटाविरुद्ध लढाई जिंकायची असेल तर त्याला खूप वेळ द्यावाच लागतो आणि निस्वार्थी वृत्तीचे कार्यकर्ते लागतात.
श्रीकृष्ण जन्माच्या आधीपासूनच राक्षसांनी त्याला संपविण्याच्या असंख्य योजना आखल्या; पण यशस्वी झाला तो श्रीकृष्णच होता. राक्षस म्हणजे डोक्यावर दोन शिंगे, अंगभर मोठे केस, अक्राळविक्राळ चेहरा, तोंडातून दोन सुळे बाहेर आलेले, क्रूर असणारे.. अशी आमची समज असते. परंतु अनिती, कुबुद्धी, स्वार्थीपणा, भ्रष्टाचार म्हणजेच राक्षस. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. परमात्म्याने नेहमीच राक्षसांना संपविण्यासाठी आणि श्रद्धावानांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी अवतार घेतला. त्यातील श्रीकृष्णाने तर खूप मोठी लढाई राक्षसांविरुद्ध केलेली आहे. ह्या सर्व लढाया श्रीकृष्णाला खूप मोठ्या ताकदीने लढाव्या लागल्या. स्वातंत्र्यासाठी लढणारे क्रांतीविर असो वा राक्षसांविरुद्ध लढणारा श्रीकृष्ण असो; त्यांनी समाजाच्या भल्यासाठी सर्वस्वी अर्पण करून दिर्घकाळ लढा दिला. शेवटी विजय हा सत्याचाच-पवित्रतेचाच होतो. हे हजारो वर्ष ह्या भारतामध्ये घडत आहे. कारण...
रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम:।
(अर्थ-राजाधिराज `राम'च नेहमी विजयी होतो. त्या सीतापती `रामास' मी भजतो. `रामाने' राक्षसांची सेना मारली, त्या `रामाला' माझा नमस्कार असो!)
म्हणजेच परमात्मा असणाऱ्या श्रीरामाचा विजय होतो. राम म्हणजेच सत्य, राम म्हणजेच पवित्रता, राम म्हणजेच समाजाचे भले करण्याचा राजमार्ग, राम म्हणजेच अन्यायी, भ्रष्टाचारी, गैरकारभारविरोधी लढून जिंकण्याचा पुरुषार्थ. म्हणजेच समाजाचं भलं व्हावं, समाजाची सर्वांगिण प्रगती व्हावी व त्यात माझा खारीचा वाटा असावा; अशी वृत्ती असणं म्हणजे श्रीरामाचा-श्रीकृष्णाचा राजमार्ग व तो नेहमीच यशस्वी होतो.
दुसरी बाजू.... समाजाचं वाटोळं झालं तरी हरकत नाही; पण माझ्याकडे नेतृत्व असावं, मला आर्थिक लाभ व्हावा, त्यासाठी वाट्टेल ते करण्याची व वाईट माणसांची मदत घेण्याची विकृती म्हणजेच रावण-कंस होय. कंस हा श्रीकृष्णाचा सख्खा मामा. तरीही कंसाचा मार्ग समाज हिताचा नसल्याने श्रीकृष्णाला त्याला संपवावेच लागले. इथे नातेसंबंध आड आले नाहीत. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
`समाज माझा मी समाजाचा' म्हणजेच `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, परळ, मुंबई' ह्या संस्थेमध्ये गेल्या पंधरा-वीस वर्षात जे काही वाईट घडलं त्याचा समाचार घेणं आणि समाजहितासाठी जे लढले, जे लढताहेत आणि जे लढतील त्यांची बाजू ठामपणे मांडणे; हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो!
शेकडो समाजबांधवांनी ह्या लेखमालेला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. अनेक नवीन मुद्दे पुढे आणले. समाजहिताची वृत्ती अजूनही प्रबळपणे आमच्या समाजबांधवांमध्ये असल्याचे दिसले. खूप बरे वाटले.
तर हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोकांनी ही लेखमाला बंद करावी म्हणून लांबून बोटे मोडायला सुरूवात केली आहे. त्यांची समोर येण्याची अजूनतरी हिम्मत होत नाही. त्यांना माझे कळकळीचे मन:पूर्वक आवाहन आहे की, त्यांनी पुन्हा ही लेखमाला काळजीपूर्वक वाचावी. चुकीचं आढळल्यास नक्कीच सांगा. विरोधी मत प्रकट करा. हरकत नाही. पण खोट्या बदनामी करणाऱ्या चर्चा पाठीमागून करू नका. त्याला काही अर्थ नाही. अशा गोष्टी आम्ही विचारातच घेतल्या नाहीत व घेणारही नाही.
आपण सर्वसाधारणपणे म्हणतो की, `तो मनुष्य एका चहाचाही मिंधा नाही.' `तो कोणाची एक चहा सुद्धा पुâकट पित नाही.' खरंच आहे.; कोणी कोणाकडून काही पुâकट घेऊ नये. तसंच समाजाकडूनही आडमार्गाने काही लाभ घेऊ नयेत. आपल्या समाजात स्वत:ला अतिविद्वान (?) समजणारी एक व्यक्ती आहे व त्याची ख्याती (?) आहे, `समाजाची चहा न पिणारी' व्यक्ती. ह्या व्यक्तीने गावाला राहणारा माझा भाऊ श्री. विजय हडकर ह्याला सांगितले की, ``मी तुला सभासद करून घेतले आहे. सभासदत्वाची फी मी भरली आहे. माझ्या पॅनलला मत देण्यासाठी मुंबईला ये!'' जेव्हा मला ही गोष्ट समजली तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण प्रत्येकी पाचशे रूपये सभासदत्वाची फी भरून मी माझ्या भावाला व वहिणीला कायम सभासद करून घेतले होते. त्याची पावती माझ्याकडे आहे. ती माझ्या भावाला दाखविताच त्यालाही `त्या' खोटारड्या इसमाचा खूप राग आला.
इथे सभासद कोणी करून घेतले, कोणी सभासदत्वाची फी भरली; हा मुद्दा इथे अतिशय गौण आहे. पण `चहा न पिणारा ह्या भंपक नेत्याची फसवेगिरी माझ्यासमोर तरी उघडी झाली. हा कशासाठी खोटारडेपणा? हा मनुष्य स्वत:ला एवढा मोठा स्वच्छ समजत असेल आणि तसा आव तो आणत असेल तर त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत; जे प्रश्न मी ह्या लेखमालेतून यापुर्वीही मांडले आहेत आणि नंतरही मांडणार आहे.
जी माणसं समाज जीवनामध्ये खोटंनाटं बोलून समाजबांधवांना फसवत असतील ती माणसं क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचं भलं काय करणार? ह्या माणसाने समाजाच्या पदावर काम करीत असताना आपल्या भावाला कॅटरिंगचा ठेका कसा काय मिळून दिला? `कुठल्याही पदाधिकाऱ्यांने आपण स्वत: व कुटुंबियांना लाभाचे पद-ठेका देऊ नये' असा सर्वमान्य नियम असताना ह्या तथाकथित नेत्याने आपला अप्रामाणिकपणा लपवून का ठेवला? अशा अनेक गोष्टी समाजबांधवांना माहित आहेत.
समाजाच्या १ लाख ६५ हजार रूपयांपैकी स्वत:च्या लग्नासाठी किती रक्कम वापरली; त्याचाही एकदा हिशोब आम्हाला परखडपणे करावा लागणार आहे!
अशा भंपक नेत्यांनीच `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, परळ, मुंबई' ह्या संस्थेची प्रगती रोखली. माजी संचालक कै. सुभाष फाटक आणि स्वप्निक फाटक यांनी गैरकारभार केला; असं सांगणारी ही मंडळी कित्येक वर्षे त्यांच्याच सोबत होती. सत्तेचा मलिदा खात होती. तेव्हा अशा लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी, पदांसाठी तडजोडी केल्यात. जेव्हा जहाज बुडणार ह्याची खात्री पटताच ह्या स्वार्थी माणसांनीच त्यांची साथ सोडली. आज हीच माणसं स्वत:च्या कुल्यावर प्रामाणिकपणाचा शिक्का मारून फिरत आहेत. त्यांच्याकडून समाजहिताचं एक तरी कार्य घडू शकतं का? हा प्रश्न प्रत्येक समाजबांधवाने विचारला पाहिजे. कोणाला? प्रथम स्वत:ला व नंतर ह्यांना!
`उगाच कशाला वाद?' `कशाला बोलून विरोध पत्करा?' `आपल्या बापाचे काय जाते?' ह्या वृत्तीमुळे अनेक समाजबांधव माहिती असूनही ठाम स्पष्ट भूमिका घेत नाहीत. हे वाईट आहे. पण आता ही भूमिका बदलणे काळाची गरज आहे. अन्यथा आम्हाला काळ माफ करणार नाही. राक्षसी विकृती संपविण्यासाठी आता लढाई करावीच लागेल; अन्यथा ही विकृती देशाला, समाजाला गिळंकृत करेल.
ज्यांनी स्पष्ट भूमिका घेतली त्यांना वेळोवेळी गद्दार ठरविले गेले..... त्याबाबत पुढील लेखात आढावा घेऊ!
(क्रमश:)
-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक-पाक्षिक `स्टार वृत्त'