लेखांक पहिला- अनुत्तरीत प्रश्नांचा `निकाल’ आवश्यक!

लेखांक पहिला

`क्षा. म. समाज, परळ, मुंबई'- पंचवार्षिक निवडणूक; 

अनुत्तरीत प्रश्नांचा `निकाल’ आवश्यक!

।। हरि ॐ ।।


ऋषीतुल्य डॉ. रामचंद्र शिरोडकर आणि एच. डी. गावकर ही दोन महान व्यक्तीमत्वे क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजामध्ये झालीत. त्यांनी केलेले कार्य शब्दांमध्ये व्यक्त करणे शक्य नाही; परंतु जगासमोर ह्या दोन ऋषींचे तेजस्वी कार्य आले नाही. त्यांचे महान विचार बहुजन समाजाला सर्वांगिण विकासाकडे नेणारे होते. तर त्यांचे कार्यही त्यांच्या विचारांचे मूर्त स्वरूप होते. त्यामुळे क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाची बांधणी आजही मजबूत आहे. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी समाज बांधवांना एकत्र करून डॉ. शिरोडकरांनी जो पाया रचला त्याच्यावर एच. डी. गावकर साहेबांनी कळस चढविला. असं महान कार्य करणाऱ्या व्यक्तीला सर्वस्वी त्यागी जीवन जगावं लागतं आणि असं त्यागमय जीवन जगण्यासाठी कठोर तपस्या करावी लागते. सुमारे ८० वर्षापुर्वीचा काळ हा स्वातंत्र्यपुर्व काळ. तरीही महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजामध्ये शैक्षणिक क्रांती करण्यासाठी वटवृक्षाचे लावलेले रोप आज भव्यदिव्य व्हायला पाहिजे होते. पण गेली पंधरा-वीस वर्षे डॉ. शिरोडकर व एच. डी. गावकर ह्यांच्या विचारांशी कुठेतरी फारकत घेतल्यासारखे आम्ही वागत आहोत आणि हे वास्तव आम्ही स्वीकारायला हवे. जर आम्ही असेच वागत गेलो तर इतिहास आम्हाला क्षमा करणार नाही. 

तुम्ही म्हणाल, नेमकं काय म्हणायचं आहे? होय; बरोबर आहे तुमचं. म्हणूनच सुरूवात माझ्यापासून करतोय.

मी गेली पंचवीस वर्षे व्रतस्थ पत्रकारिता प्रामाणिकपणे करतोय. अनेक वर्तमानपत्रात सलग दहा वर्षे काम केले व नंतर पंधरा वर्षे म्हणजे आजमितीस मी स्वत:चे वर्तमानपत्र चालवित आहे. १९९६ साली एच. डी. गावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आरे येथे क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज बांधवांचे संमेलन झाले. त्यावेळी साप्ताहिक `कोकणभूमी'च्या माध्यमातून विशेषांक प्रसिद्ध केला. त्यावेळी एच. डी गावकर, विजयाताई गावकर, आर. आर. लोके यांच्याशी अगदी जवळून संबंध आले. त्यामुळे क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाबद्दल नेहमीच आदर वाटतो. जेवढा आदर आपण आपल्या देवाचा, मातापित्याचा राखतो; तेवढाच आदर मी समाजाचाही राखतो. म्हणून वीस वर्षाच्या कालावधीत `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, परळ, मुंबई'च्या नेतृत्वाकडून झालेल्या चुकांकडे दुर्लक्ष करून लिखाण करण्याचे टाळले. `स्वप्निक फाटक'ने केलेले गैरप्रकार आणि त्याला झालेली अटक ह्या सर्व गोष्टींनी खूप दु:ख व्हायचे-खूप वाईट वाटायचे. तरीही लेखणीचा वापर केला नाही. संपूर्ण क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाची बदनामी होऊ नये, असेच मनापासून वाटायचे; म्हणूनच क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाबद्दल चांगलेच लिहायचे व वाईट गोष्टींवर दुर्लक्ष करायचे, हा मार्ग पत्रकारितेत चुकीचा असूनही वरील समाज नेत्यांच्या आदरापोटी ही भूमिका स्वीकारली होती. पण आता तुमच्याशी संवाद साधावा, असे मनापासून वाटले. कारण काही चुकीच्या गोष्टी ह्या चर्चेतच राहतात व विसरल्या जातात; असं झाल्यामुळे त्याच चुका पुन्हा पुन्हा कळत नकळतपणे केल्या जात आहेत. 

`क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, परळ, मुंबई' ह्या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. ह्या निवडणूकीची प्रक्रिया तटस्थ वृत्तीने मी पाहत होतो. कारण ज्या समाज संस्थेवर मी मनापासून प्रेम करतो; त्या समाज संस्थेच्या निवडणूक काळात इत्यंभूत वास्तव समजून आले. त्याचाच अनुभव मला इथे मांडायचा आहे. 

ह्यावेळी `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, परळ, मुंबई' पुन्हा निवडणुकीला सामोरे गेला. का? कारण `अहंकार.' `मी' पणा. `मलाच’ पुन्हा अध्यक्ष व्हायचे आहे; हा हट्टाहास. 

गेल्या पाच वर्षात दोन अध्यक्ष झाले. पहिल्या साडेचार वर्षात जे काही भ्रष्ट आर्थिक व्यवहार झाले, त्याची पोलखोल सहा महिन्यासाठी लाभलेले अध्यक्ष रविंद्र गावकर यांनी निवडणुकीपुर्वी केली. पण त्याबद्दल मुग गिळून गप्प बसण्यात पहिल्या अध्यक्षांनी व त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी धन्यता मानली. आता त्या भ्रष्टाचाराच्या प्रश्नांची उत्तरे समाजबांधवा सदस्यांना मिळायलाच पाहिजेत. 

गेल्या पाच वर्षात जे आर्थिक व्यवहार झाले ते उघड झाले पाहिजेत. समाज संस्थेच्या पैशांवरती कोणी मजा मारत असेल तर तो समाजाला लुटणारा लुटारू, चोर, बदमाश. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मग तो कोणीही असो.... समाज संस्थेच्या पैशाचा हिशोब प्रत्येकाला द्यावाच लागेल. `जर कोणी फसवून समाज समाज संस्थेचे पैसे खाल्लेले असतील त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही' हा शाप तपस्वीनी विजयाताई गावकर यांचा आहे. हा शाप मी माझ्या स्वत:च्या कानांनी एका जाहीर कार्यक्रमात ऐकलेला आहे.

कारण २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने परिवर्तन झाले होते. मग दिलेली वचनं हेतुपुरस्करपणे का विसरली गेलीत? हा आमचा सवाल आहे. म्हणूनच २०१२ मध्ये दिलेली वचनं बाजूला देत आहे. ती वाचल्यानंतर गेल्या पाच वर्षात काय झाले ते सहजपणे लक्षात येईल. त्यासाठी उच्च शिक्षणाची आवश्यकता नाही.

२०१२ मध्ये ज्या कार्यकर्त्यांनी  तन मन धन अर्पण करून निवडणूक जिंकून दिली त्या कार्यकर्त्यांना पाच वर्षात झालेला भोंगळ कारभार पाहून २०१७ ला निवडणूक लढवावी लागली. २०१२ ते २०१७ मध्ये कारभार करणाऱ्या नेत्यांचा हा खराखुरा पराभव होता; हे मान्य करावे लागेल. 

ह्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप झाले. पण प्रचाराची पातळी हीन दर्जावर उतरली आणि पुन्हा एकदा मन दुखावलं गेलं. समाज बांधांवांची संस्था म्हणजे राजकारणाचा अड्डा आणि गँगस्टरची टोळी नव्हे; हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. ह्यावर खूप काही लिहिता येईल... पण `हा समाज माझा आहे आणि मी समाजाचा' ही शुद्ध भावना असल्याने आज थांबतोय.

समाज संस्थेची निवडणूक कार्याच्या आधारावर लढली गेली पाहिजे. पण आम्ही एकमेकांचे नातेवाईक असल्याने आम्ही तत्वांना नात्याच्या संबंधातून हरवितो; हे समाज संस्थेच्या विकासाला मारक आहे. कारण प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने कार्य करणारे कार्यकर्ते निवडणुकीच्या खेळात जिंकू  शकत नाहीत. निवडून आलेले उमेदवार आणि निवडून न आलेले उमेदवार हे आमचे अगदी जवळचे नातेवाईक आहेत. तरीही तत्वांची लढाई मागे पडता कामा नये, ही माझी ठाम भूमिका आहे. 

आता पुढे काय? झाले गेले विसरून जायचे...? अजिबात नाही. ज्यांनी भ्रष्ट कारभार केला असेल त्यांना दुर केलंच पाहिजे. नव्हे त्यांना कायद्याने शिक्षा झालीच पाहिजे. 

गेल्यावर्षी समाज बांधवांच्या पतपेढीची निवडणूक झाली. त्यावेळीही `स्वप्निक फाटक’च्या पॅनेलला मदत करणारे कोण होते? हे समाजबांधव विसरू शकत नाही.

`स्वप्निक फाटक'ने समाज संस्थेचे `भले' केले त्यामुळे तो कायद्याच्या कचाट्यात सापडला. त्याच्यावरील खटले मागे घेण्याची तयारी जाहीर प्रचार सभेत बोलून दाखविली गेली. हे कशाचे द्योतक आहे? म्हणे ``आजपर्यंत न्यायालयात खटले लढविण्यासाठी २२ लाख खर्च झाले. ह्यापुढे खर्च टाळण्यासाठी हे करावं लागेल.'' 

मग ५ लाखाचा खर्च २२ लाखावर कसा काय गेला? 

२२ लाख खर्च होऊनही एकही केस कोर्टात नोंदणीकृत का झाली नाही? ह्याची उत्तरं कोण देणार? भ्रष्टाचार करणाऱ्यांबरोबर `सेटींग' लावण्याचा हा प्रकार नाही का? 

अशा अनेक गोष्टी लिहिता येण्यासारख्या आहेत. ह्यापुढे भ्रष्ट आणि गैर कारभाराबाबत लिहिणार आहे; कारण `हा समाज माझा आहे आणि मी समाजाचा' ही शुद्ध भावना माझ्याकडे आहे, हे मी परमात्म्याला स्मरून सांगू शकतो!

समाजबांधव म्हणून आपल्याला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया निश्चित महत्वाची आहे. कारण क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाला सुवर्णदिन आणायचे आहेत आणि ही जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. 

चुकीला चूकच म्हणायचं धारिष्ट्य दाखविलं की मग पुढचा प्रवास सुखकर होईल! तुर्तास थांबतो....

-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक-`पाक्षिक' स्टार वृत्त 
(प्रसिद्धी ता. २० जुलै २०१७)