मनोगत...

`क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबई'चे आद्यप्रवर्तक, संस्थापक, ज्ञानमहर्षी ऋषीतुल्य डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर आणि शिक्षणतज्ञ एच. डी. गावकर ह्या दोन महान व्यक्तीमत्वांना विनम्र प्रणाम!

ह्या दोन महामानवांना अभिप्रेत असणारी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबई ह्या संस्थेची वाटचाल होण्यासाठी लेखणीला वास्तव मांडावं लागलं!

आरोप करायचे कोणावर? कोणा विरुद्ध लढाई करायची? सगळे आपलेच रक्ताचे नातेवाईक! युद्ध भूमीवर अर्जूनाला हा प्रश्न पडला आणि शुरवीर, पराक्रमी असणारा अर्जून लढाईला सुरुवात होण्याआधीच हतबल झाला. तेव्हा श्रीकृष्णाला रणांगणावरच अर्जूनाला सल्ला द्यावा लागला. अन्यायाविरुद्ध, अधर्माविरुद्ध लढण्यासाठी श्रीकृष्णाला आपली भूमिका स्पष्ट करावी लागली. तेव्हा जे काही अर्जूनाला श्रीकृष्णाने सांगितले; त्या निवेदनालाच `भगवद्गीता' म्हणून सनातन वैदिक हिंदू धर्मात मानाचे स्थान आहे. त्या भगवद्गीतेतून परमात्म्याने आम्हास दिलेली शिकवण खूप मोलाची आहे; भ्रष्टाचार, गैरव्यवहार, गैरकारभाररूपी अधर्म करणारा कोणीही (नातेवाईक, सत्ताधारी, मित्र वगैरे) असला तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे.

त्याचप्रमाणे उगाच कोणाची बदनामी करू नये; खोटे आरोप, निंदानालस्ती करू नये; अशी शिकवणही परमात्मा देत असतो. ही जाणीव ठेऊन...
`क्षा. म. समाज, मुंबई' ह्या संस्थेचा सर्वांगिण उत्कर्ष व्हावा म्हणून....
`क्षा. म. समाज, मुंबई' ह्या संस्थेच्या संस्थापकांचा उद्देश सफल व्हावा म्हणून.....
क्षा. म. समाजावरील शुद्ध प्रेमातून...
`समाज माझा, मी समाजाचा' ह्या मथळ्याखाली एक एक लेख प्रसिद्ध होत गेले आणि `क्षा. म. समाज, मुंबई' संस्थेचे वास्तव समोर आले.

वर्तमानकाळ जरी काळजी करणारा असला तरी भविष्यात संस्थापक असणाऱ्या महामानवांना अभिप्रेत असणारा `समाज' घडणार आहे, ह्याची आम्हाला खात्री आहे. कारण आमचा परमात्म्यावर विश्वास आहे. फळं देणाऱ्या झाडांवर कधी कधी बांडगुळे तयार होतात; त्या बांडगुळांना छाटल्यानंतरच ते फळ देणारं झाड पुन्हा एकदा सशक्त होतं.
म्हणजेच ही जबाबदारी आमच्यावर येऊन पडते, हे प्रत्येक समाजबांधवाने लक्षात घेतले पाहिजे.
अधर्म करणारा कोणीही असला तरी त्याच्याविरुद्ध ठामपणे उभं राहिलं पाहिजे. ही भूमिका घ्यायला किती वेळ लागतो? ते पाहूया!
`समाज माझा, मी समाजाचा' ही लेखमाला लिहिण्यापुर्वी पाक्षिक `स्टार वृत्त'मधून दोन संपादकीय प्रसिद्ध झाले होते; ते वाचल्यावर आमची पुर्वीची भूमिका आणि आताची भूमिका स्पष्टपणे समजून येईल.
लेखांमध्ये काही चूकीचं आढळल्यास अवश्य खूलासा करावा! जेणेकरून पुढील लेखात चुकीची दुरुस्ती केली जाईल. समाजाच्या भल्यासाठी काहीही (पवित्र गोष्टी) करण्याची तयारी आहेच!''

-नरेंद्र राजाराम हडकर